Friday, August 1, 2008

ऒलिम्पिक आणि भारत : अपेक्षा क्षमता आणि तारतम्य...

ऒलिंपिक जवळ आलं की वर्तमानपत्रांतून आणि टी व्ही वरून एक विचित्र प्रकारचं मार्केटिंग सुरू होतं, अपेक्षा वाढवणारं बाजारीकरण..आपल्या संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देणं, त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करणं मी समजू शकतो, पण पदकांची अपेक्षा / पदकांची अपेक्षा असं किती म्हणत राहणार ? ( चांगली कामगिरी करणं म्हणजे केवळ सुवर्णपदक आणि सुवर्णपदकच मिळवणं असे नव्हे हे जेव्हा सर्वांना समजेल तो सुदिन.)..

मग चांगली कामगिरी म्हणजे काय ? माझ्या मते स्वत:च्याच उत्तम कामगिरीवर मात करत राहणं आणि ऒलिंपिकसारख्या मोठ्या मंचावरती स्वत:चा बेस्ट परफ़ॊर्मन्स देत राहणं , निदान भारतीय विक्रम मोडत राहणं.. ही अपेक्षा मी करतो....आणि इतपत अपेक्षाच योग्य आहे.

क्षमता :१९९८ मध्ये इंडिया टुडेमध्ये भारतीय खेळाडूंच्या जागतिक कामगिरीविषयक एक तुलनात्मक लेख आला होता...त्यात बर्याच क्रीडाप्रकारातली भारतीय विक्रम आणि जागतिक विक्रम अशी तुलना केलेली होती...




या लेखात कोणताही ब्लेम गेम नव्हता तर केवळ वस्तुस्थिती दर्शवली होती.... मी हा लेख वाचून खचलोच... म्हणजे शारिरीक ताकद आणि दमसास या बाबतीत आपण प्रचंड मागे आणि ज्या गोष्टी अत्याधुनिक तंत्रद्न्यान वापरून शिकायच्या , त्या बाबतीत आणि ट्रेनिन्ग सुविधेतही आपण मागे.... कसे पदक विजेते तयार होणार ?
Throwers eat the same food runners do at the sai centres, only they're allowed a larger quantity. Sports drinks too, unlike water which often merely quenches thirst, reintroduce vital supplements in the body. In the US, Leander would undergo tests merely to measure his sodium loss. Then Dr Michael Bergeron of the Department of Exercise Science, University of Massachussetts, instructed him on his sweat rate (litres/hour) and therefore how much he must replenish. In India, hockey players drink from a tap in the field.
आता काही लोक म्हणतील ध्यानचंद हेच टॆप वॊटर पिऊन खेळायचा ना ? पण अहो असा अद्भुत माणूस शतकात एखादा होतो... सगळ्यांकडून तीच अपेक्षा कशी ठेवता येईल?

टीव्हीवाले वृत्तवाहिन्यांचे पत्रकार काहीही बोलत,दाखवत असतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात मतलब नाही पण वृत्तपत्रांचे पत्रकार तरी निदान तारतम्याने लिहितील असं मला वाटत असे.... पण तसे नाही...

काही क्रीडावृत्तपत्रकार भारतातले रेकॊर्ड होल्डर जगात पस्तिसाव्या, चोपन्नाव्या , विसाव्या वगैरे क्रमांकावर आहेत तरी त्यांच्याकडून पद्क अपेक्षतात... मग ती अंजली भागवत असो, अंजू जॊर्ज असो, साईना नेहवाल असो किंवा वीरधवल खाडे....( वर हे आणि की " मग? आम्ही अपेक्षा करणारच.. आमच्या कराच्या पैशातून स्पोर्ट्स मिनिस्ट्री त्यांचा खर्च करते ..." )....आता याला ऒप्टिमिस्टिक राहणं असं ते समजत असावेत.... अशांना ऒलिम्पिक झालं की अपेक्षाभंगाचा मोठा धक्का वगैरे बसतो.... मग हेच पत्रकार "... एक सव्वा अब्ज लोकसंख्येच्या खंडप्राय देशामध्ये दोन तीन पदके मिळू नयेत ? ..." वगैरे लेख पाडण्यात मग्न होतात...
आता या पॆटर्नचाच कंटाळा आलाय अगदी...

आता पहा, वीरधवल पदक मिळवणार पदक मिळवणार , त्याला कशी जनतेने मदत केली म्हणून तो इथवर येऊ शकला... तोच एक ऒलिम्पिकची आशा असले लेख वर्तमानपत्रातून पडायला लागतील, तो मेहेनतीने खेळेल.... चांगली कामगिरीही करेल पण पदक मिळाले नाही म्हणून सामान्य नागरिक त्याला शिव्याही घालेल....पण म्हणून ऒलिम्पिकनंतर त्यातूनच वीरधवल आणि साईना सारख्या खेळाडूंना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच किती वैफ़ल्य येत असेल...

आपल्या खेळाडूंचे जगातले क्रमांक ( रॆंकिंग या अर्थाने ) पाहिले तर पदक मिळवणे ( म्हणजेच पहिल्या तीनात क्रमांक पटकावणे ) जवळजवळ अशक्यच आहे असे कोणीही म्हणेल.... तरीही ९६ ला पेस, २००० ला मल्लेश्वरी आणि २००४ ला राजवर्धन राठोड यांनी पदके मिळवलीच ना... ही अत्यंत अद्भुत कामगिरी आहे आणि मला त्याबद्दल अत्यंत आदर आणि अभिमान आहे.... पण म्हणून मी आता रोज वर्तमानपत्रात लेख वाचतो की बॊक्सिंगकडून पदकाची अपेक्षा, कुस्तीत पदकाची अपेक्षा, बॆडमिंटनमध्ये पदकाची अपेक्षा हे सारं अंमळ भंपकपणाकडं झुकणारं... म्हणूनच म्हणतो, आपल्या संघाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे , शाबासकी दिली पाहिजे पण त्यांच्याकडून तारतम्याने अपेक्षा ठेवली पाहिजे...
जाताजाता : काहीतरी चमत्कार होऊन या वेळी आपल्या ऒलिम्पिक टीमनं दहा बारा पदकं आणून माझेच दात माझ्याच घशात घातले तर मला आनंदच होईल हे वे सां न ल....

"अब और कितना गिरना बाकी है "?

accredited online degrees

२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या...

पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का?

तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्‍या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो...

महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.)

जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच...

१९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे

१....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा..

२....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर
परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत...

एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?"
मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात...
...
१. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता...

वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही...

...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार?

एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...?

मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.

( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )

२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...


....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार...

एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?")
मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?"

मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही..


म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "?

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट





नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट
लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी
कलाकार : मुक्ता बर्वे
गिरीश जोशी
निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे

जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...

कथासार :
पूर्वी सिनेमा नाटक किंवा टीव्ही या माध्यमासाठी अभिनय आणि इतर तांत्रिक प्रशिक्षण देणार्या संस्था कमी होत्या..आता जसे जसे टीव्ही चॆनल वाढले आहेत, तशी त्या संस्थांची गरज वाढतेय आणि आपण अशा अनेक संस्था आजूबाजूला पाहत आहोत.त्यातून नवनवीन अभिनेते, लेखक , दिग्दर्शक घडत आहेत.ही गोष्ट आहे, अशाच एका संस्थेत लेखन शिकवणार्‍या प्राध्यापकाची आणि त्याच्या विद्यार्थिनीची... ती ऎकेडमीमध्ये लेखन शिकायला आलीय खरी पण तिचं अभ्यासात लक्ष नाही, शिकवलेलं कळत नाही म्हणून सर तिला शिकवणीसाठी घरी बोलावतात...त्यात सर सुरुवातीला तिला एक संपूर्णपणे कल्पनेतली गोष्ट लिहून आणायला सांगतात. पण ती स्वत:च्या आयुष्यातल्या गोष्टीच त्यात फ़िरवून फ़िरवून लिहून आणत राहते...मग सर तिच्यावर वैतागतात , त्यात दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी समोर येतात.

मुलगी एका छोट्या गावातून आलेली आहे, ती गोंधळलेली आहे आणि ध्येयहीन आयुष्य जगत आहे, तिला लेखक व्हायचंय पण ती त्यासाठी तितके कष्ट घेत नाहीये कारण कदाचित तिने स्वत:च सरांचे ऎकेडमीमध्ये येण्यापूर्वीचे लेखन वाचलेले आहे, आणि तिला त्यांचे पूर्वीचे लेखन खूप आवडले आहे, मात्र ती ऎकेडमीमध्ये त्यांच्या पहिल्या तासाला ते जे सांगतात त्याने प्रचंड व्यथित झालेली आहे, तिला जाणवलेले आहे की आता लोकांना आवडतं तेच मोजून मापून लिहायला सांगणारा हा पूर्वीचा आपला आवडता लेखक नव्हे... या विरोधाभासाने ती खचलेली आहे.आणि ती सरांना विचारते की तुम्ही असं का केलंत सर? या साध्या प्रश्नाचं उत्तर सर देऊ शकत नाहीत आणि त्यांचा स्वाभिमान दुखावतो....

पंधरा वर्षांपूर्वी सरांनी थोडेफ़ार नाव कमावलेले आहे आणि आता ते एक नाटक लिहू पाहत आहेत पण गेली तीन वर्षे त्यांना ते जमत नाहीये... वैयक्तिक आयुष्यात त्यांचे बायकोबरोबरचे संबंध दुरावलेले आहेत.. एक दोन फ़ोनमधून ते उत्तम व्यक्त होतात...
सर आणि विद्यार्थिनी दोन्ही पात्रे दुखावलेली आहेत आणि आतून घाबरलेलीसुद्धा....दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात....
लेखन राहते बाजूला आणि ते एकमेकांची वैयक्तिक आयुष्यातली उणीदुणी काढत राहतात. स्व टिकवण्यासाठी दुसर्‍याला दुखवण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही जणू त्यांच्याकडे....पण यातून काहीतरी चांगलं घडतं.. या सार्‍यातून ते आपापल्या चुका शोधतात, उणीवा सुधारायचा प्रयत्न करतात......त्याचे अडलेले नाट्यलेखन पूर्ण होते, तिला एक मोठी सीरियल मिळते. पण त्यांच्यात काही नाजूक बंध निर्माण व्हायची जी काही थोडी शक्यता असते तीही बारगळते आणि ते दोघे समंजसपणे दूर होतात.
_____________
या संपूर्ण नाटकाचे बलस्थान आहे, संवाद....या नाटकाचे नुसते मोठ्याने वाचन करायलासुद्धा फ़ार मजा येते असा माझा अनुभव आहे.......(याची मॅजेस्टिकने छापलेली संहितासुद्धा उपलब्ध आहे.).


गिरीशने लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता अशी मोठी जबाबदारी पेलेली आहे... तो स्वत: एका संस्थेमध्ये लेखन शिकवत असल्याने अशा स्वत:च्या आयुष्यातल्या घटनावर लिहिणार्‍या विद्यार्थ्यांचा अनुभव त्याला नेहमी येत असे असे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते...शिक्षकाच्या भूमिकेतला लेखन शिकवतानाचा बराचसा तांत्रिक भाग मी त्याच्या कार्यशाळेतसुद्धा त्याच्याच तोंडून जसाच्या तसा ऐकला आहे.. विद्यार्थिनीच्या चमत्कारिक वागण्याने गोंधळलेला, तिच्यात कळत नकळत पणे थोडासा गुंतत जाणारा पण वेळीच दूर जाणारा शिक्षक त्याने चांगला दाखवलेला आहे...मुक्ता बर्वेने सुरुवातीला अभ्यासात लक्ष नसणारी, मठ्ठ वाटणारी पण नंतरची दुखावलेली विद्यार्थिनी उत्तम सादर केली आहे...
दोनच पात्रांचे दोन अंकी व्यावसायिक नाटक पण यात नाट्यपूर्ण घटना नाहीत, प्रेमकथा नाही, रूढ खलनायक नाही,मेलोड्रामा नाही, विषय आहे नाट्यलेखनासारखा रूक्ष ( यावर काय नाटक लिहिणार ?असेही काहींना वाटू शकते )
रंगमंचावर काहीही विशेष घडत नसताना प्रेक्षकाला बंधून ठेवणे अवघडच.... पण हे नाटक ते लीलया करते..

या नाटकाचे अजून एक विशेष म्हणजे हे नाटक सुदर्शनच्या प्रायोगिक रंगमंचावर जितके रंगते तसेच ते व्यावसायिक मंचावरही प्रेक्षकांनी उचलून धरले..
( मी हे नाटक दोन्ही मंचावर पाहिले आहे आणि ते दोन्हीकडे तसेच रंगते असे मला वाटते).
प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या (तथाकथित) रूढ सीमारेषा या नाटकाने अजून धूसर केल्या...
या नाटकाने २००७ मध्ये अमेरिका दौराही केला )

Monday, July 7, 2008

माझा आवडता सिनेमा दामिनी (१९९३)


दामिनी...





कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते...

पूर्वपक्ष : जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच...प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना (character) : सत्य
२.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी
३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं..

म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात.


प्रमुख व्यक्तिरेखा

१. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते.
२. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...?
३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात.
४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो.
( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)...

संघर्ष
कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष...
बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष.
शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष

आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय.

आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ?

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो.
संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे
पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड.
प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम.
फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात.
छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात.

वाढता संघर्ष :
सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला..

या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो...

संवाद
पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते.
दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं...

अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे ...
"ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद.

लय
सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन...
त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन..

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार


आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

२. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...


ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर



सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.
____________________________________________




व्यक्तिरेखन
कोणत्याही नाटकातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट.. नुसते संवाद उत्तम असून उपयोग नाही, ज्या माणसांची ही कथा आहे, ती माणसं खरी हवीत.
कमी पात्रांच्या चेकॊव्हच्या एकांकिका, दिवाकरांच्या नाट्यछटा यातून अत्यंत कमी वेळात व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
तेंडुलकरांनी खास दिलेली उदाहरणे...
१. क्रॅश सिनेमामध्ये ( आधीच्या दृश्यात वंशभेद करणारा ) गोरा इन्स्पेक्टर वडिलांच्या आजाराने गांजलेला आहे, तो अगतिकपणे वडिलांसाठी हॊस्पिटलमध्ये भांडतो आहे....माणूस प्रत्येक वेळी पूर्ण दुष्ट / सुष्ट नसतो, ते एक मिश्रण असते, याचे उत्तम उदाहरण.... त्यामुळे तो माणूस म्हणून जास्त खरा भासतो.
२.मिस्टर ऎंड मिसेस अय्यर या सिनेमातील बसमधील पात्रे..कमी वेळात व्यक्तिरेखा सुस्पष्ट....

भावना :प्रत्येक माणसाला कशासाठीतरी असुरक्षित वाटत असतं आणि स्वत:चं महत्त्व वाढावं असं वाटत असतं..( कोणी बोलून दाखवतं, कोणी नाही).
म्हणून माणूस आपल्या चुकांसाठी कोणीतरी दुसर्याला जबाबदार धरतो, आरोप करतो.... असुरक्षितता ही सर्व मानवी भावनांमधली मूलभूत भावना आहे, इतर सर्व भावना यातूनच येतात.कोणीच स्वत:वर पूर्ण समाधानी नसतो.म्हणून प्रत्येकजण आपापल्या कमीपणावर मात करण्यासाठी इतर भावनांचा आधार घेतो.
( उदा. १ प्रतिकारास असमर्थ माणसं छोट्या टीकेबद्दलसुद्धा अतिसंवेदनशील असतात
२. मोठी महत्त्वाकांक्षा कोणत्यातरी कमीपणाच्या भावनेतून येते.).

व्यक्तिरेखेला आकार देणे..
आज आहे तशी ही व्यक्तिरेखा का घडली असेल? तिचा भूतकाळ आणि वर्तमान पडताळून पाहणे हा एक इन्ट्रेस्टिंग प्रकार असतो.
कोणत्याही व्यक्तिरेखेला तीन महत्त्वाची अंगे असतात... सम्पूर्ण त्रिमितीय व्यक्तिरेखा तयार करण्यासाठी त्यांचा अभ्यास फ़ार महत्त्वाचा आहे.
१. शारीरिक
दिसणं. आरोग्य...डोळे, कांती, केस, रंग, लठ्ठ / बारीक,सुंदर / कुरूप, अपंग , बहिरा, अंध, वगैरे..
...निरोगी माणूस आजारी माणसापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देतो . दिसणं हे मानसिक जडणघडणीसाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्त्वाचं असतं ज्यातून न्यूनगंड किंवा अहंगंड तयार होतात.
२. सामाजिक
वातावरण.... आजूबाजूची परिस्थिती. श्रीमंती/ गरीबी / पालकांची स्थिती/शांत सुखी स्थैर्य असलेलं आयुष्य...घटस्फ़ोटित पालक, एकपालकत्व,.... मित्रपरिवार, शाळा कॊलेज, शिक्षण, आवडते अभ्यासाचे विषय, सामाजिक जीवन.. वगैरे.
३.मानसिक
पहिल्या दोनातून ही मानसिक जडणघडण होते. व्यक्तिरेखांच्या महत्त्वाकांक्षा, वैफ़ल्य,चक्रमपणा,ऎटिट्यूड, गंड यात येतात..
व्यक्तिरेखांच्या कोणत्याही कृत्याची कारणमीमांसा करण्यासाठी , मोटिव्हेशन समजण्यासाठी हे आवश्यक.


protagonist : प्रोटॆगनिस्ट
ही गोष्ट कोणाची या प्रश्नाचे उत्तर काय??
कथेतलं मुख्य पात्र...कोणत्याही कथेतला संघर्ष सुरुवातीपासून शेवटापर्यंत जी व्यक्ती (किंवा सारख्या विचारसरणीचा समुदाय) पुढे नेते , ती व्यक्ती असते प्रोटॆगनिस्ट म्हणजे रूढार्थाने गोष्टीचा नायक किंवा नायिका....)

मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..त्याचा जो स्वभाव असेल, कंपल्सिव्ह ट्रेट असेल तो अगदी भन्नाट असावा...
आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय..इथे संघर्ष सुरू होतो...आणि संकटं वाढत वाढत जातात...त्यातून बाहेर पडतापडता धडपड करत करत तो आत आत रुतत जातो...
मुख्य पात्र कशासाठीतरी असमाधानी आहे, परिस्थिती बदलायची धडपड करत आहे... ध्येयासाठी वाट्टेल ते करणारा ,सार्‍यांना बरोबर घेऊन जाण्यासाठी झटणारा आहे, आणि कोणी बरोबर नाही आले तर एकटा लढणारा आहे....या ध्येयामध्ये जो तुल्यबळ परंतु सामान्यत: वाईट विचारांचा माणूस अडथळे आणतो, तो ऎंटागनिस्ट...( ही झाली प्रोटॆगनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी)

ऎंटागनिस्ट
अर्थात प्रोटॆगनिस्टच्या विचारांना विरोध करणारा , रूढार्थाने खलनायक....
( कधी कधी याच्या विचारांमधून गोष्ट सुरू होते.... ऎंटागनिस्ट प्लॆन डॊमिनेटेड थिअरी .....
उदा. जेम्स बॊंडचे बरेचसे सिनेमे... किंवा मिस्टर इंडियातला मोगॆम्बो वगैरे.... जगावर राज्य करण्यासाठी यांच्या कारवाया वगैरे चालू असताना त्यांच्या मनसुब्यामध्ये येणारा हीरो)

इतर पात्रे :
नाटकासाठी इतर पात्रांची गरज पडते, मनातले गुंतागुंतीचे विचार सांगायचेत तर पात्रांची कोणाशीतरी चर्चा होणे आवश्यक... मात्र ही पात्रे कथानकाशी आणि प्रेमाईसशी सुसंगत हवीत.उगीचच येणारी जाणारी अनावश्यक पात्रे कंटाळा आणतात....(ही लेखकाची सोय असली तरी प्रेक्षकाला आराखड्याच्या यंत्रांची खडखड जाणवू नये यात लेखकाचे कौशल्य)

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं)

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..

दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्‍या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....

इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.

terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...

१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.

उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.

प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.

कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...

कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.

प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.

आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?

प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देताना हीरोला शेवटी लॊटरी लागते आणि तो श्रीमंत होतो , हे चूक...मान्य आहे,असं खरं घडू शकतं...लॊटरी काय कोणालाही लागू शकते पण या हीरोला लॊटरी लागली तर आपला प्रिमाईस खोटा पडला ना.... ).

नुसतंच खरं आयुष्य हे प्रत्येक वेळी परिणामकारक लेखन होऊ शकत नाही...अगदी रिअलिस्टिक नाटकातसुद्धा खर्‍या आयुष्याचा केवळ भास घडतो.पण तेच जसंच्या तसं खरं आयुष्य नव्हे.खर्‍या आयुष्यात बर्‍याचदा कार्यकारणभाव नसतो . पण प्रत्येकाला कार्यकारणभाव असलेल्या भासमान विश्वाची गरज असते आणि गोष्ट ती गरज पूर्ण करते.म्हणून नाटकाची गोष्ट संपूर्ण काल्पनिक किंवा संपूर्ण सत्य नसते तर ती या दोन्हींचे सुयोग्य मिश्रण असते.

Saturday, June 21, 2008

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..

नाटकाचे कथासूत्र...
तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०... त्यातल्या एकाचे आईवडील बाहेरगावी गेलेले असल्याने धिंगाणा करायला उरलेले दोघे मित्र त्याच्या घरी राहायला आले आहेत. नाटक सुरू होताना एक जण खिडकीतून समोरच्या बिल्डिंगमधलं तरूण जोडपं प्रेमचेष्टा करताना दिसतंय का ते पाहण्याच्या प्रयत्नात... पण ते जोडपं शॉपिंगला बाहेर गेलंय, परत आल्यावर लक्ष ठेवू, वगैरे संवाद होतो... नंतर संवादाची गाडी एकूणच आसपासची वाढती कामुक आव्हाने, सिनेमा नट्या, जगाच्या मानाने आपण किती मागे आहोत ( फ़िनलंडमधल्या तरूणांचे सेक्सच्या पहिल्या अनुभवाचे सरासरी वय आहे १९ बर्षे... आणि आपण तिच्यायला असे"!!!)..अजून लग्नाला इतका अवकाश अहे आणि आपण तोपर्यंत .... वगैरे वगैरे मार्गाने जात असताना तिघांचे एकमत होते की आपण हा अनुभव आता घेतलाच पाहिजे.
त्यातल्या एकाचा एक अनुभवी (!) मित्र एका "व्यावसायिक" PSW ला ओळखत असतो, त्याला फोन करून हे (हो नाही करत, स्वत:जवळ पुरेसे पैसे आहेत का बघत ) तिची अपोइंटमेंट घेऊनही टाकतात. ... मग असे करू, तसे करू वगैरे खूप अंदाज आणि ती येते...
( या सार्‍यांची अपेक्षा की एखादी कॉलेजकन्यका येईल... पण येते एक मध्यमवयीन स्त्री).. मग सगळे गांगरून जातात आणि काहीही न करता तिच्याबरोबर सीडीवर इक्बाल सिनेमा पाहतात, आणि तिला पैसे देऊन निरोप देतात.....
....
मग पुन्हा एकाला समोरच्या इमारतीत त्या फ़्लॆटमध्ये लाईट दिसतो .." ते जोडपं आलंय परत... " ... "बघावं काय?" असा विचार करत दोघे उठतात पण "नकोच ते" असं म्हणत परत झोपतात..
पडदा ...संपलं नाटक..
______________________________________
माझे मत : आपल्याला नाटक पाहताना आवडलं ...
औटस्टेंडिंग, विचारप्रवर्तक वगैरे नव्हते तरीसुद्धा त्यात गंमत होती.. कलाकारांनी छान कामे केली होती... सुरुवातीच्या सेक्सबद्दलच्या कुतुहलाचे संवाद छान लिहिले होते... काही क्षणी नाटक अगदीच चीप होतंय की काय अशी मला भीती निर्माण होता होता परत कंट्रोल व्हायचे. ... हे निपुणमधल्या दिग्दर्शकाचे कौशल्य ... ( हे असले संवाद मी लिहू शकलो नसतो , हे ही खरे) पण आता नाटकाचा विषयच हा आहे तर काय करणार ? (आता इतकी नैसर्गिक गोष्ट आहे ही, पण पूर्वी तर त्याबद्दल कुठेच बोलायचे नाही, चर्चा नाही,
अर्धवट माहिती इकडून तिकडून मिळवलेली .. आताच्या तरूण मंडळींकडे आंतरजालासारखा माहिती स्त्रोत आहे हे बरे....)

मला वाटतं मी हे नाटक सुमारे १२५ लोकांबरोबर पाहिलं... त्यात साधारणपणे ३ ग्रुप दिसले.
त्यात एक ग्रुप - पुढे बसून जोराजोरात खिदळणारे, प्रचंद दाद देणारे अगदी २० २२ वर्षांचे कॊलेजियन... कारण हे सारे अगदी त्यांच्या मनातले , त्यांच्याच वयाची पोरे सांगताना दिसताहेत.
दुसरा ग्रुप ... ( माझ्यासारखा ) तीस पस्तीसच्या आसपासचा , त्यातल्या एका मित्राशी बोललो , तो डोळे मिचकावत म्हणाला, " कुतुहल, अंदाज, आनंद वगैरे त्या त्या वयात ठीक आहे पण शेवटी यांनाही कळेलच की नंतर की ...म्हणजे ...वाटतं तेवढं ...हं... " आणि मान हलवत हसला.
तिसरा ग्रुप ... पन्नास- पंचावन्नचा ज्यांची मुले मुली वीशीत आहेत असे... यांचे चेहरे थोडे चिंताग्रस्त दिसले.... काही स्त्रिया तर वैतागलेल्या दिसल्या... ( हे काय घाणेरडं वगैरे? घरात वेश्या बोलावताय?")

