Sunday, May 18, 2008

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं....

.....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंबिवलीतल्या एक शाळेचे वर्णन असावे...) हा बर्यापैकी हुशार आहे परंतु त्याचा एक मित्रांचा ग्रुप आहे, त्यात सारे अभ्यासू नाहीत.पण ग्रुप मजेदार आहे. (एकाला शास्त्रद्न्य व्हायचे आहे, एकजण श्रीमंत पण अजिबात अभ्यास न करणारा आणि आडदांड आहे, एकजण संध्याकाळी मंडईत भाजी विकणारा..वगैरे) हा ग्रुप टाईमपास करायला शाळेआधी रोज त्या रस्त्यावर बिल्डिंगवर बसतो आणि विविध विषयांवर चर्चा होते तिथे...त्यात मास्तर मास्तरणींना टोपणनावे ठेवणे, त्यांच्या जोड्या जुळवणे,काही मुलींना चिडवणे, मग आवडणार्या मुलीचा माग काढणे, तिला पटवण्याचे विविध प्रयत्न, "कोणतातरी क्लास लाव, आता दहावी आली" वगैरे घरून येणारे प्रेशर, ...वगैरे..

गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्‍या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे....
..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्‍यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो...
.......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले....
....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...

»
....................शिवाय शाळा भरल्यानंतरचे शाळेतले वातावरण, मोजके आवडते शिक्षक , खाष्ट मास्तरीण, कोणीही "डाउट खाउ नये" असे शिताफ़ीने आवडत्या मुलीकडे पाहणे, १४ -१५ वयाच्या या मुलांचे विविध लैंगिक प्रश्न, प्रत्येकाचा त्याकडे पहायचा आपापला द्रुष्टिकोन, अत्यंत चावट ( काहींना भयंकर वाटतील अशा) कोमेंट्स, हिरीरीने म्हटली जाणारी अश्लील गाणी....वर्गातून ओफ़ तासाला पळून जाणे; त्याचे परिणाम भोगणे, सामुदायिक कवायत, प्रार्थना, प्रिंसिपलच्या शिक्षा...
.....या सार्याला थोडी आणीबाणीची पार्श्वभूमी.....असो.... फ़ार सांगणे रसभंग होईल...ही कादंबरी वाचाच....
१९७५ सालीही शाळेत वापरला जाणारा "लाईन देणे" हा शब्द मी शाळेत असताना (’८९ साली नववीत) फ़ेमस होताच...म्हणजे मुलीला थेट समोर जाऊन विचारणे की ," का गं तू मला लाईन देते का?"....अहाहा...."मला लाईन देते का? " हा हा हा...( विकट हास्य).. हा शब्दप्रयोग किती जुना आहे कोण जाणे? आणि सध्या कोणता शब्द वापरला जातो मला ठाऊक नाही....

लेखकानं हे सारं कसं बिनधास्त अगदी खरं खरं लिहिलं आहे... वाचत असताना आपण त्या शाळेमधून सफ़र करून येतो..."शाळेत गेलेल्या सर्वांना" पुस्तक अर्पण केले आहे....पुस्तक मी एका बैठकीत संपवले... वाचताना मला माझ्या शाळेची फ़ार आठवण झाली...आमची शाळा all boys होती...( अर्थात सतलज हे आमचे टोपण नाव आहे). पोरे एक से एक सवाई वाईट होती, शिवीगाळ - मारामार्या यात पटाईत,( माझ्या वर्गात रिमांड होम मध्ये काही दिवस राहून आल्याचे अभिमानाने सांगणारा एक मुलगा होता सातवीत),..होती,चांगली थोडी होती, आम्ही होतोच की...मास्तर मन लावून शिकवणारे थोडे होते...म्हणजे सगळे नेहमीसारखेच.......पण हे पुस्तक वाचेपर्यंत मला माझ्या शाळेचा आणि तिथे असलेल्या किंवा बर्याचशा नसलेल्या शिक्शणाचा थोडा गंड वाटत असे...आता वाटत नाही....खरंतर आमची शाळा अगदी कादंबरीत लिहिल्यासारखीच होती ....मग खरंतर तिला वाईट कशाला म्हणायचे? बर्याचशा शाळा अशाच असतात....सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे...

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो.

तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते.... पुढच्या दृश्यात असे कळते की आदिने त्याची आणि ऋताची एक तो तिच्यावर जबरदस्ती करत असतानाची व्हिडिओ क्लिप तिच्या नकळत मोबाईलवरती शूट केली होती आणि त्याच्या निष्काळजीपणामुळे ती क्लिप मोबाईलमधून सगळीकडे पसरलेली आहे.... लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण (विकृत ) आनंदात ती क्लिप पाहत आहेत...या काळात आदिचे मित्र त्याला शिव्या घालून सोडून जातात....एक मैत्रिण फ़क्त ( का कोण जाणे ) त्याला समजून घ्या असे म्हणते. मग ऋता बाहेरगावाहून येते , तिला समजते , ती धैर्याने परिस्थितीशी सामना करते, रडारड करत नाही.... फ़क्त आदिला एकदा विचारेन म्हणते की तू असे का केलेस?... मग आदि शेवटी तिच्यासमोर म्हणतो, की मी सरेंडर करेन., माझी चूक झाली...ती निघून जाते आणि हा रडत राहतो तेव्हा नाटक संपते.

ही एकांकिका मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पाहिली....त्यानंतर २००७ सालच्या अनेक स्पर्धांमध्ये या एकांकिकेने पहिली / दुसरी पारितोषिके मिळवली..
अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते.

१. आता हा पोरगा आपल्या गर्लफ़्रेंडवर फ़ोर्स करणार , तिच्या नकळत त्याचे चित्रीकरण करणार आणि वर निष्काळजीपणे ते स्प्रेड होऊ देणार , आणि शेवटी सहानुभूतीची अपेक्षा करत राहणार..( रडणार, मित्र सोडून गेल्यामुळे कसा त्याच्यावर अन्याय झालाय असा अभिनय दाखवणार)
या असल्या क्रिमिनल माणसाला कसली सहानुभूती देता ? त्याची लायकी फ़टकावून काढून पोलीसात द्यायचीच आहे.....
____ म्हणजे त्यांना लग्नापूर्वी संबंध ठेवायचे आहेत की नाही, त्याचे चित्रीकरण करून दोघांनी एकत्र पहायची त्यांची सवय आहे की नाही हा त्यांच्या सेक्शुअल प्रेफ़रंसेस चा वैयक्तिक भाग झाला....

पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले...

२. मला तर ही एका पर्वर्ट बलात्कार्‍याची गोष्ट वाटली.... जो कांगावा करतोय की चुकून क्लिप स्प्रेड झाली, मी खरंतर ती क्लिप माझ्यासाठी बनवली होती..... आता या मुख्य पात्राला सहानुभूती देणारी पुढची सगळी गोष्ट ( बिचार्‍याला सगळे मित्र बोलून सोडून चालले रे..) पाहून मला वाटत राहिले, की बाबा आम्हाला आता कळणार आहे की याने चूक केलेली नाही, काहीतरी गैरसमज होता वगैरे... तसले काही घडत नाही...
मग असल्या ट्रीट्मेंट ने आम्हाला इतका वेळ कशाला येडा बनवले?

३. मग एखाद्या बलात्कार्‍याची गोष्ट नसते का? असू शकते, पण इतक्या सहानुभूतीचे कारण काय?
उलट ऎंटी हीरो चे सिनेमे असतात त्यांचा आलेख वाईट कृत्य, कारणमीमांसा आणि शिक्षा असाच असतो... तसंही इथे कुठे दिसत नाही... उलट ती दुसरी मैत्रीण सोडून जाणार्‍या मित्रांना " अरे त्याला समजून घ्या " स्टाईलचा सूर लावते तेव्हा डोके चक्रावते.

४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला पाहिजे?

५. बरं एवढा नीच माणूस आहे तो तर मग त्याला त्या प्रमाणात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट शिक्षा तरी मिळायला हवी की नको? ते ही नाही...तो रडत राहतो आणि नाटक संपते.म्हणजे नाटकाचा प्रिमाईस / वन लाईन स्टोरी काय तर बलात्कार करा, क्लिप काढा पण स्प्रेड होऊ देऊ नका नाहीतर मित्र सोडून जातील ...

या माझ्या शंकांबद्दल मी त्या नाटकाच्या टीममध्ये असलेल्या एका मुलीशी जालावर चर्चा केली... , त्यात तिचे म्हणणे असे होते की आदिने एक छोटीशी चूक केली आहे, तो वाईट नाही..आणि ती स्वत:साठी बनवलेली क्लिप स्प्रेड झाली हे चुकले, मग त्याचा मोठा गुन्हा झाला, त्याची तो पोलिसांना सरेंडर करून शिक्षा भोगणारच आहे......
मी उडालोच..तो वाईट नाही? स्वत: एक मुलगी असूनही प्रेयसीवरती जबरदस्तीने संबंध ठेवून नकळत क्लिप काढणारा माणूस ( प्रत्यक्ष आयुष्यात आपला बॊय्फ़्रेंड असो किंवा जानी दोस्त असो), नीच प्रवृत्तीचा आहे हे तिला जाणवू नये? . तिलाच काय माझ्याबरोबर एकांकिका पाहणाया बर्‍याचशा लोकांना हे जाणवलेच नाही.... परीक्षकांनीही या एकांकिकेला भरपूर बक्षिसे दिली...
कॊलेजची पोरे तर या एकांकिकेने भारावून वगैरे गेली होती...
अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो..

