Sunday, May 18, 2008

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो... यात पैसा फ़ार नसेल,पण आज पालकांना जाणीव नाही की या कलेतूनही किती उत्तम प्रसिद्धी मिळवता येते...हा भाग थोडा लांबला आहे असे तुम्हाला वाटेल पण आमच्याकडे जे नॉलेज आहे ते आम्ही मुक्तपणे वाटून टाकतो ( इतर क्लासेस प्रमाणे हातचे राखून आम्ही शिकवत नसतो)

हे करीअर निवडण्या आधी आम्ही पालकांशी चर्चा करतो, कधी कल चाचणी ( ऎप्टिट्यूड टेस्ट) सुद्धा घेतो...आमच्या पाहणीत असे आढळून आले आहे की सामान्यत: काही विशेष गुण असलेली मंडळी यात फ़ार उंची गाठतात...नाही, म्हणजे आम्ही त्यांना शिकवतोच पण स्वत: कडे काही खास असलं तर आम्हालाही मेहनत घ्यायला मजा येते..

.उदा. १. ही मुलं लहानपणापासूनच स्वत:ला कोणीतरी विशेष व्यक्तीमत्त्व समजतात, त्यांचा रथ जमिनीवरून २ इंच चालतो....
२. शाळेत ही मुले मास्तरांना सतत नडतात, शंका विचारतात आणि स्वत:च्या बुद्धीवैभवाचे प्रदर्शन करतात.
३.त्यांना खेळापेक्षा खेळाच्या कॊमेंटरीत, सिनेमा पाहण्यापेक्षा आणि गाणी-डांस स्वत: करण्यापेक्षा त्यावरील चर्चेत जास्त रस असतो.
असा एखादा हिरा आमच्या पाहण्यात आला तर आम्ही त्याला उत्तम पैलू पाडून सहज नाट्यसमीक्षक बनवू शकतो.....

सुरसुरी : खर्‍या समीक्षकाला अशी सतत सुरसुरी येत राहिली पाहिजे की आता कोणाच्या कलेची वाट लावू... जीभ अशी लवलवायला पाहिजे, लेखणी थरारली पाहिजे...बोटं नुसती कीबोर्ड वर पडायला आसुसली पाहिजेत... असा कोणी लेखक, नट निर्माता बर्याच दिवसांत सापडला नाही तर आतून असं तुटलं पाहिजे, ती तळमळ जाणवली पाहिजे.....

एक लक्षात घ्या की आमच्या क्लासमध्ये अमुक अमुक ची भूमिका आवडली, यांची कामे ठीक्ठाक असली सपक आणि गुळमुळीत समीक्षा लिहिणारे नाट्यसमीक्षक आम्हाला घडवायचेच नाहीयेत...आम्ही घडवणार तडफ़दार, द्न्यानी...समीक्षक..

नवीन समीक्षकांसाठी टिप्स...
१. कोणत्याही कलाकृतीचं तोंडभरून कौतुक करायचं सोडून द्या...तोंडभरून काय साधं सुद्धा कौतुक करू नका...
२.महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटक कितीही विनोदी असो / कारुण्यपूर्ण असो/वीरश्रीयुक्त असो, तोंडावरची माशी न हलवू देता अनेक तास ओंजळीत चेहरा ठेवून निर्विकारपणे बसता आलं पाहिजे.
३.एखादे काम कितीही आवडले तरी कौतुकाचा कमाल शब्द म्हणजे बरा/ बरी हाच... पण लगेच त्यापुढे खचवणार्या वाक्यांची लाईन लावता आली पाहिजे.......