मला तर पुण्यातल्या शनिवार पेठेत आपण हा प्रयोग पाहिला, यावर थोडा वेळ विश्वास बसेना....
प्रयोग नाटकाच्या विषयाशी प्रामाणिक होता? हो.
बहुसंख्य प्रेक्षकांनी एन्जॊय केला? हो.
कलाकारांची कामे मस्त.... आधी मारे वाघासारखी गप्पा मारणारी पोरं ती आल्यानंतर शेळी होतात ते बेष्ट...
________________________
( आता दुसर्या बाजूने विचार केल्यावर वाटतं , समजा तिथे खरंच कॊलेजची १८ वर्षांची PSW आली असती तर काय झाल असतं? मध्यमवयीन स्त्री येणं आणि यांनी काहीच न करणं , ही नाटककाराच्या दृष्टीनं एक पळवाट झाली की सांगायला, " बघा माझी पात्रे वाईट नाहीत हो, काहीही न करता त्यांनी फ़क्त सिनेमा पाहिला"... मग एवढंच करायचं होतं तर इतक्या धीट विषयाला हात घालून ऐन वेळी पळवाट कशाला काढली ? तिथे खरी मजा आली असती की आलेली १८ वर्षांची मुलगी यातल्या एकाची मानलेली गर्लफ़्रेंड आहे.... मग खरी मजा आली असती...मग यांची बोलती बंद झाली असती, "तुम्ही मुलं जर तिला बोलवू शकता तर त्याच न्यायाने मी ती असू का नये??"
असा एक संवाद लिहून पाहू म्हणतो, सराव म्हणून...

कुत्रा आणि मी ... काही अनुभव...



".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..

काही मंडळींना भटक्या कुत्र्यांबद्दल भन्नाट प्रेम असतं..पण त्यांना पहाटे सायकलवरून कामावर जायचं नसतं, किंवा रात्रपाळीवरून परत येताना मागे लागलेल्या कुत्र्यांमुळं खड्ड्यात पडावं लागलेलं नसतं..किंवा पोटावर इन्जेक्शनाची नक्शी काढून घ्यावी लागलेली नसते.... भटक्या कुत्र्यांचा त्रास शक्य ते उपाय वापरून बंद केला पाहिजे असं खुद्द अहिंसावादी गांधीजींनीही म्हटलं होतं म्हणे...हे तर भटक्या कुत्र्यांचं झालं ..पाळीव कुत्रे तरी काय सारे नियंत्रणात असतात काय??

हे सारं इथे आठवण्याचं कारण म्हणजे कालच मी एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो असताना त्यांनी पाळलेल्या एका जर्मन शेफर्ड जातीच्या रॉकी नामक लाडक्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला...हो, हो, मी हल्लाच म्हणणार.. कुत्रा पाळणार्‍यांनी म्हणावं की " रॉकी जरासा चिडला असेल इतकंच"... आता कोणी म्हणेल,", तुम्ही कशाला त्याची खोड काढायला गेलात? "... खरं सांगतो, " आपण काहीच केलं नाही..." आता त्या अक्षरश: वाघासारख्या प्राण्याची खोडी काढण्याइतके आम्ही निर्बुद्ध नाही हो.....

त्या रॉकीला असा अंगणात मोकळा सोडलेला..घराला साडेपाच फ़ुटी उंच भिंत आणि लोखंडी गेट....मी गेटच्या बाहेरून बेल वाजवली आणि गेटपाशी उभा राहिलो, ते काही रॊकीला पसंत पडले नसावे... त्याने माझ्या दिशेने गुरकावून उडी मारायला सुरुवात केली, त्याचे पंजे चांगले माझ्या डोक्याच्याही वर जाणारे...त्याचा तो थयथयाट पाहूनही मी काही घाबरलो नाही, मध्ये भक्कम लोखंडी गेट होते ना...मी शांत उभा राहिलो...मग त्याने भुंकायला सुरुवत केली... मग घरातून काही लोक आले , त्याला घेऊन आत गेले, गेटच्या बाहेरूनच माझ्याशी बोलले ,

माझे काम झाले, मी जाणार तेवढ्यात घराच्या आतून सुसाट वेगाने रॊकी माझ्या दिशेने भुंकत आला, मी बाहेर जायला चालायला सुरुवात केली होती, पण त्याने भिंतीवर उडी मारली, आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की रॉकीच्या क्षमतेसाठी ही भिंत अपुरी आहे, आणि उडी मारून तो पलिकडे येणार, त्यावेळी मात्र माझे धाबे दणाणले, आसपास कोणी नाही... घरातल्यांच्या तोंडी सूचनेला रॊकी आवरत नाही हे दिसतच होते...रस्त्यातच हा रॊकी नावाचा वाघ आपल्याला फाडून खाणार असे मला दिसायला लागले..... पुढे काय झाले नीट आठवत नाही, मी भीतीने हंबरडा फोडला की तोंडातून आवाजच फ़ुटला नाही ते आठवतच नाही..धावण्याचा क्षीण प्रयत्न केला असावा,..कोणत्याही क्षणी आपल्या परमप्रिय शरीराचा लचका एक हिंस्त्र प्राणी तोडणार आहे, हे फीलिंग फार भयानक असतं खरं...मला शेजारच्या रो हाउसची भिंत वर चढून पार करावीशी वाटली... मी तिकडे धावून पलिकडे उडी मारली की काय केले आठवत नाही, आजूबाजूला आरडाओरडा झाला थोडासा..

रॉकीचे शेजारी त्यांच्या अंगणात खुर्ची घेऊन पेपर वाचत बसले होते , तेही ओरडू लागले...त्यांनी माझ्या दिशेने प्लास्टिकची खुर्ची फ़ेकली , आणि हातात धरून उभे रहा अशी सूचना केली...दोन चार सेकंदच गेली असतील मध्ये.. भानावर आलो तेव्हा मी दोन घरे पलिकडच्या भिंतीच्या आत खुर्ची धरून उभा होतो,.. तेव्हाही त्या खुर्चीचा फ़ार आधार वाटला हे खरं... तिथे कसा पोचलो ते काही आठवत नाही...( सिंहाच्या पिंजर्यात लाईट गेल्यानंतर दामू धोत्रे हे रिंगमास्टर असेच हातात स्टूल धरून उभे असतील या कल्पनेने मला आत्ता हसू येतेय.. आठवला तिसरीतला "प्रकाश प्रकाश " हा धडा")..मधल्या काळात रॉकीला आत नेले असावे मालकाने... चार क्षण दम खाल्ला, देवाचे आभार मानले... पायात जोरात कळ गेली...कुठेतरी उडी मारायच्या प्रयत्नात मी पडलो असणार , पायाला बरंच खरचटलं होतं, आणि मुका मार थोडासा...पाय ठणकत होता... हे अगदीच थोडक्यात भागलं.. पण भीतीनं मी थरथरत असणार.. .. माझी अवस्था पाहून शेजार्‍यांनी ग्लासभर पाणी आणून दिले, त्यांच्यासाठी हे प्रसंग नित्याचे असावेत...त्यांना माझी दया वगैरे आली असावी... मला बसा म्हणाले पाच मिनिटे... रॉकीच्या शेजारच्या घरात अजून थांबायची माझी इच्छा नव्हती, .. मी दुखर्‍या पायाने रॉकी मागे येत नाही ना हे पाहत पाहत , शक्य तितक्या वेगाने तिथून सटकलो... दुपारी रस्त्यावर गर्दी नव्हती, खरंतर कोणीच नव्हते...त्यामुळे आपल्या शेजारचा दातांचा डॉक्टर कुत्र्याला घाबरून खड्ड्यात पडला असा विनोदी प्रसंग लोकांनी मिस केला ...
या सार्‍यात रॉकीची चूक नाहीच पण त्याच्या मालकांची काही चूक आहे की नाही, असलीच तर किती ? हे ही मला माहित नाही...

लहानपणापासून माझं कुत्र्याशी फ़ार जमलं नाहीच... दुसरीत कोल्हापुरात एक पामेरियन कुत्रा चावला तेव्हा एक टिटॆनसच्या इन्जेक्शनावर भागलं... आठवीत पुन्हा पामेरियनच चावलं तेव्हा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन पोटावर रेबीजची तीन इन्जेक्शनं घेतली होती.. आणि काही कारण नसताना कालचा जर्मन शेफर्ड....माझं नशीब थोर की तो चावला नाही...त्यामुळं मला कुत्र्यांविषयी कधीच प्रेम वगैरे वाटलं नाही.. हा प्राणी आपल्याला चावू नये इतपत माफ़क अपेक्षा मी करत असे..

आमच्या घरी एक पाळलेली मांजरी होती...आईला फ़ार आवडत असे..पण ही मांजरी कोणत्याही उचकवण्याशिवाय मी अगदी पाठमोरा उभा असताना सुद्धा मला येऊन बोचकारत असे.
( मात्र त्याच मांजराच्या पिलांशी तासंतास खेळायला मात्र मजा येत असे)..

आमचे शेजारी गावठी कुत्रे पाळत असत.,.. त्यांच्या कुत्र्याशी मी फ़ार शत्रुत्त्व नाही किंवा फ़ार प्रेम नाही अशा पद्धतीने अंतर राखूनच वागत असे...पण तो कुत्रा रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांवर धावून जात असे,सायकलवाल्यांना घाबरवत असे, पाडत असे, त्यावेळी फ़िदी फ़िदी हसत गंमत पाहणार्‍या आपल्या मुलांना ते थाबवत तर नसतच पण कौतुकमिश्रीत उत्साहाने ," ...अग्गोबाई, आमच्या पिंटूने / मोत्याने / काळूने आस्सं केलं हो "..अशी चर्चा करत असत. मात्र कुत्र्यांना बांधणे त्यांना पसंत नसे.... अंगावर उड्या मारमारून भुंकणार्‍या कुत्र्याला पाहून कोणी येणारा सज्जन घाबरला तर म्हणत असत," काही करत नाही हो आमचा कुत्रा, उगीच घाबरू नका ".. मला हे फ़ार खटकत असे " काही करत नाही काय? चावणारच तो आता,म्हटल्यावर लोकांना भीती वाटणारच...उगीच कोण घाबरेल ?..." असं त्यांना सांगावंसं वाटत असे..पण मी फ़ार लहान असल्याने त्या वेळी काही बोलू शकत नव्हतो......

शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये नावाचा नागरिकशास्त्रात एक धडा होता...त्याला स्मरून सर्व प्राण्यांच्या मालकांना एक सांगावेसे वाटते,
कुत्रा (, माकड , वाघ, सिंह, हत्ती, कासव, ससा, जिराफ़ ,तरस, लांडगा, सुसर) काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..

Sunday, June 15, 2008

पुस्तकाची ओळख... "असे पेशंट , अशी प्रॅक्टीस...".. लेखक : डॉ : प्रफुल्ल दाढे







पुस्तकाचे नाव... : असे पेशंट, अशी प्रॅक्टिस आणि ऍलर्जी एक इष्टापत्ती
प्रकाशक : अक्षयविद्या प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : १२५ रु.
लेखक डॉ : प्रफुल्ल दाढे

लेखक एम.बी.बी.एस. आहेत ...ते अडतीस वर्षे वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असून त्यांनी दोन वर्षे सरकारी नोकरी केली आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय चालू केला.
हे पुस्तक म्हणजे व्यवसाय करताना डॉक्टरांना आलेल्या पेशंटची स्वभाववैशिष्ट्ये दाखवणारं अनेक भल्याबुर्‍या काही विनोदी अनुभवांचे एकत्रीकरण आहे... हे पुस्तक अत्यंत सरळ मनाने लिहिले आहे, कोणताही अभिनिवेश नाही..त्यांना कोणालाही चुकीचे किंवा बरोबर ठरवायचे नाही,आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत... डॉक्टर तेवढे चांगले आणि पेशंट वाईट असा कोणताही (ओव्हर जनरलायझेशन करणारा) पवित्रा नाही..

सुरुवातीच्या दोन वर्षांच्या काळात डॉक्टरांनी छोट्या गावामध्ये नोकरी केली.. तिथे पिण्याच्या पाण्याची कमतरता, अस्वच्छ पाणी ( त्यातून नारूची भीती),गरीबी , ( गावात अजिबात दूध न मिळणे),अन्धश्रद्धा, ( भगत मंडळींचा सर्पदंशावर उपयोग)... ... गावात स्वच्छतागृह नसल्या्ने प्रातर्विधीला डॉक्टरांबरोबर पहाटे पाचच्या बॅचला (!!!) जाऊन शेजारीच बसून कन्सल्टिंग (!!!!) मागणार्‍या पेशंटचे किस्से अफ़लातून ..
रूरल हॊस्पिटलमधून अंथरूण- पांघरूणासकट पळून गेलेले विषबाधेचे पेशंट किंवा नसबंदीच्या गाडीला पाहून पळून जाणारे पेशंट असले अनेक किस्से आहेत..... कोटा पूर्ण करायच्या नादात निष्काळजीपणे नसबंदी केलेल्या केसेस फ़ेल गेल्यानंतर नवर्‍याने संशय घेतल्याने सार्‍या कुटुंबाची वाताहत होण्याची गोष्ट ऐकून फ़ार वाईटही वाटले..

पुढे स्वतंत्र व्यवसाय चालू केल्यानंतर त्यांना शहरी नमुने भेटले...यात मद्रासी, गुजराती,कच्छी, यूपीवाले भैये यांची निरनिराळी स्वभाववैशिष्ट्ये दर्शवणार्‍यागोष्टी आहेत. इंग्रजी शब्द पेरून अर्थाचा अनर्थ करणारे पेशंट, स्थळाच्या चौकशीच्या नसत्या कटकटीत अडकवणारे पेशंट, नंबर चुकवून मध्ये घुसणारे, खोटे कौतुक करून उधारी मागणारे, व्हिजिटला पळवणारे आणि फ़ी बुडवणारे पशंट, न्हाव्याने डॉक्टरांनी माझी दाढी केली असे अभिमानाने सांगणे असे अनेक किस्से आहेत..

त्यातल्या काही गोष्टी अगदी मनाला भिडणार्‍या आहेत. स्वत:च्या नवर्‍याच्या शून्य स्पर्म काउंटची गोष्ट वृद्ध सासू सासर्‍यांना कळून त्यांच्यावर मानसिक आघात होऊ नये म्हणून नवर्‍याला विश्वासात घेऊन प्रेग्नन्सी फ़ेक करून माहेरी जाऊन मूल ऍडॉप्ट करून आणणार्या जिद्दी स्त्रीची एक गोष्ट आहे...

त्यांचा दवाखाना रस्ता रुंदीकरणात जात असताना समोरच जागा घेण्यासाठी डिपॊझिटसाठी आर्थिक मदत देणार्‍या व्यापारी शेजार्‍यांची कथा आहे. (अजून माणुसकी आहे हे खरं..)

एकूणच बदललेला जमाना, बदलता डॉक्टरी व्यवसाय , अस्ताला गेलेली फ़ॆमिली डॉक्टर ही संकल्पना, फ़ास्टमफास्ट रिझ्ल्ट्सचा पेशंट्सचा आग्रह, त्यातून अधिकाधिक हायर ऎन्टिबायोटिक्स्चा वाढता वापर, त्यातून उद्भवलेला रेझिस्टन्सचा प्रॊब्लेम, CPA आणि डोक्टर आणि पेशंट यांचा एकमेकांवरचा वाढता संशय मग त्यामुळे अधिकाधिक टेस्ट्स करून घेणे यावर डोक्टरांचे चांगले भाष्य आहे..

शेवटच्या प्रकरणात त्यांना पुण्यात झालेला गाजरगवताच्या सीव्हिअर ऍलर्जीचा त्रास आणि त्यामुळे चांगली चालणारी प्रॅक्टीस सोडून डोंबिवलीला स्थलांतर करावे लागले परंतु ही घटना नंतर कशी इष्टापत्ती ठरली याचे वर्णन आहे... एकूणच पुस्तक वाचनीय आहे.. विविध किस्से असे पुस्तकाचे स्वरूप असल्याने कुठूनही पान उघडून वाचता येते... (सतत प्रश्न विचारणार्‍या पेशंटला डॉक्टरांनी दिलेली कंटाळून दिलेली उत्तरे आणि त्यातून निर्माण झालेला एक विनोद या पुस्तकात लिहिलेला आहे, तो अगदी एक नंबर आहे... मी तो वाचून बराच काळ हसत होतो..)...पुस्तकातील रेखाटने, छपाईचा दर्जा छान आहे...पुस्तक जरूर वाचा...

Sunday, June 8, 2008

पेशंटच्या नजरेतून रूट कॆनाल ट्रीटमेंट

फस्स...
कसलासा कडवट स्प्रे हिरड्यांवर आणि
वर आश्वासन " हे तर दुखणारच नाहीये"..
... मग डोळ्यांसमोर ती सुई नाचवत गोड हसणारा
तो माझा दु:खहर्ता...
गप्कन डोळेच मिटताना एक थंड सुईचा स्पर्श गाल आणि हिरडीच्या मध्ये
... मग खच्चून बोंबलताना
पुन्हा एकदा अनुभूती...
" साली झक मारली आणि इथे आलो"...
...आलेल्या मुंग्या , फुगलेला गाल, आणि ड्रिलची घरघर...
...देवा हे कधी संपणार ?...मला जीभ आहे का?
... घरघर घरघर पुन्हा पुन्हा घरघर.....विचित्र..डोकं बधीर...
छोट्या सुया, मोठ्या सुया..सतत खरवड आणि
सारखं "आ करा आ करा .."
... बरोबर
...मग सुया घालून एक्स रे...
फिल्म आत ..डोकं वर, मान खाली....
बीईईईईईप.....
एक्स रे...
..मग पुन्हा घरघर आणि खरवड...

"झालंच हां आता" चा जप..
कशाला खोटं बोलतो साल्या?..हे मनात...

मग कसल्याशा मशीनची बीपबीप...
ऍडव्हान्स्ड डेन्टिस्ट्रीच्या नानाची टांग...
फस्स... एक कडवट औषधाचा फवारा दातात, मग त्याच त्या गुळण्या...
.."हळू..."...
...
..झक मारली आणि आलो.
...हे कितव्यांदा...
मग एक पांढरं मातीसारखं ढेकूळ ...
दातात थापलेलं...
"झालं..."
छान....
... डोकं हलकं एकदम ...
अन खिसाही...

______________________________

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड...आणि वर जाताजाता ... छायाचित्रे...










मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो.... पाऊस पडून गेल्यावर अधिक छान वाटतो......
सिंहगड ओळखायची सोपी खूण म्हणजे टीव्ही टॉवर...त्या नारळाच्या झाडाच्या वरतीच डाव्या बाजूला गडावरच्या पार्किंगच्या वरच्या कड्याच्या दोन पायर्‍या आणि त्याच्यावर तो टीव्हीचा टॉवर...
गडाच्या मध्यभागी सुद्धा अजून एक टॉवर आहे....हे दोन्ही टॉवर या फोटोत दिसत आहेत...

पुढचे दोन फोटो गडाकडे जाताजाता रस्त्यावरती काढलेले आहेत..

शेवटचा फोटो...हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना ....
भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची.......

चाहूल... ...नाटक... १९९८

चाहूल

चंद्रलेखा प्रकाशित
चिरंतन निर्मित

दोन अंकी नाटक... चाहूल..

लेखक : प्रशांत दळवी
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
कलाकार : तुषार दळवी
सोनाली कुलकर्णी

कथासूत्र :
मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय...
मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते.... पावित्र्य म्हणजे काय?(किराणा सामान आणलेलं आहे...) त्यातल्या प्रत्येक चैनीच्या गोष्टीची ( शांपू, पावडर, बॊडी लोशन , डिओ स्प्रे वगैरे ) आपल्याला खरंच गरज आहे काय?...( मग थोडं फ़ार समर्थन सुरू होतं ) कदाचित आपली लाचारी, वाढत्या गरजा, आणि स्वप्नं त्याला दिसली होती .....सर्वच गोष्टींचं बाजारीकरण... गरज आणि चैन यातला फ़रक काय , गरज कुठे संपते आणि चैन कुठे सुरू होते??...दोघे दारू पिऊन बोलत राहतात... मग पुढेपुढे सगळे नैतिक अध:पतनाचं भाबडे, खोटे समर्थन करत करत दोघे झोपतात...... सकाळ होते, घाईघाईने आवराआवर , तयारी करत माधवी बाहेर पडते, बाहेर जाताना एवढंच विचारते " पुरेसे भांडलो ना रे आपण ?" तोही मोजकंच बोलतो ," तू नि:शंक मनाने जा... प्रामाणिकपणाची चैन परवडणारी नाहीये आपल्याला..."
ती गेल्यावर मात्र मकरंद पलंगावर कोसळतो आणि डोक्यावरून पांढरी चादर ओढून घेतो,आणि मागे सारे आकाश चिरून टाकणारा हा आवाज कसला येतोय? तो आतला आवाज तर नक्कीच नाही..
____________________-

मी हे नाटक पाहिलं त्याला आता १० वर्षं झाली... अजून तो शेवटचा सीन आणि अनंत अमेंबल यांचं शेवटचं संगीत आठवतं..... इतका परिणामकारक शेवट असलेलं अस्वस्थ करणार नाटक मी अजून पाहिलेलं नाही... मी एकटाच पहायला गेलो होतो, बरोबर कोणीच नव्हतं... अत्यंत अस्वस्थ होऊन, आत्ममग्न अवस्थेत थरथरत राहिलो होतो काही काळ... अध:पतनाचं समर्थन आपल्याला पटतंय की काय, या विचाराने चिडचिडच व्हायला लागली..हे आपलं अध:पतन म्हणायचं का नाटककाराचं यश? बराच वेळ झोप आली नाही... दुसया दिवशी मित्राला पूर्ण स्टोरी सांगितली , सर्व ग्रुप घेऊन पुन्हा ते नाटक बघायला गेलो... असं कुठे असतं का? असं कोणी करतं का ?हे नाटक आवडणारा माणूस स्वत: तरी असं करेल का? वगैरे वगैरे पुष्कळ प्रश्न मित्रांच्या चर्चेत पुढे आले...सगळ्यांची उत्तरं द्यायला मी समर्थ नव्हतोच...मी गप्प बसलो... accepting indecent proposal या घटनेपलिकडे जाऊन त्यातली चर्चा मनाला लावून घ्यायला कोणी तयार नव्हतं..
________________________

मग २००० साली पॉप्युलर प्रकाशनाने काढलेले नाटकाचे पुस्तक सापडले... त्यात संवादांपेक्षाही प्रशांत दळवी यांनी लिहितानाचे आणि नाटक स्टेजवरती आल्यानंतरचे काही अनुभव लिहिले आहेत... खास त्यासाठी हे पुस्तक घ्यायलाच पाहिजे..
त्या प्रस्तावनेतील काही खास भावलेली वाक्यं द्यायचा मोह इथे आवरत नाहीये...

"...मकरंद आणि माधवी.....स्त्रीत्त्व किंवा पुरुषत्व हे त्यांचं समसमान भागभांडवल होतं, बाकी बुद्धिमत्ता आणि अधिकाराच्या बाबतीत तर समानताच होती,त्यामुळे इथे कोणीच कोणावर अन्याय करायचा प्रश्न नव्हता..मकरंदच्या आग्रहाला बळी पडण्याइतकी माधवी भाबडी राहिली नव्हती किंवा फ़क्त माधवीच्या चैनी वृत्तीमुळे मकरंद असहाय्य होण्याइतका बिचारा उरला नव्हता. आंतरजातीय विवाह केला असला तरी दोघांची गरजेची जात एकच होती......"

चाहूलला विचारले गेलेले प्रश्न .... आणि लेखकाने दिलेली उत्तरे...