खरं सांगतो, मी ज्या ज्या कॉलेजियन्स ना या एकांकिकेबद्दल विचारले, ते लोक बॉयफ़्रेंड गर्लफ़्रेंड मंडळींनी एकमेकांच्या क्लिप्स मोबाईलवरून तयार करणे या संकल्पनेला इतके सरावलेले वाटले, की मला आधी भीती वाटली आणि मग माझे फ़ार वय झाले आहे असे वाटले.... उद्या कॊलेजच्या रंगमंचावर बलात्काराचे कौतुक करणारी आणि जस्टिफ़ाय करणारी नाटके दिसली तर नवल वाटायला नको, असा टिपिकल वय झाल्याची जाणीव करून देणारा विचार मनात आला खरा...( आजची तरूण मुले म्हणजे ना.......).. ( अरे बापरे, माझा प्रवीण दवणे झाला की काय?या विचाराने अजून भीती वाटली.. )

नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे....
असो...
पुण्यातल्या लोकांपैकी इथे पाहिले का हो कोणी हे नाटक?
( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)...

दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत
म्हणून केली गेलेली जबरदस्ती दुर्लक्षणीय ठरते?मला नाही वाटत...
उलट लग्नापूर्वी हा भाई असा वागतो, माझ्या मतांना याच्या लेखी काडीची किंमत नाही, तर नंतर कसा वागेल...असा विचार येऊन मी असल्या बॉयफ्रेंडला अगदी लई वेळा लाथ घातली असती...
... असो...
मात्र "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते" असं मानण्याचा एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा माझा हेतू नाही
गंमत अशी की हे नाटक करणारे लोक "तो वाईट नाहीच, त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडलेली आहे " या गोष्टीपलिकडे जायला तयार नाहीत.... आधी आपले पात्र कसे आहे , कितपत वाईट आहे, दुष्ट आहे, हे ऍक्सेप्ट करणे आवश्यक आहे, एकदा विषय धाडसी निवडल्यानन्तर मग पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही, ( तो चांगलाय, चांगलाय, मला समजून घ्या वगैरे)...त्यामुळेच विचार करणार्‍या प्रेक्षकाला आदिला इतरांनी सहानुभूती देण्याचे कारण कळत नाही...

त्याच्या चुका काय आहेत हे तरी त्यांना क्लीअर नको का...क्लिप स्प्रेड होणे यापलिकडे त्यांना आदिची चूक वाटत नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे..... निदान त्याला एखाद्या पात्राने त्याच्या महत्त्वाच्या चुकांची ( १.जबरदस्ती + २.नकळत चित्रण) जाणीव तरी करून देणे आवश्यक होते....तेही नाही...
(हे लोक पात्राला सहानुभूती अशी देत होते की जणू १. चित्रण भलत्यानेच केले आहे, दोघांच्या नकळत आणि मग क्लिप स्प्रेड झाली आहे.
२. याने जबरदस्ती केली नाही... दोन कन्सेंटिंग ऍडल्ट्स मधलं मॅटर ....)....

त्यामुळे स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती , असा गंभीर विषय त्यांना दाखवायचा नसावा, आणि मनात असले तरी झेपला नसावा असे मला वाटते..

आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

" ए ऊठ ए... बघ .. आनंद जिंकला... "
... सकाळी सकाळी विश्वेश हातात टाईम्स नाचवत ओरडत होता.... बातमी वाचताच मीही नाचू लागलो....सालं गेलं महिनाभर ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते घडलं होतं...आनंदने कास्पारोवला हरवलं होतं...

सप्टेंबर १९९५ मध्ये वर्ल्ड नंबर वन होण्यासाठी आनंद कास्पारोव्हच्या लढती चालू होत्या...फिडे मधून फुटून कास्पारोव्हने स्वतःची प्रोफेशनल चेस असोसिएशन काढली होती आणि न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ही लढत चालू होती... बेस्ट ऑफ २० मॅचेस ... कास्पारोव्ह एकदम जोरात होता....अजिबात म्हणजे अजिबात हरायचा नाही कुठेही...
आणि उत्तम खेळाडू असण्याबरोबरच दबावतंत्रात फार वाकबगार होता ... म्हणजे मॅच सुरू होण्या आधी प्रेशर आणणारी स्टेटमेंट्स देणे वगैरे ....
१९९३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल आधीच कास्पारोव्ह म्हणाला होता, " माय नेक्स्ट अपोनंट विल बी नाय्जेल शॉर्ट , अँड मॅच विल बी व्हेरी शॉर्ट..".... आणि फायनल ला त्याने शॉर्टला आरामात हरवलं होतं...( बहुतेक १२.५ - ७.५ असं)
...
मी तेव्हा डेन्टिस्ट्रीच्या तिसर्‍या वर्षात होतो...
विश्वेशची आणि माझी पैज लागली होती , तो म्हणाला होता, कास्पारोव्ह आनंदचा धुव्वा उडवणार....मी म्हणत होतो, आनंद टफ फाईट देणार्...आम्ही हॉस्टेलमध्ये रूममेट होतो...डीडी वर मॅचेस होत्या पण आम्ही रूमवर टीव्ही बाळगून नव्हतो...रोज टाईम्समध्ये येणारी बातमी आणि रघुनंदन गोखले यांचे परीक्षण यावरच आमची भिस्त होती...
पहिल्या आठ मॅचेस ड्रॉ झाल्या होत्या .... तसं आश्चर्यच होतं... कास्पारोव्ह इतका वेळ प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेण्यात वाया घालवत नाही... इतका वेळ खडाखडी झाल्यावर चक्क नववा गेम आनंद जिन्कला होता....
आनंद ५ गुण कस्पारोव्ह ४ गुण..... आनंद आघाडीवरती....दिवसभर खुशीत फिरलो भरपूर.....

आज नेटवर फिरता फिरता भटकंतीत यूट्यूबवरती आनंदचा हाच तो नववा गेम आणि त्याचं ऍनलिसिस सापडलं.... (कॉमेंट्री जरा भडक ओवरेक्सायटिंग आहे, पण गंमत आहे....)
कास्पारोव्हचे दबावतंत्र, स्टाईल्स, मध्येच उठून जाणे, ऍक्टिंग आणि त्या तुलनेत आनंदचे शांत, काहीसे नवखे हावभाव बरेच सांगून जातात... मॅच हारल्यानंतर तर कास्पारोव्हचे अस्वस्थ होणे आणि आनंदचे मनःपूर्वक शांत राहणे पाहून फार बरे वाटले...

http://www.youtube.com/watch?v=FutTQZfFDuI नवव्या गेमचा हा भाग एक

http://www.youtube.com/watch?v=nrkh9zCAWSo नवव्या गेमचा हा भाग दोन

मात्र आमचा आनंद फार काळ टिकला नाही... दुसर्‍याच दिवशी कळले की कास्पारोव्हने दहाव्या गेममध्ये पांढर्‍या मोहर्‍यानी आनंदला हरवले.... डिवचला गेलेल्या कास्पारोव्हने तो गेम अगदी खुन्नसने खेळला होता, आणि आनंदला काहीही संधी दिली नव्हती... मला आठवतेय रघुनंदन गोखले यांनी त्यांच्या परीक्षणात लिहिले होते की ही सेट द बोर्ड ऑन फायर...( हा दहावा गेमही यूट्यूबवर सापडतो दोन भागात).... मग अकरावाही जिंकला.... बाराव्या गेममध्ये कास्पारोव्ह जिन्कायचाच पण आनंद कसाबसा निसटला... ड्रॉ झाला...आनंद मग तेरावाही हरला आणि पुढच्या सगळ्या ड्रॉ होत गेल्या... आनंद हरला ती मॅच पण काय फाईट दिली त्याने....

मला आधी चेसमधले पीसेस आणि त्यांचे चलन सोडता फारसे कळत नव्हते पण १९९५ च्या त्या सप्टेंबरपासून मला चेसचा बराच नाद लागला, ( चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, गेम सुरू होण्या आधी कास्पारोव्हची सर्व पीसेसना हात लावून नीट ठेवायची स्टाईल मारणे..असे बराच काळ चालले)...पुढचे सहा महिने माझ्या डोक्यावर हे भूत स्वार होतं... म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं....

या यूट्यूबने त्या धमाल दिवसांची आठवण करून दिली ....... आता विश्वेशला कळवायला हवी ती यूट्यूबची लिन्क... उद्या सकाळीच फोन करतो.
इथे कोणाला आठवताहेत का ते दिवस?

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग ३ ... इव्हेंट मॆनेजर व्हा

आजकाल लोकांकडे पैसा खुळखुळायला लागला आहे आणि कला, क्रीडा क्षेत्राला बरे दिवस यायला लागले आहेत..गल्लोगल्ली निघालेले नृत्य वर्ग, वाद्यवृंद, नाट्यसंस्था , मॊडेलिंग एजन्सीज यातून नक्कलवाले अभिनेते, किंचित गायक, अर्धेमुर्धे नर्तक, मॊडेल तयार होत आहेत पण या सार्‍यांची तक्रार एकच आहे की व्यासपीठ उपलब्ध होत नाहीये.....शिवाय काही छंदवाली मंडळी आहेत, काही व्यावसायिक मंडळी आहेत , त्यांना त्यांच्या व्यावसायिक कलेचे प्रदर्शन मांडायला व्यासपीठ नाहीये... हे सारे तुम्ही घडवून आणणार आहात , अर्थात आमच्या म्हणजेच..भडकमकर क्लासेस च्या मार्गदर्शनाने..


इथे मात्र समीक्षकाच्या बरोबर उलटा ऎप्रोच घ्यावा लागतो त्यामुळे कोर्स निवडीचे काम काळजीपूर्वक केलेल्या कल चाचणीतूनच होते...काही विशिष्ट गुण लहानपणापासूनच असावे लागतात.
१. ही पोरे भरपूर मित्रपरिवार राखून असतात, अडीअडचणीला माज न करता मदत करतात.
२. कोणत्याही मास्तरांना नडत नाहीत, सारखे प्रत्येकासमोर you are the best teacher असे कौतुक करतात...
३. छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगायची बोलबच्चनगिरी त्यांना चांगली जमते..
४.त्यांना कोणत्याही दर्जाहीन गोष्टीला प्रोत्साहन द्यायला आवडते.....

आता इव्हेंट मॆनेजर म्हणजे ....कोणत्याही कार्यक्रमात कार्यक्रम ठरवण्यापासून तो सुरळीत पार पाडेपर्यंत राबणारा व्यवस्थापक...( म्हणजे त्यात मांडववाले, ध्वनिव्यवस्था, वाहतूक व्यवस्था,लायटिंग, खुर्च्या, भारतीय बैठक,तिकीट छपाई आणि तिकीट विक्री,पूर्वप्रसिद्धीसाठी ब्रोशर्स, हॆंड्बिले, वर्तमानपत्रातली जहिरातवाले, व्हिडीओ शूटिन्ग वाले, स्टिल फोटोग्राफीवाले,, रंगमंच सजावटवाले , फ़ूल/हार/नारळ/बुकेवाले,तसबीर, फ़ीत , समई, पूजासाहित्यवाले, मध्यंतरातला चहा, कार्यक्रमानंतरचे जेवण वगैरेची व्यवस्थावाले या सर्व लोकांशी समन्वय साधून न चिडता कामे करवून घेणे म्हणजे उत्तम व्यवस्थापन )...योग्य माणूस योग्य वेळी शोधून काढून त्याचा उपयोग करून घेणे या सगळ्या बेसिक गोष्टी तर आम्ही शिकवतोच.....पण हे तर काय कुठच्याही मेहनती माणसाला जमेल... पण आमच्या क्लास मध्ये आम्ही मुळात कार्यक्रम मिळवावेत कसे यावरही मार्गदर्शन करतो आणि आजच्या युगात तेच जास्त महत्त्वाचे आहे, त्यावरच आमचा भर असतो...


सुरुवात करणायांसाठी टिप्स....
१. सोसायटी / कॊलनीचा गणेशोत्सव , किंवा छोटी स्नेहसंमेलने यांच्या व्यवस्थापनाने सुरुवात करावी..शालेय वयात उमेदवारी व्हायला हवी..
२.. नातेवाईक, आजूबाजूची मंडळी यांच्यात कोणीतरी गायक, कवि असतातच.. त्यांचे काव्यगायन न थकता ऐकावे..... विशेषत: लहान मुले, त्यांचे ते डान्स, अभिनयाच्या नावाखालची त्यांची ती दिव्य नक्कल यांचे अगदी विनम्रपणे साळसूद भाव चेहर्यावर आणून वारेमाप कौतुक करावेआणि त्याच वेळी यांनी स्वत:ची कला जनतेपुढे मोठ्या कार्यक्रमातून आणणे कसे आवश्यक आहे असे एक पिलू त्यांच्या बापांच्या डोक्यात अलगद सोडून द्यावे......
त्यासाठी काही वाक्यांचे संच>..." बबडू काय सुंदर नाचतो, त्याला तुम्ही खरंतर नीट ट्रेन केलं पाहिजे... त्याला तुम्ही एकापेक्षा एक ला पाठवाच...जिंकून येईल जिंकून...आहात कुठे? फ़क्त कार्यक्रमांचा, प्रेक्षकांचा सराव हवा हां "" बेबी काय गाते हो, प्रतिलताच.... तिला निदान वाद्यवृंदात तरी गाऊन पहायची सन्धी दिलीच पहिजे... अहो प्रोग्राम्स केल्याशिवाय जनतेपुढे टॆलंट येणार कसं?" " काका, तुम्ही मैफ़लींमध्ये काव्यवाचन करता का?.. काय सांगता? नाही?.... खरंच नाही? विश्वास बसत नाही हो...खरंच तुम्ही काव्यगायन करा...आजकाल अशी सशक्त कविता कुठे ऐकायला मिळते?"मग हे लोक विचारतात, " अरे पण तो कार्यक्रम कसा करतात वगैरे आम्हाला... म्हणजे त्यातलं काही समजत नाही रे..."...."काही घाबरू नका हो, मी कशालाय मग? आपणच तो कार्यक्रम आपल्या संस्थेतर्फ़े करू , फ़क्त थोडा खर्च येईल...." अशी टोलेबाजी जिथे जाता तिथे करत राहिलात तर पोरासाठी खर्च करणारे असले दोन चार बाप सापडतील, मग संस्थेचं नाव ठरवायचं आणि बघता बघता तुमच्या संस्थेचा पहिला जाहीर कार्यक्रम होऊनही जाईल...

आता काहींना असे वाटते की इतक्या फ़ालतु कलाकाराचे कौतुक मी केले तर माझा दर्जा एक रसिक म्हणून घसरत तर नाही ना ? एक लक्षात घ्या, तुम्ही रसिक बनायला आलाय का इव्हेंट मॆनेजर व्हायला?? उगीच दोन गोष्टींची गल्लत करू नका...खर्‍या इव्हेंट मॆनेजर चा प्रोत्साहनाने अनेक कलाकार घडतात यावर विश्वास असतो..

३.सुरुवातीच्या काळात हौशी आणि श्रीमंत मंडळी हे आपले टार्गेट .... व्यावसायिक मंडळींचा माज आपल्याला सुरुवातीला परवडणारा नाही... आणि होतकरू, गुणी परंतु गरीब कलाकारांकडून काही फ़ायदा नाही त्यामुळे त्या वाटेला न गेलेलेच बरे..

४.जनसंपर्क उत्तम हवा.... स्थानिक वर्तमानपत्रातले सांस्कृतिक वार्तांकन करणारे वार्ताहर, जहिरातवाले, स्थानिक पुढारी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लोक , नाट्यगृह व्यवस्थापक, मांडव आणि ध्वनिव्यवस्थावाले कंत्राटदार, ट्रान्स्पोर्ट वाले, स्थानिक पोलीस ओफ़िसर,स्थानिक बिल्डर असोसिएशनचा अध्यक्ष ..कोण कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही... यातल्या सर्वांना आपापल्या सर्व कार्यक्रमांना आमन्त्रित करावे आणि आलटून पालटून एकेकाला आपापल्या स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा / अध्यक्ष म्हणून बोलवावे.

५.. मग स्पर्धा भरवायच्या...गायनस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, वाद्यवादन स्पर्धा, पोवाडास्पर्धा, अभिनयस्पर्धा, रांगोळीस्पर्धा,या असल्या फ़ुटकळ स्पर्धा तर शाळेच्या सुटीमध्ये वगैरे जाम हिट होतात ....गृहिणींसाठी पैठणीवाटपाच्या होम मिनिस्टर स्पर्धा घ्यायच्या...शिबिरं भरवायची.. अभिनय, नाट्यप्रशिक्षण, जन्गल भटकन्ती, प्रस्तरारोहण..सुगम सन्गीत गायन, कराटे प्रशिक्षण वर्ग, ताएक्वोन्दो वगैरे...

६. हे कवी आणि अभिनेते स्वत:ची ’एक कलाकार म्हणून ओळख घडवायच्या मागे असतात... या रेकग्निशन साठी काहीही करायला तयार होतात...एक उदाहरण देतो.या कवि वगैरे मंडळींना मोठ्या कार्यक्रमात काव्यगायन करायची आणि पुरस्कार वगैरे मिळवायची फ़ार हौस असते...मग असल्या लोकांची यादी मिळवून त्यांना घरी पत्रे धाडायची,.." आपणास अमुक अमुक संस्थेचा कविमित्र / जनमित्र / कामगार मित्र / खरा कलाकार पुरस्कार मिळालेला आहे, तरी त्यासाठी कृपया रु.५००/- खालील पत्त्यावर पाठवा... ( हसू नका, बरेचसे लोक पाठवतात पैसे)...मग त्या पैशांमधून एक स्वस्त रंगमन्दिर किंवा शाळेचा हॊल दिवसभरासाठी मिळवायचा... कवी मंडळींना दिवसभर काव्य म्हणत बसवायचं आणि सन्ध्याकाळी एक कवी आणायचा आणि त्याच्याहस्ते ते कविमित्र पुरस्कार ( ३० रुपयंचे मेडल आणि १० रुपयांचे सर्टिफ़िकेट) वाटून टाकायचे..पुरस्कार मिळवून सर्व कवी खुश, त्यात रेकग्निशन आणि काव्यगायनाचे व्यासपीठ.....बोलायलाच नको... शिवाय आपला एक सक्सेसफ़ुल इव्हेंट सुद्धा झाला...आता यात दूरदूरच्या कवींकडून प्रत्येकी ५०० रु घेऊन कार्यक्रम रद्द करणारे अत्यंत वाईट इव्हेंट मॆनेजर असतात , पण आपण तसले शिकवणारे क्लास चालवत नाही... तत्त्व म्हणजे तत्त्व.

७.आता अत्यंत महत्त्वाचे .... पॆकेजिंग...कार्यक्रम साधारण तोच पण पॆकेजिंग बदललेले... हा प्रकार उदाहरणार्थ वाद्यवृंदांमध्ये फ़ार छान करता येतो ...मराठी वाद्यवृंदांमध्ये ठराविक तीच तीच गाणी परत परत वाजवली जातात.. पण दर वेळी त्या कार्यक्रमाला वेगळी नावे देऊन सादर करावेत... म्हणजे एकदा बाबूजींची गाणी, मग गदिमांची गाणी, एकदा गीतरामायण ........किंवा आठवणीतली गाणी ( फ़ेमस लोकांचे स्म्रुतिदिन घेउन त्याप्रमाणे गाणी ),, ऋतूंप्रमाणे गाणी, श्रावणातली गाणी, थंडीची गाणी, तमाशाची गाणी,चंद्राची / चांदण्याची गाणी कोजागिरीच्या दिवशी बरोबर दूध फ़ुकट असले टुकार उपक्रम राबवावेत... लोकांना मजा येते... आपण रसिक वगैरे झालो असे वाटते त्यांना..गाण्याच्या कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये सिनेमा आणि नाटकातले विनोदी कलाकार आणून त्यांच्याकडून नाटुकली बसवून घ्यावीत .... हे असले विनोदी प्रकार लोकांना फ़ार आवडतात.... शिवाय त्या विनोदी नाटुकल्यांमध्ये कार्यक्रमाच्या प्रायोजकांची नावे घुसडावीत....

८. कोणत्याही प्रकारच्या निवडणुका जवळ आल्या की आपला सीझन सुरू होतो....आपापल्या वॊर्डातल्या / मतदारसंघातल्या ज्येष्ठ जाणत्या मतदारांना फ़ुकट कार्यक्रम दाखवून रिझवायला पुढार्यांना अनेक कार्यक्रमांची गरज असते.... नाटके, तमाशे, गाण्यांचे वाद्यवृंद, नकलांचे कार्यक्रम... शिवाय छोटे मोठे नटनट्या पैसे घेऊन प्रचारफ़ेर्यांमध्ये भाषणे करायला / अभिवादन करायला (हात हलवायला ) आणणे

९. जालावरच्या ऒर्कुट फ़ेसबुक आणि काय काय नवनवीन येणाया नेटवर्किंग कम्युनिटीज मध्ये घुसावे... हौशी ( आणि श्रीमंत ) कलाकार मंडळी शोधून काढून सम्पर्कात रहावे.... शिवाय अमुक कवीचा फ़ॆन क्लब, तमुक गवयाचा फ़ॆन क्लब असल्या कम्युनिटीज शोधून त्यांच्यातर्फ़े कार्यक्रम करावेत...सम्पर्कासाठी या जालाचा भयानक फ़ायदा आहे.

१०. हौशी नट लोकांना वाट्टेल ती बिले लावावीत..... उदा. प्लॅन पूजा २०० रु.; वाहतूक खर्च ५०० रु; सेटचा खर्च ४००० रु; पोलीस कमिशनरकडून मिळणार्‍या सार्वजनिक प्रयोगाच्या परवानगी साठी नक्की किती पैसे घ्यायचे असतात ते कोणालाच नीट ठाउक नसते, तिथे ५०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत काहीही आकडा टाकावा...व्यवस्थापन १००० रु. वगैरे वगैरे....हे हौशी ( आणि श्रीमंत ) लोक फारशी खळखळ न करता लगेच बिल चुकते करतात.

या गोष्टी करेपर्यन्त तुम्ही थोडे प्रस्थापित आणि अनुभवी इव्हेन्ट मॆनेजर होऊ लागला आहात ....
मग तुमच्या संस्थेच्या नावाने पुरस्कार सन्ध्या आयोजित करायची .सद्ध्याची नवीन फ़ॆशन म्हणजे एकाच वेळी अनेक पुरस्कार वाटायचे आणि त्यानिमित्ताने भरपूर फ़ेमस माणसे बोलवायची... किंचित नट गायकाला बालगन्धर्व पुरस्कार , आत्ता मिसरूड फ़ुटलेल्या टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्याला एकदम चिन्तामणराव कोल्हटकर पुरस्कार, आत्ता पदार्पण केलेल्या अभिनेत्रीला स्मिता पाटील पुरस्कार अशी वाट्टेल तशी फ़टकेबाजी झाली तरी चालते...लोक प्रेमाने सहन करतात..पण या आठ दहा पुरस्कारांच्या गर्दीमध्ये स्थानिक कलाकारांना पण बक्षीसे द्यायला विसरू नये...स्थानिक अभिनेते, लेखक वादक, गायक यांच्याबरोबरच काही हटके पुरस्कारही द्यावेत...उदा. तुमच्या गल्लीत श्वानप्रशिक्षण देणार्या माणसाला " विष्णुपंत छत्रे" पुरस्कार, किंवा सिनेमात बैलाला पळायला शिकवणार्याला "मनेका गांधी प्राणिमित्र " पुरस्कार....सर्वांसाठी विन विन सिचुएशन म्हणजे काय , ते या पुरस्कार सन्ध्येच्या उदाहरणातून कळेल...

या पुरस्कारांचे एक बरे असते, सगळे सुखी होतात...या फ़ेमस मंडळींमुळे वर्तमानपत्रात ,स्थानिक केबलटीव्ही वर, मराठी न्यूज चॆनलवर आपल्या सन्स्थेची मजबूत प्रसिद्धी होते ... आता हे पुरस्कार घेताना येण्यासाठी सुद्धा तारे तारका वाजवून पैसे घेतात , ती गोष्ट वेगळी पण आपला स्पॊन्सर तगडा असतोच की... उदाहरणार्थ बिल्डर, स्थानिक नगरसेवक/ आमदार- त्यांचा काळा पैसा पांढरा होतो, त्यांना स्टेजवर बसवून त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांच्या व्यवसायाला आवश्यक अशी प्रसिद्धी मिळते..प्रेक्षकांनाही इतके महान कलाकार आपापल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्या गावात आले याचा आनंद होतो..दर वर्षी असल्या पुरस्कार सन्ध्या आयोजित कराव्यात.


व्यावसायिक इव्हेंट्स....आपापल्या व्यवसायात अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना तुम्ही कौशल्याने बाहेर काढू शकता...
उदाहरणार्थ...

१. एका शिम्प्याचा धंदा नीट चालत नाही...तर या फ़ॆशन डिझायनराच्या बुटीकच्या नावाने मोठा फ़ॆशन शो आयोजित करावा.... त्यात होतकरू मॊडेल म्हणून जवळच्या कॊलेजातील प्रेमात पडलेली युगुले घ्यावीत... ( स्थानिक मधु-मिलिंद, यांना वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत आणि सर्व कष्ट एकमेकांच्या सहवासासाठी ते आनंदाने करतात) कोरिओग्राफर स्वस्त शोधावा आणि उडवावा इव्हेंट्चा बार..... दोन वर्षांत या शिम्प्याची मुंबईत दोन सरकारमान्य फ़ॆशन डिझायनिन्ग ची कॊलेजे होतात की नाही बघा...
उदा. २... एखाद्या ट्रॆव्हल कम्पनीला आपला विस्तार वाढवायचा आहे, त्यासाठी पुरस्कार सन्ध्या आयोजित करा, त्याच वेळी कोणता अभिनेता किंवा खेळाडू तुमच्याबरोबर टिम्बकटू ला येणार, कोणते कोणते खेळ खेळणार ते वर्तमानपत्रात स्पॊन्सर्ड बातम्यांनी जाहीर करा... (अमुक अमुक भाउजी स्वत: येणार आणि बायकांबरोबर खेळणार, पैठण्या वाटणार...वगैरे)... किंवा कम्पनीच्या मालकीणबाईंना आठवड्याला सात आठ वर्तमानपत्रांमध्ये लेख पाडून द्यायला एखादा सेमिप्रोफ़ेशनल लेखक उपलब्ध करून द्या, त्याबदल्यात त्याला कन्सेशनमध्ये भीमाशंकर टूर द्यायचं आश्वासन द्या..
उदा .३ .. एखाद्या डॊक्टराचा जम बसत नाहीये.. मग काय करणार? करेक्ट... एका आमदाराच्या वाढदिवशी हॊस्पिटलाशी टाय-अप करून रक्तदान शिबिर घ्या किंवा फ़ुकट आरोग्य तपासणी शिबिर घ्या....

अशा प्रकारे कोणत्याही व्यवसायासाठी इव्हेंट घडवता येतो ...तुमच्याकडे कोणत्याही व्यवसायातील माणसे येवोत...... हिप्नॊटिझमवाले, मंत्रतंत्रवाले (गंडेदोरेवाले / ताईतवाले / जादूचे प्रयोगवाले), ज्योतिषवाले ( सनसाईनवाले / मूनसाईनवाले / जोक सांगणारे/ पत्रिकावाले), , मालिशवाले ( जपानी मसाजवाले / केरळीमसाजवाले / तेलवाले / बिनतेलवाले ), स्मरणशक्तीचे प्रयोगवाले,व्यायामशाळावाले ( वजन उतरवावाले / आहार नियमनवाले / देशी-तालीमवाले / ट्रेडमिलवाले ), योगावाले ( आसनवाले /ध्यानधारणावाले / कुंडलिनीवाले / निसर्गोपचारवाले / मनशक्तीवाले / आर्ट ऒफ़ लिव्हिंगवाले ) रेस्टॊरंटवाले ( उडपीवाले / टपरीवाले / वडापाववाले / अमृततुल्यवाले / बारवाले / भेळ- मिसळपाववाले / थ्रीस्टार-फ़ाईव्ह्स्टारवाले ) शाळा - कॊलेजवाले (बालक मंदिरवाले / कॊन्वेंटवाले / मेडिकल, इन्जिनियरिंगवाले / मॆनेजमेंटवाले ) , पर्यावरणवाले ( सर्पमैत्रीवाले / वुई लव्ह डॉग्जवाले /वृक्ष वाचवा वाले / पक्षीमित्रवाले ), समाजसेवावाले ( एड्स-जागृतीवाले / अनाथालयवाले / शस्त्रक्रिया मदत वाले) बँकवाले (पतपेढीवाले / सावकारीवाले / क्रेडिट-कार्डवाले ) इन्शुरंसवाले ( एल आय सी वाले / परदेशी कम्पनीवाले/जीवन बीमा वाले/ जनरल -घर्,हेल्थ्,पीक्,नैसर्गिक संकट वाले), ,क्लासवाले ( दहावी बारावी वाले / कम्प्यूटर क्लासवाले / मेडिकलवाले / आय आय टी वाले) डॊक्टर ( ऎलोपथीवाले / होमिओपथीवाले / यूनानीवाले / पंचकर्मवाले / बाराक्षारवाले / डेंटलवाले / मेंटलवाले / स्त्रीरोगवाले/ रक्त लघवीवाले / हाडवैदू / डोळावाले ) कामजीवनवाले ( तरुणांचे /चाळीशीनंतरचे / बालपणीचे / ब्रह्मचार्‍यांचे ) या सर्व व्यवसायांच्या पूर्वप्रसिद्धीसाठी इव्हेंटचे व्यवस्थापन शिकवू..


ऎडव्हान्स्ड कोर्ससाठी..यात वेगळे काही करायचे नसते.. तत्त्वे तीच फ़क्त कॅनव्हास मोठा.... अमराठी, बहुभाषिक आणि हिंदी जनतेसाठी , जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी ,

टीव्ही हक्क, मोठ्या वर्तमानपत्रांना माध्यम प्रायोजक म्हणून निवडणे..

फ़ुटकळ नटनट्या गोळा करून त्यांना फ़ुटकळ प्रॉडक्ट्सचे ( उदा. घड्याळ, शांपू, मीठ, सॉफ़्ट ड्रिंक वगैरे )ब्रँड ऍम्बॆसिडर बनवणे
मोठ्या मोठ्या पत्रकारपरिषदा आयोजित करणे आणि त्यातल्या पत्रकारांना ( आयोजकाच्या खर्चाने ) मुबलक उंची दारू पाजणे....

पेज थ्री पार्ट्यांचे आयोजन करणे...

उद्योगपतींच्या मुलामुलींची लग्ने आणि त्यांचे व्यवस्थापन घडवून आणणे ,, त्यात ’संगीत’साठी शाहरुख ला नाचायला बोलावणे, अक्षयकुमाराला दोर्‍यांवर लटकून स्टंट्स करायला बोलावणे ....

कोणत्याही धन्द्याच्या प्रमोशनल इव्हेंट्सचे व्यवस्थापन करून देणे..( उदा. आठ दहा अर्धवस्रांकिता निवडून त्यांची बीचवेअरमधली छायाचित्रे असलेली दिनदर्शिका काढणे, आणि त्याचा इव्हेंट आयोजित करणे... )

एकदा तुम्ही आमच्या टिप्स लक्षात ठेवून त्याप्रमाणे मार्गक्रमणा केलीत तर तुम्ही दर्जेदार इव्हेंट मॆनेजर होणारच, जरा कल्पनाशक्तीला चालना द्या, इव्हेंट मॅनेजमेंटचे अमर्याद जग तुमच्यापुढे खुले होईलच.. प्रश्नच नाही... तर मग लागा कामाला... लवकरात लवकर खालच्या संस्थळावर सम्पर्क साधा..या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...bhadakamakar'scareermanagementsystems.org/eventmanager

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो... यात पैसा फ़ार नसेल,पण आज पालकांना जाणीव नाही की या कलेतूनही किती उत्तम प्रसिद्धी मिळवता येते...हा भाग थोडा लांबला आहे असे तुम्हाला वाटेल पण आमच्याकडे जे नॉलेज आहे ते आम्ही मुक्तपणे वाटून टाकतो ( इतर क्लासेस प्रमाणे हातचे राखून आम्ही शिकवत नसतो)

हे करीअर निवडण्या आधी आम्ही पालकांशी चर्चा करतो, कधी कल चाचणी ( ऎप्टिट्यूड टेस्ट) सुद्धा घेतो...आमच्या पाहणीत असे आढळून आले आहे की सामान्यत: काही विशेष गुण असलेली मंडळी यात फ़ार उंची गाठतात...नाही, म्हणजे आम्ही त्यांना शिकवतोच पण स्वत: कडे काही खास असलं तर आम्हालाही मेहनत घ्यायला मजा येते..

.उदा. १. ही मुलं लहानपणापासूनच स्वत:ला कोणीतरी विशेष व्यक्तीमत्त्व समजतात, त्यांचा रथ जमिनीवरून २ इंच चालतो....
२. शाळेत ही मुले मास्तरांना सतत नडतात, शंका विचारतात आणि स्वत:च्या बुद्धीवैभवाचे प्रदर्शन करतात.
३.त्यांना खेळापेक्षा खेळाच्या कॊमेंटरीत, सिनेमा पाहण्यापेक्षा आणि गाणी-डांस स्वत: करण्यापेक्षा त्यावरील चर्चेत जास्त रस असतो.
असा एखादा हिरा आमच्या पाहण्यात आला तर आम्ही त्याला उत्तम पैलू पाडून सहज नाट्यसमीक्षक बनवू शकतो.....

सुरसुरी : खर्‍या समीक्षकाला अशी सतत सुरसुरी येत राहिली पाहिजे की आता कोणाच्या कलेची वाट लावू... जीभ अशी लवलवायला पाहिजे, लेखणी थरारली पाहिजे...बोटं नुसती कीबोर्ड वर पडायला आसुसली पाहिजेत... असा कोणी लेखक, नट निर्माता बर्याच दिवसांत सापडला नाही तर आतून असं तुटलं पाहिजे, ती तळमळ जाणवली पाहिजे.....

एक लक्षात घ्या की आमच्या क्लासमध्ये अमुक अमुक ची भूमिका आवडली, यांची कामे ठीक्ठाक असली सपक आणि गुळमुळीत समीक्षा लिहिणारे नाट्यसमीक्षक आम्हाला घडवायचेच नाहीयेत...आम्ही घडवणार तडफ़दार, द्न्यानी...समीक्षक..

नवीन समीक्षकांसाठी टिप्स...
१. कोणत्याही कलाकृतीचं तोंडभरून कौतुक करायचं सोडून द्या...तोंडभरून काय साधं सुद्धा कौतुक करू नका...
२.महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक कितीही विनोदी असो / कारुण्यपूर्ण असो/वीरश्रीयुक्त असो, तोंडावरची माशी न हलवू देता अनेक तास ओंजळीत चेहरा ठेवून निर्विकारपणे बसता आलं पाहिजे.
३.एखादे काम कितीही आवडले तरी कौतुकाचा कमाल शब्द म्हणजे बरा/ बरी हाच... पण लगेच त्यापुढे खचवणार्या वाक्यांची लाईन लावता आली पाहिजे.......

उदाहरणार्थ : सिचुएशन बघा... नाटक संपलंय आणि एक नट अप्रतिम काम करून आत्ताच शेकडो प्रेक्षकांच्या टाळ्या , हशे मिळवून तुमच्यापुढे अंमळ तरंगतच आलाय आणि त्याची जाम इच्छा आहे की तुम्हीसुद्धा त्याचे कौतुक करावे.. पण नाही, इथेच तर संयम पाळावा...तो तुमच्या कौतुकाची वाट पाहतोय.....पण त्याच्याशी त्याचे काम सोडून इतर दुनियाभरातल्या सर्व गोष्टींबद्दल उदा. हवामान, पाऊस, आंब्यांचा सीझन,सचिनची इन्जुरी, नर्मदा बचाव आंदोलन, इ.इ. बोलावे... मग तो जर जमिनीवर येतो आणि स्वत: विचारतो , " तुम्हाला काम कसं वाटलं सर?"....मान हलवत म्हणावे, " हं..आवडलं लोकांना ...( मग मोठा विराम, त्याचा चेहरा पडतो, आपला खुलतो ) मला तर काय ऐकूच आलं नाही,.. खरंच... अभिनय जरा बरा पण शब्दोच्चार अत्यंत वाईट,इतके गावरान उच्चार?? , सुरुवातीला एनर्जी किती कमी पडत होती शेवटी शेवटी तर संपलीच...आहे, पण बरं होतंय बरंका...करा करा "

४.सरावासाठी नवे नवे लोक निवडावेत...सुरुवातीलाच प्रस्थापितांशी पंगा नको...गॅदरिंगची वार्षिक नाटके करणारे तर हक्काचे गिर्‍हाइक असतात, व्यवसाय सांभाळून स्पर्धा करणारे हौशी कलाकार सरावाला फ़ार बरे....एखादा उत्साहाने फ़ुरफ़ुरणारा हौशी कलाकार पुढ्यात आलाच तर साळसूदपणे विचारावे, " का करता तुम्ही नाटक?" तो आधी गांगरतो पण मग ".... रंगभूमीची सेवा, माझी आवड जोपासायला, माझ्यातली कला पडताळून पहायला आम्ही एकत्र येऊन सगळे नोकरी - व्यवसाय सांभाळून ..." असं काहीसं भंपक बोलायला लागतो...मग त्याला बरोबर रिंगणात घ्यायचा, " अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." असल्या सरबत्तीवर भले भले खचतात ....

तुम्हाला मोठा समीक्षक व्ह्यायचेय ना?मग हे तंत्र शिकत असताना "सज्जन कलाकारावर अन्याय होतोय" वगैरे फ़ालतु गोष्टी अजिबात मनात आणू नका... शब्द हे तुमचे शस्त्र आहे, आणि ते घासून पुसून लखलखीत ठेवणे तुमचे काम आहे.... उगाच इमोशनल वगैरे व्हायचे काम नाय बरंका...

५. स्वत:ला यशस्वी समजणार्या माणसाला नामोहरम करायचे एक विशिष्ट तंत्र आहे.....नवीन ग्रुप समोर आला की अनुभवाच अभाव म्हणून नावे ठेवायची..., नॊस्टॆल्जिक व्हायचे आणि गंधर्वांची जुनी नाटके किती छान , असे आख्यान लावायचे...
जुना ग्रुप स्वत:चेच नाटक पुनरुज्जीवित करत असेल तर त्या वेळची मजा नाही...किती वर्षे तेच तेच करणार तुम्ही?? आता सत्तरीचा धैर्यधर आणि साठीची भामिनी पहायची का आम्ही??

व्यावसायिक नाटके : प्रसिद्धीलोलुपता , प्रेक्षकशरण वृत्ती त्यामुळे तोचतोचपणा.. प्रयोगाचा अभाव..
प्रायोगिक नाटके : प्रेक्षकांचे पाठबळ नाही, रिकाम्या थिएटरात कसले प्रयोग रंगणार?
विनोदी : थिल्लर उथळ पांचट पाचकळ.
थ्रिलर : नुसते मोठे सन्गीत वाजवले दर दोन मिनिटाला आणि लाईट कमी जास्त केले की थ्रिलर होते काय रे नाटक?रोमेंटिक : शारिरीक लगट आणि कामुक हावभाव म्हणजे कलाकारांमधील केमिस्ट्री नव्हे....

कोणासमोर कोणाचे कौतुक करायचे याचीही एक गंमत आहे.संगीत नाटकाला गेलात की वास्तववादी नाटकांचे कौतुक करायचे.. त्यांच्यापुढे संगीत नाटकांचे कौतुक करायचे...विनोदी नाटक / सस्पेन्स नाटक , प्रायोगिक / व्यावसायिक अशा त्या जोड्या आहेत.
६.कोणी माणूस मला अमुक तमुक स्पर्धेत अमुक तमुक बक्षीस मिळालं वगैरे सांगायला लागला की लगेच गावोगावी, गल्लोगल्ली भूछत्रांसारख्या उगवलेल्या स्पर्धा, त्यातलं राजकारण , वशिलेबाजी, भ्रष्टाचार, पैसेखाऊ परीक्षक असा जीभेचा पट्टा सैल सोडावा.... वाट्टेल ते बडबडावे.. झलक पहा, "काही उपयोग नाही रे.... आजपर्यंत असल्या शंभर स्पर्धांमध्ये शेकडो बक्षीसे वाटली गेली पण मिळाला का महाराष्ट्राला नवीन नटसम्राट ? अरे शेक्स्पीअर आणि कालिदास काय तुमची लेखनस्पर्धा जिन्कले होते?" ........खचलाच पाहिजे सांगणारा...

७. होतकरू समीक्षकांना एक भीती नेहमी वाटत असते की कोणी उलटून काही बोलले तर?? की "बाबा रे, तू किती नाटकांतून कामे केलीस? तू किती नाटके डिरेक्ट / प्रोड्यूस केलीस??:"... घाबरायचे नाही, कोणी काही विचारत नाही... जेम्स बॊंडला जसे लायसंस होते मारण्यासाठी तसे असते समीक्षकांचे... आता नीट बघा, वरील प्रत्येक उदाहरणात तुमचा स्व सुखावतोय..बघा स्वत: काहीही न करून दाखवता सेल्फ़ एस्टीम वाढवणारे हे करीअर किती महान आहे, हे तुमच्या आता लक्षात यायला लागले असेल ..
८. एखादे फ़ुटकळ वर्तमानपत्र पाहून त्यात लिहायला सुरुवात करावी.. होतकरू नाट्यसमीक्षकाचा अजून एक मोठा प्रॊब्लेम म्हणजे सोपं लिहू की अवघड?? सोपी समीक्षा लिहून सगळ्यांना कळली तर जग काय म्हणेल?? खरंय.... यशस्वी समीक्षकाने आपली समीक्षा सामान्यांना कळेल अशी लिहू नये....

खाली दिलेले काही ठराविक शब्दसंच आहेत, त्यांचा अभ्यास आणि वाक्यांत उपयोग आम्ही घोटवून घेऊ.उदाहरणार्थ...> एक.चौकट मोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न / रूढ संकेतांचे उल्लंघन करण्याचे धैर्य हे व्यक्तिरेखेच्या आत्मवंचनेला तारून नेते..>
दोन.आशयघनता आणि अनुभवातील तीव्रता मांडण्याचा अट्टाहास मुख्य शोकात्मिकेच्या संकल्पनेला मारक ठरतो..> तीन.समाजमनातील क्रूर बेगडी नैतिकता बन्दिस्त सुटसुटीत आणि नेमक्या पद्धतीनी मांडली आहे पण त्यामुळे ती क्रुत्रिम वाटते.
चार. अर्थघटन आणि स्वरूपनिर्णय करताना मंचसज्जेला आणि प्रकाशयोजनेला अनाठायी प्राधान्य>
पाच.वास्तववादी नाटकात वापरलेली प्रतीकात्मक व्यक्तिरेखाही संघर्षाचे मूळ शोधण्याचा व्रुथा प्रयत्न करते>
सहा .संहितेची प्रयोगक्षमता, आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात कलाकारांना आलेले अपयश सतत सलते...

आता या वाक्यांचा अभ्यास करा...> माणूस का लिहितो?? ... ..म्हणजे एकीकडे सर्वसामान्यांच्या नेणीवा-जाणीवा आणि दुसरीकडे एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना माझ्या स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे लेखन.....

अशा लेखनाचा फ़ायदा असा असतो की नाटक चांगले की वाईट असे काहीही न लिहिता, कोणताही पवित्रा न घेताही समीक्षेची लांबी वाढू शकते...

९. समजा तुम्ही एखाद्या लेक्चरमध्ये किंवा परिसंवादात अडचणीत सापडलात.... उदाहरणार्थ तुम्ही वास्तववादी नाटकांना एका परिसंवादात हाणत आहात, आणि एकदम कोणीतरी विचारले, ": अहो पण तुम्ही गेल्या वेळी तर त्यांचे कौतुक केले होते?" अशावेळी गडबडून न जाता पुढील तंत्र तुम्हाला वापरता येईल, संकटातून सुटण्याची पळवाट किंवा गनिमी कावा म्हणूनही याचा वापर होऊ शकतो...सोपं असतं, मुख्य विषय सोडून गाडी भलत्याच दिशेला न्यायची, ... झुडपांशेजारी बडवाबडवी करायची.." हो, हो, मी विषयावर येतोच आहे" असं अधून मधून म्हणायचे, एकदम... "भरतमुनींचा नाट्यविचार, न्यूयॊर्क ब्रॊडवे थिएटर सारखी आपल्या रंगभूमीला उन्नतावस्था आणायची असेल तर काय केले पाहिजे इ.इ. " विषयावर घसरायचे..त्यासाठी देशी विदेशी लेखकांची, रंगकर्मींची, विचारवंतांची वगैरे नावे योग्य जागी टाकता यायला हवीत....घाबरू नका, फ़ार अभ्यास करावा लागणार नाही.. याबद्दलच्या इन्स्टंट नोट्स आमच्या संस्थेतर्फ़े दिल्या जातील.(या Tangent technique साठी ही माहिती फ़ारच आवश्यक आहे....)

उदाहरणार्थ>कालिदास, भवभूति, शूद्रक यांच्या नाटकांचे बेसिक प्लॊट्स... त्यांच्यातील तुलना...
>१९ व्या शतकातील रशियन राजकीय स्थितीत तात्त्विक आणि नैतिक प्रश्न उपस्थित करणारे फ़्योडोर डोस्टोएव्स्की चे लेखन...
>कॊन्स्टन्टिन स्टॆनिस्लाव्ह्स्की आणि त्याची मेथड ऎक्टिंग
>लायोस एग्रि आणि त्याच्या आर्ट ऒफ़ ड्रामॆटिक रायटिंग या पुस्तकाच्या नोट्स....
> एरिस्टॊटल, प्लेटो, आणि सोफ़ोक्लीस यांचा प्राचीन ग्रीक रंगभूमीशी संबंध...
> ब्रॊडवे म्युझिकल्स इन न्यूयॊर्क ... अ ब्रीफ़ हिस्टरी
>बंगाल, केरळ आणि मणिपूर भागातील रंगकर्मींचे काम... रतन थियाम यांचे रिपर्टरी थिएटर


आता थोड्या अनुभवी समीक्षकासाठी काही टिप्स....

१. कंपू आणि कौतुक, .. कधी कधी कसे असते की लेखक दिग्दर्शक दुसर्या कंपूचे असतात आणि कलाकार, तंत्रद्न्य आपल्या कंपूचे असतात....अशा वेळचे परीक्षण असे लिहावे...>नाटक मंचसज्जा,प्रकाशयोजना अशा तंत्रात बरे असले तरी लेखकाला आपण का लिहित आहोत हेच न कळल्याने आणि दिग्दर्शकाची मांडणीवरील पकड घट्ट नसल्यामुळे गुणी कलाकारांची अवस्था वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे.
किंचित लोकप्रिय लोकांना सतत शिव्या द्याव्यात.... तो आपल्या कंपूत यावा म्हणून त्याला प्रेशर आणावे....

२. विद्यार्थी जवळ बाळगावेत .... स्वतंत्र विचारसरणीचे नकोत, सांगकामे बघून घ्यावेत...पुस्तकांच्या रीसर्च ला किंवा लेखनिक म्हणून मदत होते, पुस्तक प्रूफ़रीडिंग झाले की त्याला हाकलून द्यावे आणि नवीन विद्यार्थी ठेवावा.विद्यार्थ्यांना कामाला लावून कोणते लोकप्रिय नाटक कोणत्या फ्रेंच किंवा स्पॅनिश नाटकावरून ढापले आहे, त्याचा सदैव पाठपुरावा करावा....

३. स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे, किंवा चक्रमसारखे वागून पळवून लावावे.. आणि शार्प आणि टॆलंटेड नवयुवकांची गरीबांचे तेंडुलकर, गल्लीतले लागू किंवा किंचित कानेटकर, कॉपी करणे म्हणजे लेखन नव्हे किंवा मिमिक्री म्हणजे अभिनय नव्हे..अशी थट्टा उडवणे मग ते फ़िरकत नाहीत...नवीन नवीन ग्रुप्स ना उडवून लावावे, त्यांचे नाटक कधीही पहायला जाऊ नये... गेलाच तर चालू नाटकातून उठून जावे.. किंवा कोणालाही न भेटता मध्यंतरात निघून जावे, किंवा मध्यंतरात चारचौघात वाकडा चेहरा करून " हं...ssss ठीकच होतंय " असे म्हणावे..

४. सभा संमेलने अध्यक्षपद, ... नियमित नाट्यसंमेलनाला जावे, तिथे आदर की काय तो पुष्कळ मिळतो....स्वत:च्या गावाचे/ गल्लीचे/ सोसायटीचे/ बिल्डिंगचे स्पेशल नाट्यसंमेलन काढून त्याचे अध्यक्षस्थान भूषवावे...फ़िती कापाव्यात ...पैसे घेऊन बूटीक आणि सलूनचे उद्घाटन इ. सर्व गोष्टी न लाजता कराव्यात ...

५. कितीही अगम्य विषय असले तरी दर वर्षी किमान दोन पुस्तके छापावी...
उदा.>संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम...
>ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके.......
>बदलत्या सामाजिक परिस्थीतीचे, सीरियल्स आणि सिनेमाचे नाट्यव्यवसायावर होणारे दूरगामी परिणाम.
>कोकणी रंगभूमीवर वापरलेल्या गेलेल्या शिव्यांचा कोश
> पाऊस या विषयावरील नाटकांचा कोश

७. प्रस्थापितांशी स्पॊन्सर्ड पंगे घ्यावेत, स्वत:च्या जीवावर नको... तुलनेसाठी सोफ़ोक्लीस किंवा शूद्रक घ्यावा... समोरच्याला पार झोपवावा...

८. नाट्यसंमेलनात भाषणे करावीत...ज्येष्ठ समीक्षक "...." यांनी "...." या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले असे ओळखीच्या पत्रकारांना सांगून छापून आणावे... मोकळ्या प्रेक्षागृहात नसलेल्या प्रेक्षकांसमोर का होईना, टुकार परिसंवादात भाग घ्यावा...

९. अत्यंत चक्रम वागायला शिकावे..... तथाकथित हुशार माणसाचे चक्रम वागणे लोक गोड मानून घेतात...उदाहरणार्थ : वेळ न पाळणे... विसराळूपणे वागणे ( प्रत्येक भेटीत " आपण नागपूरला भेटलो होतो का? " असे विचारावे.....)विचित्र विषयावर भाषणे करावीत ....( उदाहरणार्थ एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस समारंभात भारताची अण्वस्त्रसज्जता यावर अभ्यासपूर्ण भाषण करावे , वर कोणी विचारलेच तर कलाकाराची देशाशी नाळ जोडली गेलेली असते, कला आणि समाजकारण वेगळे नाहीच असे ठासून सांगावे...)
)
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे...

या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तर एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.....आम्ही अनेकनाट्यसमीक्षक घडवले आहेत..घडवत आहोत...( आजकाल अनेकानेक क्लास निघत आहेत, पण ओरिजिनल एकच, भडकमकर्स करीअर गायडंस क्लास) )...लोकहो, उठा जागे व्हा.. कमी कष्टात भरपूर आदर प्राप्त करा,, प्रचंड प्रसिद्धी मिळवा...या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...bhadakamakar'scareermanagementsystems.org/naaTyasameekShaa

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १

आजच्या स्पर्धेच्या युगात नवयुवक भांबावून गेला आहे.... मागे पडण्याच्या भीतीने घाबरला आहे, पण आता चिंता नको...आम्ही आलो आहोत आमचे करीअर गायडंस वर्ग घेऊन...प्रत्येक भागात एका नवीन करीअर ची ओळख करून द्यायचा प्रयत्न करू...

आपल्याला गायक व्हायचे आहे काय? .. सुरेल गळा नाही, मेहनत नको, गुरूकडे शिकायला वेळ नाही? काही हरकत नाही... ते फ़ारसे महत्त्वाचे नाही...अहो एकदा आम्ही आपले काम हाती घेतले म्हणजे प्रश्नच नाही ...आमच्या ऍकॅडमीतर्फ़े आपले पॊपगायकीचे करीअर आम्ही अगदी सहज शास्त्रोक्त पद्धतीने मॅनेज करून देऊ.....होता ना,पूर्वी असा गैरसमज होता की चांगले गाणे तयार होण्यासाठी उत्तम शब्द, सुरेल आवाजावर घेतलेली मेहनत आणि मेलडी वगैरेची आवश्यकता असते...खोटंय सगळं...

१.तुमची इमेज महत्त्वाची आहे... तुमचं नाव कसं भारदस्त हवं..स्वत:चं फ़ालतु नाव अजिबात चालणार नाही..त्यावर सोपा उपाय आहे, अम्रुतसर किंवा भटिंड्याची टेलिफोन डिरेक्टरी घ्यावी....तुमच्या जन्मतारखेचा जो अंक असेल त्याच्या वर्गाइतक्या आकड्याच्या पानावर जावे, वरून जन्मतारखेइतक्या आकड्याची ओळ सिलेक्ट करावी... ते तुमचे नाव.

२.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी...

३.खास भडक रंगाचे जर्द जांभळे, मोरपंखी कपडे वापरावेत...दाढी, फ़ेटा असल्यास उत्तम...

४.स्वत:ची गाणी स्वत:च तयार करा. ... (कोण म्हणाले, गीतकार वगैरे स्पेशल जॊब आहे?? काहीतरीच..गेला तो जमाना...)..थोडा पन्जाबी शब्दसन्ग्रह वाढवून घ्या..फ़ार नाही, कुडी, मुंडे, बल्ले बल्ले, शावा शावा,माही वे, तारा रारा, रबरब,वल्लावल्ला वगैरे.. ( काय म्हणता? अर्थ? अर्थाशी आपल्याला काय करायचेय??).... अहो इतक्या शब्दसंग्रहावर तुम्हाला एक अल्बम सहज करता येईल....प्रत्येक ओळीत तेच तेच शब्द आलटून पालटून वापरावेत..

ध्रुपद तयार करायची एक सोपी युक्ती आहे, स्टीलचे भांडे जमिनीवर आपटून तो आवाज शब्दबद्ध करावा.....किंवा काही अभ्यासू आणि रिसर्च ओरिएंटेड लोकांना आम्ही मराठी बडबडगीतातील शब्द वापरायला सांगतो ( उदाहरणार्थ टुणूकटुणूक वगैरे...)

भंगडा पॊप मधील काही महत्त्वाचे गीतलेखनाचे पॆटर्न.... नमुन्यादाखल काही उदाहरणे... आपणही आपापली भरपूर बनवू शकता..
टडंग टूक ता टडंग टूक तातिकडम बगडम ता ता ता
ओ कुडी तेरी बल्ले बल्लेजा मुंडे मेरे शावा शावा

धिकताना तिकताना तिकताना टिंग
तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम
माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब.
रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब....

५. मग दणकट पॊवरफ़ुल ठेका निवडून चांगल्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग उरकून घ्यावे, अगदीच अवघड जात असेल तर काही गायक आम्ही भूत-गायनासाठी उपलब्ध करून देऊ हो, ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही.

६ व्हिडिओ चित्रिकरणाबद्दल महत्त्वाच्या टिप्स...ऐपतीप्रमाणे एक दोन गरीबांच्या मिस इंडिया घ्याव्यात, खर्‍या मिळाल्यास उत्तम... त्यांच्यामागे त्रेपन्न डान्स ट्रूप मधल्या तुमच्याशी लगट करत कवायत करणार्‍या कन्यका, आणि पुढे दाढी फ़ेटा लावलेले तुम्ही स्ट्रिप्टीज करत करत शेवटच्या कडव्याच्या शेवटच्या ओळीपर्यंत आपले सहागठ्ठी पोटस्नायू दाखवता ... ( कुठपर्यंत पोचायचे यात इथे खूप व्हेरिएशन करता येतात, गायकाच्या " लाज " या संकल्पनेवर ते अवलंबून)...
. आता फ़ारच महत्त्वाचा भाग...गाता येण्यापेक्षा हा भाग फ़ार महत्त्वाचा आहे...

७. गीतामध्ये काहीतरी फ़ालतु कॊंट्रोव्हर्सी निर्माण करावी.... रिकामटेकड्या न्यूज चॆनलना प्रसिद्धीसाठी रक्कम द्यावी...
८. काउंटडाउन शो मध्ये पैसे चारून नंबर लावावेत....
९.कोणत्यातरी चॆनलवर सुरू असलेल्या गीतगायन स्पर्धेला किंवा नाचाच्या स्पर्धेला जज म्हणून जावे. तिथे भांडाभांड करावी... जुन्या जाणत्या मंडळींना शिव्या घालाव्यात.... लक्षात ठेवावे, कशीही प्रसिद्धी, उत्तम प्रसिद्धी....
.१०. एका टुक्कार अय्टेम डान्सर चा आपण विनयभंग केला किंवा नाही यावर फ़िल्मी वर्तुळात खबर सोडून द्यावी... काही मोबाईल व्हिडिओ पसरवावेत. त्यावर निरुद्योगी न्यूज चॆनलवर जाऊन मुलाखती द्याव्यात, रडून दाखवावे... माफ़ी मागावी... आणि मग तिला प्रेमभराने आलिंगन देत तिला आपला अल्बम भेट द्यावा..... तिच्या आईच्या पाया पडून " हीच माझी आई आहे " असे ओरडून ओरडून सांगावे....

११.म्यूझिक चॆनल वर व्ही जे लोकांची असंबद्ध बड्बड सहन करत करत आणि मग त्यावरताण भम्पक बोलत बोलत मुलाखती द्याव्यात.

१२. मेनस्ट्रीम सिनेमात ( यशराज , धर्मा वगैरे मोठे मासे सापडल्यास उत्तम ) तुमच्या अल्बम मधले गाणे घुसडता आले तर पहावे.....

या साध्या साध्या टिप्स वापरल्यात तर यश तुमचेच आहे.... आम्ही अनेक पॊप गायक घडवले आहेत..घडवत आहोत...( आजकाल अनेकानेक क्लास निघत आहेत, पण ओरिजिनल एकच, भडकमकर्स करीअर गायडंस क्लास) )...लोकहो, उठा जागे व्हा.. कमी कष्टात भरपूर प्राप्ती करा, प्रचंड प्रसिद्धी मिळवा...या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...bhadakamakar'scareermanagementsystems.org/bhangadapop

एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...

आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले...जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे...
सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील... ( इथे तर काय, सतत महागुरु आले, महागुरू गेले, महागुरु उठले , महागुरु बोलले, महागुरूंनी कौतुक केले...)हा माणूस नृत्यामधला महागुरू ?? बासच...स्वत:च प्रोड्यूसर आणि स्वत:च डिरेक्टर असताना त्याच शो मध्ये स्वत:चे इतके कौतुक करून घेण्याचे कारण मला कळत नाही.... यांना कोणी मराठी थोर नृत्यदिग्दर्शक किंवा नर्तक मिळाला नाही काय???( आहेत , काही जूरी आहेत...असून नसल्यासारखे ... त्यांच्या कॉमेंट्स एका वाक्यात गुंडाळायला लावतात...)
आणि महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार, मग त्या कस्टमरी टाळ्या वाजणार, मग महागुरू पुन्हा ऐटीत डावीकडे उजवीकडे पाहणार, मग म्हणणार, " ..नाही , म्हणजे मला डीटेल्स कळत नाहीत, पण तू अन्तर्‍याच्या सुरुवातीला एक स्टेप मिस केलीस आणि विसरलीस , ऎम आय राईट?? " मग पुन्हा डावीकडे मग उजवीकडे लूक.... पुन्हा टाळ्या....मग ..." मी जेव्हा बाईच्या वेषात डांस केला होता तेव्हा ....." ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....ज्याची बॅट आणि बॉल असतो तो पोरगा तीन चार वेळा आउट होउनही परत बॅटिंग करतोच, तसं वाटतं हे पाहताना....
बान्देकरांचे एक कौशल्य बाकी मस्तच आहे, ते जोक करायचा प्रचंड प्रयत्न करतात....पन्धरा वीस प्रयत्नांनंतर त्यांना दीड तासांत एखादा जोक जमून जातो...काय चिकाटी आहे...!!! त्यांच्या जोक वरचे हशे एडिटिन्ग मध्ये इन्सर्ट करावे लागत असणार...बर्‍याचदा वाक्यरचना चुकल्यामुळे आणि टायमिंग चुकल्याने त्यांचे जोक फ़सतात, आणि स्पर्धकाला कसनुसं हसावं लागतं. ( ते तरी काय करणार बिचारे?) त्यांचे फ़सलेले जोक एडिट का करत नाहीत?? इतके जोक फ़सतात की एडिट तरी किती करणार म्हणा...( सचिन ने बान्देकरांचे कॉमेडी टायमिंग बद्दल क्लासेस घ्यावेत)...हा व्यवस्थित स्क्रिप्ट नसल्याचा परिणाम आहे... ( ऐन वेळी होते ती फक्त फजिती... पी .एल.)
पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....
कोण स्पर्धक आला आणि कोण गेला, कसा नाचला, यात आम्हाला स्वारस्य नाही परंतु या कार्यक्रमामुळे सचिन यांच्याबद्दलचा आदरभावाला धक्का निश्चित लागला....

my sketches... some old portraits..