Sunday, June 8, 2008

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे... शेवट असा का?

१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या...
माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे...

आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्‍या नवर्‍याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्‍याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल...
...
ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते....
-------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे...
----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल??

आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत
" याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेड*वाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...

म्हणजे आता काय झालं ?
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?

महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट...
( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..

2 comments:

भडकमकर मास्तर said...

असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)...

बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते)

कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ?

आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही......

भडकमकर मास्तर said...

१. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं?
२. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते...
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो...

याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच....
______________________________