१. बॊस आला असता तर संघर्ष अधिक गडद झाला असता...
बॊसनं प्रश्न विचारणं फ़क्त एक निमित्त आहे..असा एखादा नैतिक प्रश्न अंगावर कोसळल्यावर वैचारिक बैठक पक्की नसेल तर चांगले वाईट ठरवायला आपण कसे असमर्थ ठरतो, कोणती भावनिक , नैतिक आणि बौद्धिक उलथापालथ होते त्याचं हे नाटक आहे...त्यात बॊस येतोच कुठे? आणि बॊस आला असत तर सगळा दोष त्याच्यावर ढकलण्याचा धोका होताच...
२. त्यांच्याकडे एवढी सुबत्ता असताना ह्या तडजोडीची गरजच का वाटावी?फ़ारच भाबडा प्रश्न झाला...फ़क्त गरीबच तडजोड करतात का? मग चंगळवादाचा जन्मच झाला नसता...
३.शेवट नकारात्मकच का?तिनं जायला नको होतं...नाटकानं एकतर मनोरंजन करावं किंवा प्रबोधन ..ही एक परंपरागत अपेक्षा आहे त्यामुळे नाटकाचा शेवट हे लेखकाचं मत मानलं जातं, यातून माधवीच्या जाण्याचं आम्ही समर्थन करतोय अशी गल्लत काही जण करून बसतात..उलट तिचं जाणं आम्हाला जास्त क्लेशदायक होतं..
आणि समजा असा एंड दाखवणं टाळलं असतं तर " चला कितीही भांडले तरी शेवट गोड झाला " असं मानत परिस्थितीतल्या कडवटपणाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाले असते...
४.एका रात्रीत, इतक्या कमी वेळात हा निर्णय कसा घेतला जाईल?ढासळण्याची प्रक्रिया फ़ार आधीपासूनच सुरू आहे,नकाराची शक्ती शोषून घेणारं एक मिंधेपण कधीच घरात शिरलं आहे... त्यामुळं हासाचा कालखंड लक्षात घेतला पाहिजे..
५. समस्या मांडणं पुरे झालं ..त्यावरचे उपाय सांगा ना...परिस्थितीचं निदान करणं त्यावर रोखठोक भाष्य करणं माझं कर्तव्य आहे... उपाय ज्यानं त्यानं आपापल्या ग्रहणशक्तीनुसार शोधायचा आहे..
चाहूल बघताना मकरंद माधवीच्या थरापर्यंत जाण्यापूर्वीच स्वत:ला थांबवावंसं वाटलं,आपल्या आयुष्यातल्या तडजोडी आठवून शरमल्यासारखं झालं, मनात काही खूणगाठ बांधावीशी वाटली, ऒफ़िसला एखादं खोटं बिल लावताना, एखादा काळा व्यवहार करताना मन थोडं जरी कचरलं तर त्याहून अधिक फ़लित चाहूलचं दुसरं काय असणार?कारण आज स्वत:ची स्वत:लाच लाज वाटणंयापेक्षा अधिक कोणती जागृती असू शकणार? नकारात्मक शेवट केल्याशिवाय ही सकारात्मक लाज येणार कुठून?
__________________________________________________________-

काही काळानंतर " कळा या लागल्या जीवा " नावाचे नाटक आले होते ... (प्रयोग छानच होता मी सुबोध भावे आणि शृजा प्रभुदेसाई यांनी केलेला प्रयोग पाहिला..... )
एका मित्राने सांगितले की त्याच्या लेखकाने चाहूलवर चिडून त्याला उत्तर देण्यासाठी हे नाटक लिहिले.... मी मोठ्या आशेने हे नाटक पहायला गेलो...( पण फरक इतकाच
१. चर्चेच्या वेळी दोघे दारू पीत नाहीत
२. ती त्याला सोडून जात नाही..शेवट गोड ...) बाकी सारे नाटक तेच्...मग एवढे मोठे नाटक परत लिहायचे कशाला?? असो.. तेही नाटक छान चालले , चालते आहे...

साठेचं काय करायचं...


साठेचं काय करायचं...

लेखक : राजीव नाईक...
दिग्दर्शक संदेश कुलकर्णी
कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष
निर्मिती :समन्वय पुणे...
( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.)
हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले..
क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले...

मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते.. ( निखिल माझा आवडता अभिनेता आहे, हे लक्षात घेतलं तर पाहिल्यानंतर अधिकच आवडेल हे निश्चित)..

या नाटकाला फ़ार मोठी सांगण्यासारखी गोष्ट अशी नाही...
अभय आणि सलमा या जोडप्याची ही गोष्ट ... अभय ऎडफ़िल्म्स बनवणारा, मिडिआमध्ये काम करणारा, थोडासा लेखक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह आणि सेन्सिटिव्ह आणि सलमा कॊलेजात शिकवते, इंग्लिशची प्रोफ़ेसर.....फक्त संवादांत येणारा साठे अभयचा मित्र ( किंवा अभयच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी म्हणूया हवं तर), साठे ऎवॊर्ड विनिंग डॊक्यूमेंटरीज बनवतो... आणि अभयला कुठेतरी सतत असं वाटत राहतं " आपण ऎडफ़िल्मवाले म्हणून साठे आपल्याला हिणवतो.." .. हे सगळं उगीच अभयला वाटतंय, साठेच्या हे गावीही नसणार कदाचित...अभय स्वत:ला फ़िल्ममेकर मानतो, त्याला साठेसारखं व्हायचंय पण त्याच्यासारखं यशस्वी होऊ न शकल्यामुळे तो त्याच्यावर जळतो..कंपूबाजीने आपल्यावर अन्याय केला नाहीतर कलाक्षेत्रात आपण कुठल्या कुठे पोचलो असतो असं त्याला वाटतं...पार्टीत साठेच्या होणाया कौतुकावर चिडतो आणि कंपूगिरीला शिव्या घालतो... आणि या प्रत्येक संवादात सलमा त्याला जाणीव करून देतेय की उगीचच साठेवर चिडचिड करायचं कारण नाही,, तुझे मित्र नाही तुझं कौतुक करत?..( तुमची तेवढी दोस्ती आणि त्याचा कंपू ?). एकदा साठेची फ़िल्म चालू असताना अभय दुसर्या एका मित्राला बू करायला लावतो , हे कळल्यावर पुन्हा वाद... सलमा त्याला सांगते, "तुझ्यात जेवढी टॆलंट आहे तेवढी लाव पणाला , असेलच स्पर्धा तर हेल्दी असूदे"... तरी अभयची चिडचिड चालूच...त्याची स्वप्नं म्हणजे वेल-इक्विप्ड स्टुडिओ, कादंबरी लेखन, फ़िल्म काढणे वगैरे...

अभय NFDC च्या फ़ंडिंगने एक फ़िल्म बनवू इच्छितो आणि त्यासाठी त्याची लाच वगैरे द्यायची सुद्धा तयारी आहे, हे दर्शवणारे सुंदर स्वगत आहे नाटकात..

नाटकात घडत फ़ारसं नाहीच... दहा प्रवेश आहेत नाटकात आणि बाहेर घडणाया घटनांवर दोघांच्या स्वभावानुसार रिपिटीटीव्ह त्याच त्याच प्रतिक्रिया...हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
हे झालं गोष्टीबद्दल...
दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांनी एकाच घटनेवर कशा प्रतिक्रिया द्याव्यात , आणि त्याचे संवाद कसे लिहावेत यासाठी ही संहिता अभ्यासण्यासारखी आहे... या संहितेचे पुन्हा पुन्हा वाचन करायला मला आवडते... नवनवीन काहीतरी सापडत राहते प्रत्येक वाचनात...

प्रत्येक सृजनशील माणसाचा एक साठे असतो....( मीही त्याच्याइतकाच टॆलंटेड आहे मग त्याच्यासारखं व्हावंसं वाटत असतं, त्याने आपलं कौतुक करावंसं वाटत असतं... पण त्याच्या सतत यशस्वी होण्यावर मात्र मनात असूया दाटत असते)..मलाही असं क्वचित कधी होतं , तेव्हा मात्र मी हे नाटक आठवून ही भावना बरीच कमी करण्यात यशस्वी होतो...
आणि या उलट कळत नकळत आपण स्वत: क्वचित कोणाचे साठे असू शकतो ... लेखकाने स्वत: लिहिलंय की सुरुवाती-सुरुवातीला त्याला स्वत:ला साठेशी जास्त आयडेन्टिफ़ाय करावंसं वाटलं होतं...

..
राजीव नाईक यांनी या पुस्तकाच्या शेवटी हे नाटक सुचताना काय मनात होतं त्याबद्दल लिहिलं आहे...त्यातल्या काही ओळी देतो इथे...
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

सध्या तरी नाटक स्टेजवर नाही, पण याचे निदान पुस्तक आवर्जून वाचावे असे आमचे सर्व नाटकवाल्यांना आणि लेखक मंडळींना सांगणे आहे...

बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.)

जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, पगार वाढत जात असतानासुद्धा काहीतरी करून दाखवण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडून अभ्यास चालू, मग तिथले मुंबईतल्या हॉस्टेलचे ,मित्रांचे खच्चून अनुभव...आय ए एस व्हायचा अभ्यास म्हणजे वेड्यासारखा १८-१८ तास अभ्यास , इतिहास,-तत्त्वज्ञान- शास्त्र एकदम तपशीलवार, मग कसल्या तरी विचित्र कारणानं नैराश्य, भयंकर दारू पिणे, प्रचंड सिगरेट, एकूणच सगळ्याचा काही उपयोग नाही असा साक्षात्कार, कशालाच काही अर्थ नाही छापाचे प्रचंड म्हणजे प्रचंड नैराश्य, वैफल्य आणि विचित्र अधोगती...मग काय वाट्टेल ते...

ही कादंबरी सॉलिड चक्रम आहे...एंटरटेनिन्ग आहे,प्रश्न पाडते.. तत्त्वज्ञानाचा कीस पाडते अधून मधून...
नायक हॉस्टेल मध्ये एकटा वगैरे असला की त्याला हे नेहमी पडणारे प्रश्न , मग मित्रांबरोबर चर्चा.... ...--- मी कोण आहे? कसा आहे?जगणं म्हणजे काय? तुझ्या माझ्या अस्तित्त्वाचं प्रयोजन काय?या सगळ्याचा अर्थ काय? वगैरे वगैरे... मग नील्स बोहर, श्रोडिंजर, आईनस्टाईन लोकांची मदत घेऊन आणि तत्त्वज्ञान वापरून प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न आणि मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...कादंबरीत अशा स्टाईलची वर्णनं वारंवार येतात....

...विविध स्त्रीव्यक्तिरेखा झकास जमवल्या आहेत विशेषतः पत्रकार स्त्री....अधूनमधून ( वाचकाच्या भुवया उंचावणारी आणि मराठीत क्वचित दिसणारी ) पेरलेली सेक्स वर्णने ही आहेत... प्रेमभंगाचे दु:ख आणि दारू सिगरेट व्यसन यांच्या परस्परसंबंधाबाबत किंवा आत्महत्या आणि एकूणच मानसिक विकृती यावरही काही चिंतने आहेत...

कादंबरीचे बरेच नाव ऐकले होते.....कोसला पार्ट टू वगैरे कौतुक (?) ऐकले होते....खूपच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या...वाचताना अर्थात बराच काळ या अपेक्षा टिकवून धरल्या कादंबरीने...
कोसला जरीला सारख्या नेमाडपंती लेखनाची आठवण पुष्कळ वेळा होते आणि वाचताना मजासुद्धा येते..... ( पण आपल्याला वाचताना निव्वळ स्टाईलची कॉपी म्हणून आवडतंय की कसे? तसे आवडावे का? :< हं..शेवटी कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...)/.. असो..
शेवटी शेवटी मात्र वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त नायकाची भलतीच वाहवत गेलेली गोष्ट अजिबात आवडली नाही...एवढा वेळ का हे वाचले, असे वाटले...( मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष... )

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...






२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती...
२० मे ते २४ मे २००६... या गोष्टीला बरोबर दोन वर्षे पूर्ण होत आहेत आणि तेंडुलकरांच्या दु:खद निधनाची बातमी समजली.
या कार्यशाळेदरम्यान तेंडुलकरांच्या पायाशी बसून काही शिकायची संधी मिळाली याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो...

त्यातल्याच काही आठवणी...
या कार्यशाळेसाठी मुंबई,पुणे बरोबरच सोलापूर, रायगड, नगर , औरंगाबाद, लातूर या ठिकाणांहून लेखक सहभागी झाले होते...
पहिल्याच दिवशी सर्वांची ओळख करून घेताना त्यांनी " तुम्ही सारे का लिहिता किंवा तुम्हाला पहिल्यांदा नाटक का लिहावंसं वाटलं? " या प्रश्नाबद्दल जरा सविस्तर बोला असं सगळ्यांना सांगितलं...त्यांनी सगळ्यांचं नीट ऐकून घेतलं... त्यांचा हा एक मला स्वभावविशेष जाणवला की "मी म्हणतो तेच खरं आणि तसंच सगळ्यांनी लिहायला हवं " असं चुकूनही त्यांनी कधी म्हटलं नाही..कोणत्याही शंकेवरती त्यांनी "याबद्दल माझा स्वत:चा एक अनुभव सांगतो त्यातून तुम्हाला काही लक्षात घ्यावंसं वाटलं तर बघा " असंच म्हटलं....

त्यांच्या लेखनप्रवासातला " शांतता कोर्ट चालू आहे " या एका महत्त्वाच्या नाटकाच्या लेखनाची सुरुवात कशी झाली याबद्दल त्यांनी खूप सांगितलं....
त्यांचं म्हणणं होतं की नाटककाराला लिहिता लिहिता पात्रं दिसली पाहिजेत, त्यांच्या हालचाली दिसल्या पाहिजेतच शिवाय ते ऐकूही आलं पाहिजे...सारी वातावरणनिर्मिती निदान लेखकाच्या मनात पक्की हवी...( त्यासाठी दिग्दर्शकाला उपयोगी पडणार्या रंगसूचना शक्य तेवढ्या स्पष्ट द्यायला हव्यात...आता दिग्दर्शक त्या किती वापरणार ते तो ठरवेल पण संहितेमध्ये तुमचे नाटक स्पष्ट हवं)...
कमीतकमी वेळात आणि कमीतकमी संवादात खर्या आणि सशक्त व्यक्तिरेखा तयार करणं हे नाटकाचं मोठं बलस्थान आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं...त्यासाठी त्यांनी अपर्णा सेनच्या " मिस्टर ऎंड मिसेस अय्यर" या फ़िल्ममधली बसमधील पात्रांची उदाहरणे दिली आणि ती फ़िल्म खास त्या सीनसाठी तिथे परत पहायला लावली....

त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ....लेखक सुरुवातीला आपापली पात्रे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये डोक्यात ठेवून गोष्ट लिहायला सुरू करतो, आणि ठरवलेल्या एका विशिष्ट शेवटाकडे जाण्याच्या दृष्टीने तो लिहित असतानाच कधी कधी जाणवायला लागतं की ते पात्र म्हणतंय मी नाही असा वागणार, मला वेगळं वागायचंय, पण मग त्यासाठी गोष्ट बदलली तरी बदलू द्या, नाटक लांबलं तरी लांबूद्या..., संपादन पुनर्लेखन या तांत्रिक बाबी नंतर हाताळा परंतु आधीच शेवट ठरवून नवनवीन शक्यता सोडून देऊ नका... मला हे फ़ार महत्त्वाचं वाटलं........

या चार दिवसांमध्ये चंद्रकांत कुलकर्णी, गिरिश जोशी , जब्बार पटेल, संदेश कुलकर्णी या मंडळींचंसुद्धा उत्तम मार्गदर्शन लाभलं... पुणे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात जाऊन आम्ही तिथल्या उत्तम छोटेखानी थिएटरात "शांतता कोर्ट चालू आहे " ही फ़िल्म पाहिली , दूरदर्शनवर फ़ार लहान असताना पाहिली होती...आणि त्यातल्या कडी लागण्याच्या दृश्याबद्दल तेंडुलकरांनी झकास स्पष्टीकरण दिलं

लेखक असूनही प्रत्येकाला नाटक तयार कसं होतं, सेट कसा लागतो, प्रकाशयोजना कशी ठरते, तालीम कशी होते हे ठाऊक असणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं त्यामुळे त्यांनी सर्वांना जसा येईल तसा अभिनयही करायला लावला...
शेवटच्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेदरम्यान तयार केलेल्या काही (सुमार) कथांचं रंगमंचावर सादरीकरण केलं तेही त्यांनी सहन केलं आणि छान करताय असं म्हणाले.

त्यांना शेवटच्या दिवशी एका सहभागी प्राध्यापकांनी असा प्रश्न विचारला "मला भटक्या लोकांसाठी जर नाटक लिहून सादर करायचे आहे आणि ते त्यांनी पहावे अशी फार इच्छा आहे...पण नाट्यगृहात तर ते येणार नाहीत, मग मी काय करू?"
त्यावर ते म्हणाले, " तुम्हाला एक गोष्ट सांगतो... मी अनुभवलेली..त्यातून तुम्हाला काही लक्षात येतेय का ते बघा..
मी जेव्हा एका नक्षलवादी भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या एका म्होरक्याने गावातली मंडळी जमवली आणि म्हणाला चला आपण एक खेळ खेळूया.... मी असणार जमीनदार आणि तुम्ही गरीब गावकरी..मग त्या जमीनदाराची ऍक्टिंग करणार्‍याने लोकांना शिव्या द्यायला सुरुवात केली , काहींना फटकावले... खेळ रंगायला लागला... एका क्षणी त्याने तिथल्या स्त्रियांची छेड काढली ( अभिनय) मात्र त्यानंतर लोकांमधील काही तरूण खवळून उठले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, काही फटके त्याने खाल्ले...मग त्याने हात उंचावून खेळ थांबवला........ त्याचे हे थिएटरच चालले होते पण ध्येय होते प्रस्थापितांविरुद्ध गरीब आणि वंचितांना पेटवण्याचे..... तो हे फार शिताफीने साध्य करत होता.
...
नक्षलवाद आणि राजकीय संदर्भ इथे बाजूला ठेवू थोडा वेळ... म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच,नाटक कुठेही घडू शकते.
यातून शिकायचे काय? भटके नाट्यगृहात येऊ शकत नसतील तर तुमच्या नाटकाने त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे"

अगदी जाताना पुन्हा तीन महिन्यांनी कार्यशाळा परत घ्यायचं ठरलं ,तुम्ही आपापली नाटकं लिहून आणायची.. कोणत्याही समीक्षकाला बोलवायचे नाही, आपणच आपापल्या नाटकांचे समीक्षण करू असं स्वत: तेंडुलकर म्हणाले...
आता मात्र या कार्यशाळेचा योग कधीच येणार नाही...

लक्ष्य सिनेमा... जून २००४

लक्ष्य सिनेमा मला बरा वाटला...


..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______
ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी....
मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला...
( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे)

हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...)

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे... शेवट असा का?

१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या...
माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे...

आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्‍या नवर्‍याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्‍याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल...
...
ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते....
-------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे...
----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल??

आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत
" याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेड*वाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...

म्हणजे आता काय झालं ?
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?

महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट...
( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..

Sunday, May 18, 2008

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं....

.....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंबिवलीतल्या एक शाळेचे वर्णन असावे...) हा बर्यापैकी हुशार आहे परंतु त्याचा एक मित्रांचा ग्रुप आहे, त्यात सारे अभ्यासू नाहीत.पण ग्रुप मजेदार आहे. (एकाला शास्त्रद्न्य व्हायचे आहे, एकजण श्रीमंत पण अजिबात अभ्यास न करणारा आणि आडदांड आहे, एकजण संध्याकाळी मंडईत भाजी विकणारा..वगैरे) हा ग्रुप टाईमपास करायला शाळेआधी रोज त्या रस्त्यावर बिल्डिंगवर बसतो आणि विविध विषयांवर चर्चा होते तिथे...त्यात मास्तर मास्तरणींना टोपणनावे ठेवणे, त्यांच्या जोड्या जुळवणे,काही मुलींना चिडवणे, मग आवडणार्या मुलीचा माग काढणे, तिला पटवण्याचे विविध प्रयत्न, "कोणतातरी क्लास लाव, आता दहावी आली" वगैरे घरून येणारे प्रेशर, ...वगैरे..

गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्‍या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे....
..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्‍यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो...
.......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले....
....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...

»
....................शिवाय शाळा भरल्यानंतरचे शाळेतले वातावरण, मोजके आवडते शिक्षक , खाष्ट मास्तरीण, कोणीही "डाउट खाउ नये" असे शिताफ़ीने आवडत्या मुलीकडे पाहणे, १४ -१५ वयाच्या या मुलांचे विविध लैंगिक प्रश्न, प्रत्येकाचा त्याकडे पहायचा आपापला द्रुष्टिकोन, अत्यंत चावट ( काहींना भयंकर वाटतील अशा) कोमेंट्स, हिरीरीने म्हटली जाणारी अश्लील गाणी....वर्गातून ओफ़ तासाला पळून जाणे; त्याचे परिणाम भोगणे, सामुदायिक कवायत, प्रार्थना, प्रिंसिपलच्या शिक्षा...
.....या सार्याला थोडी आणीबाणीची पार्श्वभूमी.....असो.... फ़ार सांगणे रसभंग होईल...ही कादंबरी वाचाच....
१९७५ सालीही शाळेत वापरला जाणारा "लाईन देणे" हा शब्द मी शाळेत असताना (’८९ साली नववीत) फ़ेमस होताच...म्हणजे मुलीला थेट समोर जाऊन विचारणे की ," का गं तू मला लाईन देते का?"....अहाहा...."मला लाईन देते का? " हा हा हा...( विकट हास्य).. हा शब्दप्रयोग किती जुना आहे कोण जाणे? आणि सध्या कोणता शब्द वापरला जातो मला ठाऊक नाही....

लेखकानं हे सारं कसं बिनधास्त अगदी खरं खरं लिहिलं आहे... वाचत असताना आपण त्या शाळेमधून सफ़र करून येतो..."शाळेत गेलेल्या सर्वांना" पुस्तक अर्पण केले आहे....पुस्तक मी एका बैठकीत संपवले... वाचताना मला माझ्या शाळेची फ़ार आठवण झाली...आमची शाळा all boys होती...( अर्थात सतलज हे आमचे टोपण नाव आहे). पोरे एक से एक सवाई वाईट होती, शिवीगाळ - मारामार्या यात पटाईत,( माझ्या वर्गात रिमांड होम मध्ये काही दिवस राहून आल्याचे अभिमानाने सांगणारा एक मुलगा होता सातवीत),..होती,चांगली थोडी होती, आम्ही होतोच की...मास्तर मन लावून शिकवणारे थोडे होते...म्हणजे सगळे नेहमीसारखेच.......पण हे पुस्तक वाचेपर्यंत मला माझ्या शाळेचा आणि तिथे असलेल्या किंवा बर्याचशा नसलेल्या शिक्शणाचा थोडा गंड वाटत असे...आता वाटत नाही....खरंतर आमची शाळा अगदी कादंबरीत लिहिल्यासारखीच होती ....मग खरंतर तिला वाईट कशाला म्हणायचे? बर्याचशा शाळा अशाच असतात....सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे...

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.

तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.

ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.

१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....

पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...

२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्‍याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्‍याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?

३. मग एखाद्या बलात्कार्‍याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्‍या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.

४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?

५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...

या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्‍याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..

खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )

नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...

दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत
म्हणून केली गेलेली जबरदस्ती दुर्लक्षणीय ठरते?मला नाही वाटत...
उलट लग्नापूर्वी हा भाई असा वागतो, माझ्या मतांना याच्या लेखी काडीची किंमत नाही, तर नंतर कसा वागेल...असा विचार येऊन मी असल्या बॉयफ्रेंडला अगदी लई वेळा लाथ घातली असती...
... असो...
मात्र "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते" असं मानण्याचा एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा माझा हेतू नाही
गंमत अशी की हे नाटक करणारे लोक "तो वाईट नाहीच, त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडलेली आहे " या गोष्टीपलिकडे जायला तयार नाहीत.... आधी आपले पात्र कसे आहे , कितपत वाईट आहे, दुष्ट आहे, हे ऍक्सेप्ट करणे आवश्यक आहे, एकदा विषय धाडसी निवडल्यानन्तर मग पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही, ( तो चांगलाय, चांगलाय, मला समजून घ्या वगैरे)...त्यामुळेच विचार करणार्‍या प्रेक्षकाला आदिला इतरांनी सहानुभूती देण्याचे कारण कळत नाही...

त्याच्या चुका काय आहेत हे तरी त्यांना क्लीअर नको का...क्लिप स्प्रेड होणे यापलिकडे त्यांना आदिची चूक वाटत नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे..... निदान त्याला एखाद्या पात्राने त्याच्या महत्त्वाच्या चुकांची ( १.जबरदस्ती + २.नकळत चित्रण) जाणीव तरी करून देणे आवश्यक होते....तेही नाही...
(हे लोक पात्राला सहानुभूती अशी देत होते की जणू १. चित्रण भलत्यानेच केले आहे, दोघांच्या नकळत आणि मग क्लिप स्प्रेड झाली आहे.
२. याने जबरदस्ती केली नाही... दोन कन्सेंटिंग ऍडल्ट्स मधलं मॅटर ....)....

त्यामुळे स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती , असा गंभीर विषय त्यांना दाखवायचा नसावा, आणि मनात असले तरी झेपला नसावा असे मला वाटते..

आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

" ए ऊठ ए... बघ .. आनंद जिंकला... "
... सकाळी सकाळी विश्वेश हातात टाईम्स नाचवत ओरडत होता.... बातमी वाचताच मीही नाचू लागलो....सालं गेलं महिनाभर ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते घडलं होतं...आनंदने कास्पारोवला हरवलं होतं...

सप्टेंबर १९९५ मध्ये वर्ल्ड नंबर वन होण्यासाठी आनंद कास्पारोव्हच्या लढती चालू होत्या...फिडे मधून फुटून कास्पारोव्हने स्वतःची प्रोफेशनल चेस असोसिएशन काढली होती आणि न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ही लढत चालू होती... बेस्ट ऑफ २० मॅचेस ... कास्पारोव्ह एकदम जोरात होता....अजिबात म्हणजे अजिबात हरायचा नाही कुठेही...
आणि उत्तम खेळाडू असण्याबरोबरच दबावतंत्रात फार वाकबगार होता ... म्हणजे मॅच सुरू होण्या आधी प्रेशर आणणारी स्टेटमेंट्स देणे वगैरे ....
१९९३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल आधीच कास्पारोव्ह म्हणाला होता, " माय नेक्स्ट अपोनंट विल बी नाय्जेल शॉर्ट , अँड मॅच विल बी व्हेरी शॉर्ट..".... आणि फायनल ला त्याने शॉर्टला आरामात हरवलं होतं...( बहुतेक १२.५ - ७.५ असं)
...
मी तेव्हा डेन्टिस्ट्रीच्या तिसर्‍या वर्षात होतो...
विश्वेशची आणि माझी पैज लागली होती , तो म्हणाला होता, कास्पारोव्ह आनंदचा धुव्वा उडवणार....मी म्हणत होतो, आनंद टफ फाईट देणार्...आम्ही हॉस्टेलमध्ये रूममेट होतो...डीडी वर मॅचेस होत्या पण आम्ही रूमवर टीव्ही बाळगून नव्हतो...रोज टाईम्समध्ये येणारी बातमी आणि रघुनंदन गोखले यांचे परीक्षण यावरच आमची भिस्त होती...
पहिल्या आठ मॅचेस ड्रॉ झाल्या होत्या .... तसं आश्चर्यच होतं... कास्पारोव्ह इतका वेळ प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेण्यात वाया घालवत नाही... इतका वेळ खडाखडी झाल्यावर चक्क नववा गेम आनंद जिन्कला होता....
आनंद ५ गुण कस्पारोव्ह ४ गुण..... आनंद आघाडीवरती....दिवसभर खुशीत फिरलो भरपूर.....

आज नेटवर फिरता फिरता भटकंतीत यूट्यूबवरती आनंदचा हाच तो नववा गेम आणि त्याचं ऍनलिसिस सापडलं.... (कॉमेंट्री जरा भडक ओवरेक्सायटिंग आहे, पण गंमत आहे....)
कास्पारोव्हचे दबावतंत्र, स्टाईल्स, मध्येच उठून जाणे, ऍक्टिंग आणि त्या तुलनेत आनंदचे शांत, काहीसे नवखे हावभाव बरेच सांगून जातात... मॅच हारल्यानंतर तर कास्पारोव्हचे अस्वस्थ होणे आणि आनंदचे मनःपूर्वक शांत राहणे पाहून फार बरे वाटले...

http://www.youtube.com/watch?v=FutTQZfFDuI नवव्या गेमचा हा भाग एक

http://www.youtube.com/watch?v=nrkh9zCAWSo नवव्या गेमचा हा भाग दोन

मात्र आमचा आनंद फार काळ टिकला नाही... दुसर्‍याच दिवशी कळले की कास्पारोव्हने दहाव्या गेममध्ये पांढर्‍या मोहर्‍यानी आनंदला हरवले.... डिवचला गेलेल्या कास्पारोव्हने तो गेम अगदी खुन्नसने खेळला होता, आणि आनंदला काहीही संधी दिली नव्हती... मला आठवतेय रघुनंदन गोखले यांनी त्यांच्या परीक्षणात लिहिले होते की ही सेट द बोर्ड ऑन फायर...( हा दहावा गेमही यूट्यूबवर सापडतो दोन भागात).... मग अकरावाही जिंकला.... बाराव्या गेममध्ये कास्पारोव्ह जिन्कायचाच पण आनंद कसाबसा निसटला... ड्रॉ झाला...आनंद मग तेरावाही हरला आणि पुढच्या सगळ्या ड्रॉ होत गेल्या... आनंद हरला ती मॅच पण काय फाईट दिली त्याने....

मला आधी चेसमधले पीसेस आणि त्यांचे चलन सोडता फारसे कळत नव्हते पण १९९५ च्या त्या सप्टेंबरपासून मला चेसचा बराच नाद लागला, ( चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, गेम सुरू होण्या आधी कास्पारोव्हची सर्व पीसेसना हात लावून नीट ठेवायची स्टाईल मारणे..असे बराच काळ चालले)...पुढचे सहा महिने माझ्या डोक्यावर हे भूत स्वार होतं... म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं....

या यूट्यूबने त्या धमाल दिवसांची आठवण करून दिली ....... आता विश्वेशला कळवायला हवी ती यूट्यूबची लिन्क... उद्या सकाळीच फोन करतो.
इथे कोणाला आठवताहेत का ते दिवस?

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये... हे सारे तुम्ही घडवून आणणार आहात , अर्थात आमच्या म्हणजेच..भडकमकर क्लासेस च्या मार्गदर्शनाने..


इथे मात्र समीक्षकाच्या बरोबर उलटा ऎप्रोच घ्यावा लागतो त्यामुळे कोर्स निवडीचे काम काळजीपूर्वक केलेल्या कल चाचणीतूनच होते...काही विशिष्ट गुण लहानपणापासूनच असावे लागतात.
१. ही पोरे भरपूर मित्रपरिवार राखून असतात, अडीअडचणीला माज न करता मदत करतात.
२. कोणत्याही मास्तरांना नडत नाहीत, सारखे प्रत्येकासमोर you are the best teacher असे कौतुक करतात...
३. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगायची बोलबच्चनगिरी त्यांना चांगली जमते..
४.त्यांना कोणत्याही दर्जाहीन गोष्टीला प्रोत्साहन द्यायला आवडते.....

आता इव्हेंट मॆनेजर म्हणजे ....कोणत्याही कार्यक्रमात कार्यक्रम ठरवण्यापासून तो सुरळीत पार पाडेपर्यंत राबणारा व्यवस्थापक...( म्हणजे त्यात मांडववाले, ध्वनिव्यवस्था, वाहतूक व्यवस्था,लायटिंग, खुर्च्या, भारतीय बैठक,तिकीट छपाई आणि तिकीट विक्री,पूर्वप्रसिद्धीसाठी ब्रोशर्स, हॆंड्बिले, वर्तमानपत्रातली जहिरातवाले, व्हिडीओ शूटिन्ग वाले, स्टिल फोटोग्राफीवाले,, रंगमंच सजावटवाले , फ़ूल/हार/नारळ/बुकेवाले,तसबीर, फ़ीत , समई, पूजासाहित्यवाले, मध्यंतरातला चहा, कार्यक्रमानंतरचे जेवण वगैरेची व्यवस्थावाले या सर्व लोकांशी समन्वय साधून न चिडता कामे करवून घेणे म्हणजे उत्तम व्यवस्थापन )...योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो...


सुरुवात करणायांसाठी टिप्स....
१. सोसायटी / कॊलनीचा गणेशोत्सव , किंवा छोटी स्नेहसंमेलने यांच्या व्यवस्थापनाने सुरुवात करावी..शालेय वयात उमेदवारी व्हायला हवी..
२.. नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यात कोणीतरी गायक, कवि असतातच.. त्यांचे काव्यगायन न थकता ऐकावे..... विशेषत: लहान मुले, त्यांचे ते डान्स, अभिनयाच्या नावाखालची त्यांची ती दिव्य नक्कल यांचे अगदी विनम्रपणे साळसूद भाव चेहर्यावर आणून वारेमाप कौतुक करावेआणि त्याच वेळी यांनी स्वत:ची कला जनतेपुढे मोठ्या कार्यक्रमातून आणणे कसे आवश्यक आहे असे एक पिलू त्यांच्या बापांच्या डोक्यात अलगद सोडून द्यावे......
त्यासाठी काही वाक्यांचे संच>..." बबडू काय सुंदर नाचतो, त्याला तुम्ही खरंतर नीट ट्रेन केलं पाहिजे... त्याला तुम्ही एकापेक्षा एक ला पाठवाच...जिंकून येईल जिंकून...आहात कुठे? फ़क्त कार्यक्रमांचा, प्रेक्षकांचा सराव हवा हां "" बेबी काय गाते हो, प्रतिलताच.... तिला निदान वाद्यवृंदात तरी गाऊन पहायची सन्धी दिलीच पहिजे... अहो प्रोग्राम्स केल्याशिवाय जनतेपुढे टॆलंट येणार कसं?" " काका, तुम्ही मैफ़लींमध्ये काव्यवाचन करता का?.. काय सांगता? नाही?.... खरंच नाही? विश्वास बसत नाही हो...खरंच तुम्ही काव्यगायन करा...आजकाल अशी सशक्त कविता कुठे ऐकायला मिळते?"मग हे लोक विचारतात, " अरे पण तो कार्यक्रम कसा करतात वगैरे आम्हाला... म्हणजे त्यातलं काही समजत नाही रे..."...."काही घाबरू नका हो, मी कशालाय मग? आपणच तो कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फ़े करू , फ़क्त थोडा खर्च येईल...." अशी टोलेबाजी जिथे जाता तिथे करत राहिलात तर पोरासाठी खर्च करणारे असले दोन चार बाप सापडतील, मग संस्थेचं नाव ठरवायचं आणि बघता बघता तुमच्या संस्थेचा पहिला जाहीर कार्यक्रम होऊनही जाईल...

आता काहींना असे वाटते की इतक्या फ़ालतु कलाकाराचे कौतुक मी केले तर माझा दर्जा एक रसिक म्हणून घसरत तर नाही ना ? एक लक्षात घ्या, तुम्ही रसिक बनायला आलाय का इव्हेंट मॆनेजर व्हायला?? उगीच दोन गोष्टींची गल्लत करू नका...खर्‍या इव्हेंट मॆनेजर चा प्रोत्साहनाने अनेक कलाकार घडतात यावर विश्वास असतो..

३.सुरुवातीच्या काळात हौशी आणि श्रीमंत मंडळी हे आपले टार्गेट .... व्यावसायिक मंडळींचा माज आपल्याला सुरुवातीला परवडणारा नाही... आणि होतकरू, गुणी परंतु गरीब कलाकारांकडून काही फ़ायदा नाही त्यामुळे त्या वाटेला न गेलेलेच बरे..

४.जनसंपर्क उत्तम हवा.... स्थानिक वर्तमानपत्रातले सांस्कृतिक वार्तांकन करणारे वार्ताहर, जहिरातवाले, स्थानिक पुढारी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लोक , नाट्यगृह व्यवस्थापक, मांडव आणि ध्वनिव्यवस्थावाले कंत्राटदार, ट्रान्स्पोर्ट वाले, स्थानिक पोलीस ओफ़िसर,स्थानिक बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष ..कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही... यातल्या सर्वांना आपापल्या सर्व कार्यक्रमांना आमन्त्रित करावे आणि आलटून पालटून एकेकाला आपापल्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा / अध्यक्ष म्हणून बोलवावे.

५.. मग स्पर्धा भरवायच्या...गायनस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, वाद्यवादन स्पर्धा, पोवाडास्पर्धा, अभिनयस्पर्धा, रांगोळीस्पर्धा,या असल्या फ़ुटकळ स्पर्धा तर शाळेच्या सुटीमध्ये वगैरे जाम हिट होतात ....गृहिणींसाठी पैठणीवाटपाच्या होम मिनिस्टर स्पर्धा घ्यायच्या...शिबिरं भरवायची.. अभिनय, नाट्यप्रशिक्षण, जन्गल भटकन्ती, प्रस्तरारोहण..सुगम सन्गीत गायन, कराटे प्रशिक्षण वर्ग, ताएक्वोन्दो वगैरे...

६. हे कवी आणि अभिनेते स्वत:ची ’एक कलाकार म्हणून ओळख घडवायच्या मागे असतात... या रेकग्निशन साठी काहीही करायला तयार होतात...एक उदाहरण देतो.या कवि वगैरे मंडळींना मोठ्या कार्यक्रमात काव्यगायन करायची आणि पुरस्कार वगैरे मिळवायची फ़ार हौस असते...मग असल्या लोकांची यादी मिळवून त्यांना घरी पत्रे धाडायची,.." आपणास अमुक अमुक संस्थेचा कविमित्र / जनमित्र / कामगार मित्र / खरा कलाकार पुरस्कार मिळालेला आहे, तरी त्यासाठी कृपया रु.५००/- खालील पत्त्यावर पाठवा... ( हसू नका, बरेचसे लोक पाठवतात पैसे)...मग त्या पैशांमधून एक स्वस्त रंगमन्दिर किंवा शाळेचा हॊल दिवसभरासाठी मिळवायचा... कवी मंडळींना दिवसभर काव्य म्हणत बसवायचं आणि सन्ध्याकाळी एक कवी आणायचा आणि त्याच्याहस्ते ते कविमित्र पुरस्कार ( ३० रुपयंचे मेडल आणि १० रुपयांचे सर्टिफ़िकेट) वाटून टाकायचे..पुरस्कार मिळवून सर्व कवी खुश, त्यात रेकग्निशन आणि काव्यगायनाचे व्यासपीठ.....बोलायलाच नको... शिवाय आपला एक सक्सेसफ़ुल इव्हेंट सुद्धा झाला...आता यात दूरदूरच्या कवींकडून प्रत्येकी ५०० रु घेऊन कार्यक्रम रद्द करणारे अत्यंत वाईट इव्हेंट मॆनेजर असतात , पण आपण तसले शिकवणारे क्लास चालवत नाही... तत्त्व म्हणजे तत्त्व.

७.आता अत्यंत महत्त्वाचे .... पॆकेजिंग...कार्यक्रम साधारण तोच पण पॆकेजिंग बदललेले... हा प्रकार उदाहरणार्थ वाद्यवृंदांमध्ये फ़ार छान करता येतो ...मराठी वाद्यवृंदांमध्ये ठराविक तीच तीच गाणी परत परत वाजवली जातात.. पण दर वेळी त्या कार्यक्रमाला वेगळी नावे देऊन सादर करावेत... म्हणजे एकदा बाबूजींची गाणी, मग गदिमांची गाणी, एकदा गीतरामायण ........किंवा आठवणीतली गाणी ( फ़ेमस लोकांचे स्म्रुतिदिन घेउन त्याप्रमाणे गाणी ),, ऋतूंप्रमाणे गाणी, श्रावणातली गाणी, थंडीची गाणी, तमाशाची गाणी,चंद्राची / चांदण्याची गाणी कोजागिरीच्या दिवशी बरोबर दूध फ़ुकट असले टुकार उपक्रम राबवावेत... लोकांना मजा येते... आपण रसिक वगैरे झालो असे वाटते त्यांना..गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये सिनेमा आणि नाटकातले विनोदी कलाकार आणून त्यांच्याकडून नाटुकली बसवून घ्यावीत .... हे असले विनोदी प्रकार लोकांना फ़ार आवडतात.... शिवाय त्या विनोदी नाटुकल्यांमध्ये कार्यक्रमाच्या प्रायोजकांची नावे घुसडावीत....

८. कोणत्याही प्रकारच्या निवडणुका जवळ आल्या की आपला सीझन सुरू होतो....आपापल्या वॊर्डातल्या / मतदारसंघातल्या ज्येष्ठ जाणत्या मतदारांना फ़ुकट कार्यक्रम दाखवून रिझवायला पुढार्यांना अनेक कार्यक्रमांची गरज असते.... नाटके, तमाशे, गाण्यांचे वाद्यवृंद, नकलांचे कार्यक्रम... शिवाय छोटे मोठे नटनट्या पैसे घेऊन प्रचारफ़ेर्यांमध्ये भाषणे करायला / अभिवादन करायला (हात हलवायला ) आणणे

९. जालावरच्या ऒर्कुट फ़ेसबुक आणि काय काय नवनवीन येणाया नेटवर्किंग कम्युनिटीज मध्ये घुसावे... हौशी ( आणि श्रीमंत ) कलाकार मंडळी शोधून काढून सम्पर्कात रहावे.... शिवाय अमुक कवीचा फ़ॆन क्लब, तमुक गवयाचा फ़ॆन क्लब असल्या कम्युनिटीज शोधून त्यांच्यातर्फ़े कार्यक्रम करावेत...सम्पर्कासाठी या जालाचा भयानक फ़ायदा आहे.

१०. हौशी नट लोकांना वाट्टेल ती बिले लावावीत..... उदा. प्लॅन पूजा २०० रु.; वाहतूक खर्च ५०० रु; सेटचा खर्च ४००० रु; पोलीस कमिशनरकडून मिळणार्‍या सार्वजनिक प्रयोगाच्या परवानगी साठी नक्की किती पैसे घ्यायचे असतात ते कोणालाच नीट ठाउक नसते, तिथे ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत काहीही आकडा टाकावा...व्यवस्थापन १००० रु. वगैरे वगैरे....हे हौशी ( आणि श्रीमंत ) लोक फारशी खळखळ न करता लगेच बिल चुकते करतात.

या गोष्टी करेपर्यन्त तुम्ही थोडे प्रस्थापित आणि अनुभवी इव्हेन्ट मॆनेजर होऊ लागला आहात ....
मग तुमच्या संस्थेच्या नावाने पुरस्कार सन्ध्या आयोजित करायची .सद्ध्याची नवीन फ़ॆशन म्हणजे एकाच वेळी अनेक पुरस्कार वाटायचे आणि त्यानिमित्ताने भरपूर फ़ेमस माणसे बोलवायची... किंचित नट गायकाला बालगन्धर्व पुरस्कार , आत्ता मिसरूड फ़ुटलेल्या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याला एकदम चिन्तामणराव कोल्हटकर पुरस्कार, आत्ता पदार्पण केलेल्या अभिनेत्रीला स्मिता पाटील पुरस्कार अशी वाट्टेल तशी फ़टकेबाजी झाली तरी चालते...लोक प्रेमाने सहन करतात..पण या आठ दहा पुरस्कारांच्या गर्दीमध्ये स्थानिक कलाकारांना पण बक्षीसे द्यायला विसरू नये...स्थानिक अभिनेते, लेखक वादक, गायक यांच्याबरोबरच काही हटके पुरस्कारही द्यावेत...उदा. तुमच्या गल्लीत श्वानप्रशिक्षण देणार्या माणसाला " विष्णुपंत छत्रे" पुरस्कार, किंवा सिनेमात बैलाला पळायला शिकवणार्याला "मनेका गांधी प्राणिमित्र " पुरस्कार....सर्वांसाठी विन विन सिचुएशन म्हणजे काय , ते या पुरस्कार सन्ध्येच्या उदाहरणातून कळेल...

या पुरस्कारांचे एक बरे असते, सगळे सुखी होतात...या फ़ेमस मंडळींमुळे वर्तमानपत्रात ,स्थानिक केबलटीव्ही वर, मराठी न्यूज चॆनलवर आपल्या सन्स्थेची मजबूत प्रसिद्धी होते ... आता हे पुरस्कार घेताना येण्यासाठी सुद्धा तारे तारका वाजवून पैसे घेतात , ती गोष्ट वेगळी पण आपला स्पॊन्सर तगडा असतोच की... उदाहरणार्थ बिल्डर, स्थानिक नगरसेवक/ आमदार- त्यांचा काळा पैसा पांढरा होतो, त्यांना स्टेजवर बसवून त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांच्या व्यवसायाला आवश्यक अशी प्रसिद्धी मिळते..प्रेक्षकांनाही इतके महान कलाकार आपापल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्या गावात आले याचा आनंद होतो..दर वर्षी असल्या पुरस्कार सन्ध्या आयोजित कराव्यात.


व्यावसायिक इव्हेंट्स....आपापल्या व्यवसायात अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना तुम्ही कौशल्याने बाहेर काढू शकता...
उदाहरणार्थ...

१. एका शिम्प्याचा धंदा नीट चालत नाही...तर या फ़ॆशन डिझायनराच्या बुटीकच्या नावाने मोठा फ़ॆशन शो आयोजित करावा.... त्यात होतकरू मॊडेल म्हणून जवळच्या कॊलेजातील प्रेमात पडलेली युगुले घ्यावीत... ( स्थानिक मधु-मिलिंद, यांना वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत आणि सर्व कष्ट एकमेकांच्या सहवासासाठी ते आनंदाने करतात) कोरिओग्राफर स्वस्त शोधावा आणि उडवावा इव्हेंट्चा बार..... दोन वर्षांत या शिम्प्याची मुंबईत दोन सरकारमान्य फ़ॆशन डिझायनिन्ग ची कॊलेजे होतात की नाही बघा...
उदा. २... एखाद्या ट्रॆव्हल कम्पनीला आपला विस्तार वाढवायचा आहे, त्यासाठी पुरस्कार सन्ध्या आयोजित करा, त्याच वेळी कोणता अभिनेता किंवा खेळाडू तुमच्याबरोबर टिम्बकटू ला येणार, कोणते कोणते खेळ खेळणार ते वर्तमानपत्रात स्पॊन्सर्ड बातम्यांनी जाहीर करा... (अमुक अमुक भाउजी स्वत: येणार आणि बायकांबरोबर खेळणार, पैठण्या वाटणार...वगैरे)... किंवा कम्पनीच्या मालकीणबाईंना आठवड्याला सात आठ वर्तमानपत्रांमध्ये लेख पाडून द्यायला एखादा सेमिप्रोफ़ेशनल लेखक उपलब्ध करून द्या, त्याबदल्यात त्याला कन्सेशनमध्ये भीमाशंकर टूर द्यायचं आश्वासन द्या..
उदा .३ .. एखाद्या डॊक्टराचा जम बसत नाहीये.. मग काय करणार? करेक्ट... एका आमदाराच्या वाढदिवशी हॊस्पिटलाशी टाय-अप करून रक्तदान शिबिर घ्या किंवा फ़ुकट आरोग्य तपासणी शिबिर घ्या....

अशा प्रकारे कोणत्याही व्यवसायासाठी इव्हेंट घडवता येतो ...तुमच्याकडे कोणत्याही व्यवसायातील माणसे येवोत...... हिप्नॊटिझमवाले, मंत्रतंत्रवाले (गंडेदोरेवाले / ताईतवाले / जादूचे प्रयोगवाले), ज्योतिषवाले ( सनसाईनवाले / मूनसाईनवाले / जोक सांगणारे/ पत्रिकावाले), , मालिशवाले ( जपानी मसाजवाले / केरळीमसाजवाले / तेलवाले / बिनतेलवाले ), स्मरणशक्तीचे प्रयोगवाले,व्यायामशाळावाले ( वजन उतरवावाले / आहार नियमनवाले / देशी-तालीमवाले / ट्रेडमिलवाले ), योगावाले ( आसनवाले /ध्यानधारणावाले / कुंडलिनीवाले / निसर्गोपचारवाले / मनशक्तीवाले / आर्ट ऒफ़ लिव्हिंगवाले ) रेस्टॊरंटवाले ( उडपीवाले / टपरीवाले / वडापाववाले / अमृततुल्यवाले / बारवाले / भेळ- मिसळपाववाले / थ्रीस्टार-फ़ाईव्ह्स्टारवाले ) शाळा - कॊलेजवाले (बालक मंदिरवाले / कॊन्वेंटवाले / मेडिकल, इन्जिनियरिंगवाले / मॆनेजमेंटवाले ) , पर्यावरणवाले ( सर्पमैत्रीवाले / वुई लव्ह डॉग्जवाले /वृक्ष वाचवा वाले / पक्षीमित्रवाले ), समाजसेवावाले ( एड्स-जागृतीवाले / अनाथालयवाले / शस्त्रक्रिया मदत वाले) बँकवाले (पतपेढीवाले / सावकारीवाले / क्रेडिट-कार्डवाले ) इन्शुरंसवाले ( एल आय सी वाले / परदेशी कम्पनीवाले/जीवन बीमा वाले/ जनरल -घर्,हेल्थ्,पीक्,नैसर्गिक संकट वाले), ,क्लासवाले ( दहावी बारावी वाले / कम्प्यूटर क्लासवाले / मेडिकलवाले / आय आय टी वाले) डॊक्टर ( ऎलोपथीवाले / होमिओपथीवाले / यूनानीवाले / पंचकर्मवाले / बाराक्षारवाले / डेंटलवाले / मेंटलवाले / स्त्रीरोगवाले/ रक्त लघवीवाले / हाडवैदू / डोळावाले ) कामजीवनवाले ( तरुणांचे /चाळीशीनंतरचे / बालपणीचे / ब्रह्मचार्‍यांचे ) या सर्व व्यवसायांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी इव्हेंटचे व्यवस्थापन शिकवू..


ऎडव्हान्स्ड कोर्ससाठी..यात वेगळे काही करायचे नसते.. तत्त्वे तीच फ़क्त कॅनव्हास मोठा.... अमराठी, बहुभाषिक आणि हिंदी जनतेसाठी , जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी ,

टीव्ही हक्क, मोठ्या वर्तमानपत्रांना माध्यम प्रायोजक म्हणून निवडणे..

फ़ुटकळ नटनट्या गोळा करून त्यांना फ़ुटकळ प्रॉडक्ट्सचे ( उदा. घड्याळ, शांपू, मीठ, सॉफ़्ट ड्रिंक वगैरे )ब्रँड ऍम्बॆसिडर बनवणे
मोठ्या मोठ्या पत्रकारपरिषदा आयोजित करणे आणि त्यातल्या पत्रकारांना ( आयोजकाच्या खर्चाने ) मुबलक उंची दारू पाजणे....

पेज थ्री पार्ट्यांचे आयोजन करणे...

उद्योगपतींच्या मुलामुलींची लग्ने आणि त्यांचे व्यवस्थापन घडवून आणणे ,, त्यात ’संगीत’साठी शाहरुख ला नाचायला बोलावणे, अक्षयकुमाराला दोर्‍यांवर लटकून स्टंट्स करायला बोलावणे ....

कोणत्याही धन्द्याच्या प्रमोशनल इव्हेंट्सचे व्यवस्थापन करून देणे..( उदा. आठ दहा अर्धवस्रांकिता निवडून त्यांची बीचवेअरमधली छायाचित्रे असलेली दिनदर्शिका काढणे, आणि त्याचा इव्हेंट आयोजित करणे... )

एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच, जरा कल्पनाशक्तीला चालना द्या, इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच.. प्रश्नच नाही... तर मग लागा कामाला... लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा..या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager