accredited online degrees |
२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या...
पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का?
तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो...
महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.)
जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच...
१९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे
१....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा..
२....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर
परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत...
एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?"
मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात...
...
१. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता...
वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही...
...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार?
एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...?
मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही.
( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. )
२.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ...
....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार...
एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?")
मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?"
मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही..
म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "?
5 comments:
मी २००८ मध्ये वाचलेलं सगळ्यात महत्वाचं पोस्ट.
(याचा अर्थ मी याआधी याच्यापेक्षा महत्वाचं काही वाचलंय असं नाही, तर फक्त २००७ चं काही आठवत नाही).
Atishay aavasala.
Sorry, Atishay aavadala
आजही कित्येक कुटुंबात मुलिंना कमी लेखलं जातं. या बद्द्ल अजुन कोणी नाही आपणच पाऊल ऊचलल पाहीजे.
Vaidehi
www.davbindu.com
Your blog is filled with insightful and engaging content! I truly enjoyed exploring your posts—looking forward to more great updates!"
For The Eye Foundation Hospital in Bangalore:
"The Eye Foundation in Bangalore is a premier eye care hospital known for its advanced treatments, expert specialists, and outstanding patient care. A trusted choice for high-quality vision care!
Eye Hospital in Bangalore
Post a Comment