Monday, July 7, 2008

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार


आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

२. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

5 comments:

भडकमकर मास्तर said...
This comment has been removed by the author.
भडकमकर मास्तर said...

लय (rhythm)

गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात...
लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते "

मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला.

घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते.

हॊरिझॊंटल ऎक्शन
गोष्ट पुढे नेते.
घटना घडवते.
व्हर्टिकल ऎक्शन
वेग कमी करते.
व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष)
गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते.

या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ...
मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते.
चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते.
_____________________--
त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे...
हा सारा लयीचा भाग आहे.

भडकमकर मास्तर said...

संवादलेखन
१. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ?
त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा.
पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं...

२. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते)

३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे...

४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech)

५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा.

६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं..
उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या.

७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत)

८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो...
कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे....

भडकमकर मास्तर said...

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ...
मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..)
उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे...

आता थेट उदाहरणे घेऊ...

समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो...
आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात...

उदाहरणार्थ...

१.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे...

२.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे).

३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते...

४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?"

५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो...

६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे...

आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात...
उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं

भडकमकर मास्तर said...

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या.

२.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का?
अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना....

३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस

४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं...

५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू.

६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं..
अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात...

७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही...

८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??)