उदाहरणार्थ : सिचुएशन बघा... नाटक संपलंय आणि एक नट अप्रतिम काम करून आत्ताच शेकडो प्रेक्षकांच्या टाळ्या , हशे मिळवून तुमच्यापुढे अंमळ तरंगतच आलाय आणि त्याची जाम इच्छा आहे की तुम्हीसुद्धा त्याचे कौतुक करावे.. पण नाही, इथेच तर संयम पाळावा...तो तुमच्या कौतुकाची वाट पाहतोय.....पण त्याच्याशी त्याचे काम सोडून इतर दुनियाभरातल्या सर्व गोष्टींबद्दल उदा. हवामान, पाऊस, आंब्यांचा सीझन,सचिनची इन्जुरी, नर्मदा बचाव आंदोलन, इ.इ. बोलावे... मग तो जर जमिनीवर येतो आणि स्वत: विचारतो , " तुम्हाला काम कसं वाटलं सर?"....मान हलवत म्हणावे, " हं..आवडलं लोकांना ...( मग मोठा विराम, त्याचा चेहरा पडतो, आपला खुलतो ) मला तर काय ऐकूच आलं नाही,.. खरंच... अभिनय जरा बरा पण शब्दोच्चार अत्यंत वाईट,इतके गावरान उच्चार?? , सुरुवातीला एनर्जी किती कमी पडत होती शेवटी शेवटी तर संपलीच...आहे, पण बरं होतंय बरंका...करा करा "

४.सरावासाठी नवे नवे लोक निवडावेत...सुरुवातीलाच प्रस्थापितांशी पंगा नको...गॅदरिंगची वार्षिक नाटके करणारे तर हक्काचे गिर्‍हाइक असतात, व्यवसाय सांभाळून स्पर्धा करणारे हौशी कलाकार सरावाला फ़ार बरे....एखादा उत्साहाने फ़ुरफ़ुरणारा हौशी कलाकार पुढ्यात आलाच तर साळसूदपणे विचारावे, " का करता तुम्ही नाटक?" तो आधी गांगरतो पण मग ".... रंगभूमीची सेवा, माझी आवड जोपासायला, माझ्यातली कला पडताळून पहायला आम्ही एकत्र येऊन सगळे नोकरी - व्यवसाय सांभाळून ..." असं काहीसं भंपक बोलायला लागतो...मग त्याला बरोबर रिंगणात घ्यायचा, " अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." असल्या सरबत्तीवर भले भले खचतात ....

तुम्हाला मोठा समीक्षक व्ह्यायचेय ना?मग हे तंत्र शिकत असताना "सज्जन कलाकारावर अन्याय होतोय" वगैरे फ़ालतु गोष्टी अजिबात मनात आणू नका... शब्द हे तुमचे शस्त्र आहे, आणि ते घासून पुसून लखलखीत ठेवणे तुमचे काम आहे.... उगाच इमोशनल वगैरे व्हायचे काम नाय बरंका...

५. स्वत:ला यशस्वी समजणार्या माणसाला नामोहरम करायचे एक विशिष्ट तंत्र आहे.....नवीन ग्रुप समोर आला की अनुभवाच अभाव म्हणून नावे ठेवायची..., नॊस्टॆल्जिक व्हायचे आणि गंधर्वांची जुनी नाटके किती छान , असे आख्यान लावायचे...
जुना ग्रुप स्वत:चेच नाटक पुनरुज्जीवित करत असेल तर त्या वेळची मजा नाही...किती वर्षे तेच तेच करणार तुम्ही?? आता सत्तरीचा धैर्यधर आणि साठीची भामिनी पहायची का आम्ही??

व्यावसायिक नाटके : प्रसिद्धीलोलुपता , प्रेक्षकशरण वृत्ती त्यामुळे तोचतोचपणा.. प्रयोगाचा अभाव..
प्रायोगिक नाटके : प्रेक्षकांचे पाठबळ नाही, रिकाम्या थिएटरात कसले प्रयोग रंगणार?
विनोदी : थिल्लर उथळ पांचट पाचकळ.
थ्रिलर : नुसते मोठे सन्गीत वाजवले दर दोन मिनिटाला आणि लाईट कमी जास्त केले की थ्रिलर होते काय रे नाटक?रोमेंटिक : शारिरीक लगट आणि कामुक हावभाव म्हणजे कलाकारांमधील केमिस्ट्री नव्हे....

कोणासमोर कोणाचे कौतुक करायचे याचीही एक गंमत आहे.संगीत नाटकाला गेलात की वास्तववादी नाटकांचे कौतुक करायचे.. त्यांच्यापुढे संगीत नाटकांचे कौतुक करायचे...विनोदी नाटक / सस्पेन्स नाटक , प्रायोगिक / व्यावसायिक अशा त्या जोड्या आहेत.
६.कोणी माणूस मला अमुक तमुक स्पर्धेत अमुक तमुक बक्षीस मिळालं वगैरे सांगायला लागला की लगेच गावोगावी, गल्लोगल्ली भूछत्रांसारख्या उगवलेल्या स्पर्धा, त्यातलं राजकारण , वशिलेबाजी, भ्रष्टाचार, पैसेखाऊ परीक्षक असा जीभेचा पट्टा सैल सोडावा.... वाट्टेल ते बडबडावे.. झलक पहा, "काही उपयोग नाही रे.... आजपर्यंत असल्या शंभर स्पर्धांमध्ये शेकडो बक्षीसे वाटली गेली पण मिळाला का महाराष्ट्राला नवीन नटसम्राट ? अरे शेक्स्पीअर आणि कालिदास काय तुमची लेखनस्पर्धा जिन्कले होते?" ........खचलाच पाहिजे सांगणारा...

७. होतकरू समीक्षकांना एक भीती नेहमी वाटत असते की कोणी उलटून काही बोलले तर?? की "बाबा रे, तू किती नाटकांतून कामे केलीस? तू किती नाटके डिरेक्ट / प्रोड्यूस केलीस??:"... घाबरायचे नाही, कोणी काही विचारत नाही... जेम्स बॊंडला जसे लायसंस होते मारण्यासाठी तसे असते समीक्षकांचे... आता नीट बघा, वरील प्रत्येक उदाहरणात तुमचा स्व सुखावतोय..बघा स्वत: काहीही न करून दाखवता सेल्फ़ एस्टीम वाढवणारे हे करीअर किती महान आहे, हे तुमच्या आता लक्षात यायला लागले असेल ..
८. एखादे फ़ुटकळ वर्तमानपत्र पाहून त्यात लिहायला सुरुवात करावी.. होतकरू नाट्यसमीक्षकाचा अजून एक मोठा प्रॊब्लेम म्हणजे सोपं लिहू की अवघड?? सोपी समीक्षा लिहून सगळ्यांना कळली तर जग काय म्हणेल?? खरंय.... यशस्वी समीक्षकाने आपली समीक्षा सामान्यांना कळेल अशी लिहू नये....

खाली दिलेले काही ठराविक शब्दसंच आहेत, त्यांचा अभ्यास आणि वाक्यांत उपयोग आम्ही घोटवून घेऊ.उदाहरणार्थ...> एक.चौकट मोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न / रूढ संकेतांचे उल्लंघन करण्याचे धैर्य हे व्यक्तिरेखेच्या आत्मवंचनेला तारून नेते..>
दोन.आशयघनता आणि अनुभवातील तीव्रता मांडण्याचा अट्टाहास मुख्य शोकात्मिकेच्या संकल्पनेला मारक ठरतो..> तीन.समाजमनातील क्रूर बेगडी नैतिकता बन्दिस्त सुटसुटीत आणि नेमक्या पद्धतीनी मांडली आहे पण त्यामुळे ती क्रुत्रिम वाटते.
चार. अर्थघटन आणि स्वरूपनिर्णय करताना मंचसज्जेला आणि प्रकाशयोजनेला अनाठायी प्राधान्य>
पाच.वास्तववादी नाटकात वापरलेली प्रतीकात्मक व्यक्तिरेखाही संघर्षाचे मूळ शोधण्याचा व्रुथा प्रयत्न करते>
सहा .संहितेची प्रयोगक्षमता, आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात कलाकारांना आलेले अपयश सतत सलते...

आता या वाक्यांचा अभ्यास करा...> माणूस का लिहितो?? ... ..म्हणजे एकीकडे सर्वसामान्यांच्या नेणीवा-जाणीवा आणि दुसरीकडे एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना माझ्या स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया म्हणजे लेखन.....

अशा लेखनाचा फ़ायदा असा असतो की नाटक चांगले की वाईट असे काहीही न लिहिता, कोणताही पवित्रा न घेताही समीक्षेची लांबी वाढू शकते...

९. समजा तुम्ही एखाद्या लेक्चरमध्ये किंवा परिसंवादात अडचणीत सापडलात.... उदाहरणार्थ तुम्ही वास्तववादी नाटकांना एका परिसंवादात हाणत आहात, आणि एकदम कोणीतरी विचारले, ": अहो पण तुम्ही गेल्या वेळी तर त्यांचे कौतुक केले होते?" अशावेळी गडबडून न जाता पुढील तंत्र तुम्हाला वापरता येईल, संकटातून सुटण्याची पळवाट किंवा गनिमी कावा म्हणूनही याचा वापर होऊ शकतो...सोपं असतं, मुख्य विषय सोडून गाडी भलत्याच दिशेला न्यायची, ... झुडपांशेजारी बडवाबडवी करायची.." हो, हो, मी विषयावर येतोच आहे" असं अधून मधून म्हणायचे, एकदम... "भरतमुनींचा नाट्यविचार, न्यूयॊर्क ब्रॊडवे थिएटर सारखी आपल्या रंगभूमीला उन्नतावस्था आणायची असेल तर काय केले पाहिजे इ.इ. " विषयावर घसरायचे..त्यासाठी देशी विदेशी लेखकांची, रंगकर्मींची, विचारवंतांची वगैरे नावे योग्य जागी टाकता यायला हवीत....घाबरू नका, फ़ार अभ्यास करावा लागणार नाही.. याबद्दलच्या इन्स्टंट नोट्स आमच्या संस्थेतर्फ़े दिल्या जातील.(या Tangent technique साठी ही माहिती फ़ारच आवश्यक आहे....)

उदाहरणार्थ>कालिदास, भवभूति, शूद्रक यांच्या नाटकांचे बेसिक प्लॊट्स... त्यांच्यातील तुलना...
>१९ व्या शतकातील रशियन राजकीय स्थितीत तात्त्विक आणि नैतिक प्रश्न उपस्थित करणारे फ़्योडोर डोस्टोएव्स्की चे लेखन...
>कॊन्स्टन्टिन स्टॆनिस्लाव्ह्स्की आणि त्याची मेथड ऎक्टिंग
>लायोस एग्रि आणि त्याच्या आर्ट ऒफ़ ड्रामॆटिक रायटिंग या पुस्तकाच्या नोट्स....
> एरिस्टॊटल, प्लेटो, आणि सोफ़ोक्लीस यांचा प्राचीन ग्रीक रंगभूमीशी संबंध...
> ब्रॊडवे म्युझिकल्स इन न्यूयॊर्क ... अ ब्रीफ़ हिस्टरी
>बंगाल, केरळ आणि मणिपूर भागातील रंगकर्मींचे काम... रतन थियाम यांचे रिपर्टरी थिएटर


आता थोड्या अनुभवी समीक्षकासाठी काही टिप्स....

१. कंपू आणि कौतुक, .. कधी कधी कसे असते की लेखक दिग्दर्शक दुसर्या कंपूचे असतात आणि कलाकार, तंत्रद्न्य आपल्या कंपूचे असतात....अशा वेळचे परीक्षण असे लिहावे...>नाटक मंचसज्जा,प्रकाशयोजना अशा तंत्रात बरे असले तरी लेखकाला आपण का लिहित आहोत हेच न कळल्याने आणि दिग्दर्शकाची मांडणीवरील पकड घट्ट नसल्यामुळे गुणी कलाकारांची अवस्था वादळात भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे.
किंचित लोकप्रिय लोकांना सतत शिव्या द्याव्यात.... तो आपल्या कंपूत यावा म्हणून त्याला प्रेशर आणावे....

२. विद्यार्थी जवळ बाळगावेत .... स्वतंत्र विचारसरणीचे नकोत, सांगकामे बघून घ्यावेत...पुस्तकांच्या रीसर्च ला किंवा लेखनिक म्हणून मदत होते, पुस्तक प्रूफ़रीडिंग झाले की त्याला हाकलून द्यावे आणि नवीन विद्यार्थी ठेवावा.विद्यार्थ्यांना कामाला लावून कोणते लोकप्रिय नाटक कोणत्या फ्रेंच किंवा स्पॅनिश नाटकावरून ढापले आहे, त्याचा सदैव पाठपुरावा करावा....

३. स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे, किंवा चक्रमसारखे वागून पळवून लावावे.. आणि शार्प आणि टॆलंटेड नवयुवकांची गरीबांचे तेंडुलकर, गल्लीतले लागू किंवा किंचित कानेटकर, कॉपी करणे म्हणजे लेखन नव्हे किंवा मिमिक्री म्हणजे अभिनय नव्हे..अशी थट्टा उडवणे मग ते फ़िरकत नाहीत...नवीन नवीन ग्रुप्स ना उडवून लावावे, त्यांचे नाटक कधीही पहायला जाऊ नये... गेलाच तर चालू नाटकातून उठून जावे.. किंवा कोणालाही न भेटता मध्यंतरात निघून जावे, किंवा मध्यंतरात चारचौघात वाकडा चेहरा करून " हं...ssss ठीकच होतंय " असे म्हणावे..

४. सभा संमेलने अध्यक्षपद, ... नियमित नाट्यसंमेलनाला जावे, तिथे आदर की काय तो पुष्कळ मिळतो....स्वत:च्या गावाचे/ गल्लीचे/ सोसायटीचे/ बिल्डिंगचे स्पेशल नाट्यसंमेलन काढून त्याचे अध्यक्षस्थान भूषवावे...फ़िती कापाव्यात ...पैसे घेऊन बूटीक आणि सलूनचे उद्घाटन इ. सर्व गोष्टी न लाजता कराव्यात ...

५. कितीही अगम्य विषय असले तरी दर वर्षी किमान दोन पुस्तके छापावी...
उदा.>संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम...
>ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके.......
>बदलत्या सामाजिक परिस्थीतीचे, सीरियल्स आणि सिनेमाचे नाट्यव्यवसायावर होणारे दूरगामी परिणाम.
>कोकणी रंगभूमीवर वापरलेल्या गेलेल्या शिव्यांचा कोश
> पाऊस या विषयावरील नाटकांचा कोश

७. प्रस्थापितांशी स्पॊन्सर्ड पंगे घ्यावेत, स्वत:च्या जीवावर नको... तुलनेसाठी सोफ़ोक्लीस किंवा शूद्रक घ्यावा... समोरच्याला पार झोपवावा...

८. नाट्यसंमेलनात भाषणे करावीत...ज्येष्ठ समीक्षक "...." यांनी "...." या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केले असे ओळखीच्या पत्रकारांना सांगून छापून आणावे... मोकळ्या प्रेक्षागृहात नसलेल्या प्रेक्षकांसमोर का होईना, टुकार परिसंवादात भाग घ्यावा...

९. अत्यंत चक्रम वागायला शिकावे..... तथाकथित हुशार माणसाचे चक्रम वागणे लोक गोड मानून घेतात...उदाहरणार्थ : वेळ न पाळणे... विसराळूपणे वागणे ( प्रत्येक भेटीत " आपण नागपूरला भेटलो होतो का? " असे विचारावे.....)विचित्र विषयावर भाषणे करावीत ....( उदाहरणार्थ एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस समारंभात भारताची अण्वस्त्रसज्जता यावर अभ्यासपूर्ण भाषण करावे , वर कोणी विचारलेच तर कलाकाराची देशाशी नाळ जोडली गेलेली असते, कला आणि समाजकारण वेगळे नाहीच असे ठासून सांगावे...)
)
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे...

या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तर एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.....आम्ही अनेकनाट्यसमीक्षक घडवले आहेत..घडवत आहोत...( आजकाल अनेकानेक क्लास निघत आहेत, पण ओरिजिनल एकच, भडकमकर्स करीअर गायडंस क्लास) )...लोकहो, उठा जागे व्हा.. कमी कष्टात भरपूर आदर प्राप्त करा,, प्रचंड प्रसिद्धी मिळवा...या संकेतस्थळाला जरूर भेट द्या...bhadakamakar'scareermanagementsystems.org/naaTyasameekShaa

No comments: