Saturday, June 21, 2008

कुत्रा आणि मी ... काही अनुभव...



".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं... आता मी जे पुढं लिहिलंय त्या आहेत निबंधात न लिहिता येण्यासारख्या गोष्टी..

काही मंडळींना भटक्या कुत्र्यांबद्दल भन्नाट प्रेम असतं..पण त्यांना पहाटे सायकलवरून कामावर जायचं नसतं, किंवा रात्रपाळीवरून परत येताना मागे लागलेल्या कुत्र्यांमुळं खड्ड्यात पडावं लागलेलं नसतं..किंवा पोटावर इन्जेक्शनाची नक्शी काढून घ्यावी लागलेली नसते.... भटक्या कुत्र्यांचा त्रास शक्य ते उपाय वापरून बंद केला पाहिजे असं खुद्द अहिंसावादी गांधीजींनीही म्हटलं होतं म्हणे...हे तर भटक्या कुत्र्यांचं झालं ..पाळीव कुत्रे तरी काय सारे नियंत्रणात असतात काय??

हे सारं इथे आठवण्याचं कारण म्हणजे कालच मी एका ओळखीच्या गृहस्थांकडे गेलो असताना त्यांनी पाळलेल्या एका जर्मन शेफर्ड जातीच्या रॉकी नामक लाडक्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केला...हो, हो, मी हल्लाच म्हणणार.. कुत्रा पाळणार्‍यांनी म्हणावं की " रॉकी जरासा चिडला असेल इतकंच"... आता कोणी म्हणेल,", तुम्ही कशाला त्याची खोड काढायला गेलात? "... खरं सांगतो, " आपण काहीच केलं नाही..." आता त्या अक्षरश: वाघासारख्या प्राण्याची खोडी काढण्याइतके आम्ही निर्बुद्ध नाही हो.....

त्या रॉकीला असा अंगणात मोकळा सोडलेला..घराला साडेपाच फ़ुटी उंच भिंत आणि लोखंडी गेट....मी गेटच्या बाहेरून बेल वाजवली आणि गेटपाशी उभा राहिलो, ते काही रॊकीला पसंत पडले नसावे... त्याने माझ्या दिशेने गुरकावून उडी मारायला सुरुवात केली, त्याचे पंजे चांगले माझ्या डोक्याच्याही वर जाणारे...त्याचा तो थयथयाट पाहूनही मी काही घाबरलो नाही, मध्ये भक्कम लोखंडी गेट होते ना...मी शांत उभा राहिलो...मग त्याने भुंकायला सुरुवत केली... मग घरातून काही लोक आले , त्याला घेऊन आत गेले, गेटच्या बाहेरूनच माझ्याशी बोलले ,

माझे काम झाले, मी जाणार तेवढ्यात घराच्या आतून सुसाट वेगाने रॊकी माझ्या दिशेने भुंकत आला, मी बाहेर जायला चालायला सुरुवात केली होती, पण त्याने भिंतीवर उडी मारली, आणि ज्या क्षणी माझ्या लक्षात आले की रॉकीच्या क्षमतेसाठी ही भिंत अपुरी आहे, आणि उडी मारून तो पलिकडे येणार, त्यावेळी मात्र माझे धाबे दणाणले, आसपास कोणी नाही... घरातल्यांच्या तोंडी सूचनेला रॊकी आवरत नाही हे दिसतच होते...रस्त्यातच हा रॊकी नावाचा वाघ आपल्याला फाडून खाणार असे मला दिसायला लागले..... पुढे काय झाले नीट आठवत नाही, मी भीतीने हंबरडा फोडला की तोंडातून आवाजच फ़ुटला नाही ते आठवतच नाही..धावण्याचा क्षीण प्रयत्न केला असावा,..कोणत्याही क्षणी आपल्या परमप्रिय शरीराचा लचका एक हिंस्त्र प्राणी तोडणार आहे, हे फीलिंग फार भयानक असतं खरं...मला शेजारच्या रो हाउसची भिंत वर चढून पार करावीशी वाटली... मी तिकडे धावून पलिकडे उडी मारली की काय केले आठवत नाही, आजूबाजूला आरडाओरडा झाला थोडासा..

रॉकीचे शेजारी त्यांच्या अंगणात खुर्ची घेऊन पेपर वाचत बसले होते , तेही ओरडू लागले...त्यांनी माझ्या दिशेने प्लास्टिकची खुर्ची फ़ेकली , आणि हातात धरून उभे रहा अशी सूचना केली...दोन चार सेकंदच गेली असतील मध्ये.. भानावर आलो तेव्हा मी दोन घरे पलिकडच्या भिंतीच्या आत खुर्ची धरून उभा होतो,.. तेव्हाही त्या खुर्चीचा फ़ार आधार वाटला हे खरं... तिथे कसा पोचलो ते काही आठवत नाही...( सिंहाच्या पिंजर्यात लाईट गेल्यानंतर दामू धोत्रे हे रिंगमास्टर असेच हातात स्टूल धरून उभे असतील या कल्पनेने मला आत्ता हसू येतेय.. आठवला तिसरीतला "प्रकाश प्रकाश " हा धडा")..मधल्या काळात रॉकीला आत नेले असावे मालकाने... चार क्षण दम खाल्ला, देवाचे आभार मानले... पायात जोरात कळ गेली...कुठेतरी उडी मारायच्या प्रयत्नात मी पडलो असणार , पायाला बरंच खरचटलं होतं, आणि मुका मार थोडासा...पाय ठणकत होता... हे अगदीच थोडक्यात भागलं.. पण भीतीनं मी थरथरत असणार.. .. माझी अवस्था पाहून शेजार्‍यांनी ग्लासभर पाणी आणून दिले, त्यांच्यासाठी हे प्रसंग नित्याचे असावेत...त्यांना माझी दया वगैरे आली असावी... मला बसा म्हणाले पाच मिनिटे... रॉकीच्या शेजारच्या घरात अजून थांबायची माझी इच्छा नव्हती, .. मी दुखर्‍या पायाने रॉकी मागे येत नाही ना हे पाहत पाहत , शक्य तितक्या वेगाने तिथून सटकलो... दुपारी रस्त्यावर गर्दी नव्हती, खरंतर कोणीच नव्हते...त्यामुळे आपल्या शेजारचा दातांचा डॉक्टर कुत्र्याला घाबरून खड्ड्यात पडला असा विनोदी प्रसंग लोकांनी मिस केला ...
या सार्‍यात रॉकीची चूक नाहीच पण त्याच्या मालकांची काही चूक आहे की नाही, असलीच तर किती ? हे ही मला माहित नाही...

लहानपणापासून माझं कुत्र्याशी फ़ार जमलं नाहीच... दुसरीत कोल्हापुरात एक पामेरियन कुत्रा चावला तेव्हा एक टिटॆनसच्या इन्जेक्शनावर भागलं... आठवीत पुन्हा पामेरियनच चावलं तेव्हा महापालिकेच्या दवाखान्यात जाऊन पोटावर रेबीजची तीन इन्जेक्शनं घेतली होती.. आणि काही कारण नसताना कालचा जर्मन शेफर्ड....माझं नशीब थोर की तो चावला नाही...त्यामुळं मला कुत्र्यांविषयी कधीच प्रेम वगैरे वाटलं नाही.. हा प्राणी आपल्याला चावू नये इतपत माफ़क अपेक्षा मी करत असे..

आमच्या घरी एक पाळलेली मांजरी होती...आईला फ़ार आवडत असे..पण ही मांजरी कोणत्याही उचकवण्याशिवाय मी अगदी पाठमोरा उभा असताना सुद्धा मला येऊन बोचकारत असे.
( मात्र त्याच मांजराच्या पिलांशी तासंतास खेळायला मात्र मजा येत असे)..

आमचे शेजारी गावठी कुत्रे पाळत असत.,.. त्यांच्या कुत्र्याशी मी फ़ार शत्रुत्त्व नाही किंवा फ़ार प्रेम नाही अशा पद्धतीने अंतर राखूनच वागत असे...पण तो कुत्रा रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यांवर धावून जात असे,सायकलवाल्यांना घाबरवत असे, पाडत असे, त्यावेळी फ़िदी फ़िदी हसत गंमत पाहणार्‍या आपल्या मुलांना ते थाबवत तर नसतच पण कौतुकमिश्रीत उत्साहाने ," ...अग्गोबाई, आमच्या पिंटूने / मोत्याने / काळूने आस्सं केलं हो "..अशी चर्चा करत असत. मात्र कुत्र्यांना बांधणे त्यांना पसंत नसे.... अंगावर उड्या मारमारून भुंकणार्‍या कुत्र्याला पाहून कोणी येणारा सज्जन घाबरला तर म्हणत असत," काही करत नाही हो आमचा कुत्रा, उगीच घाबरू नका ".. मला हे फ़ार खटकत असे " काही करत नाही काय? चावणारच तो आता,म्हटल्यावर लोकांना भीती वाटणारच...उगीच कोण घाबरेल ?..." असं त्यांना सांगावंसं वाटत असे..पण मी फ़ार लहान असल्याने त्या वेळी काही बोलू शकत नव्हतो......

शाळेत असताना हक्क आणि कर्तव्ये नावाचा नागरिकशास्त्रात एक धडा होता...त्याला स्मरून सर्व प्राण्यांच्या मालकांना एक सांगावेसे वाटते,
कुत्रा (, माकड , वाघ, सिंह, हत्ती, कासव, ससा, जिराफ़ ,तरस, लांडगा, सुसर) काय वाट्टेल ते पाळा हो, पण आपले प्राणी बांधून ठेवा , नियंत्रणात ठेवा..

No comments: