Sunday, June 8, 2008

साठेचं काय करायचं...


साठेचं काय करायचं...

लेखक : राजीव नाईक...
दिग्दर्शक संदेश कुलकर्णी
कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष
निर्मिती :समन्वय पुणे...
( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.)
हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले..
क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले...

मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते.. ( निखिल माझा आवडता अभिनेता आहे, हे लक्षात घेतलं तर पाहिल्यानंतर अधिकच आवडेल हे निश्चित)..

या नाटकाला फ़ार मोठी सांगण्यासारखी गोष्ट अशी नाही...
अभय आणि सलमा या जोडप्याची ही गोष्ट ... अभय ऎडफ़िल्म्स बनवणारा, मिडिआमध्ये काम करणारा, थोडासा लेखक दिग्दर्शक, क्रिएटिव्ह आणि सेन्सिटिव्ह आणि सलमा कॊलेजात शिकवते, इंग्लिशची प्रोफ़ेसर.....फक्त संवादांत येणारा साठे अभयचा मित्र ( किंवा अभयच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी म्हणूया हवं तर), साठे ऎवॊर्ड विनिंग डॊक्यूमेंटरीज बनवतो... आणि अभयला कुठेतरी सतत असं वाटत राहतं " आपण ऎडफ़िल्मवाले म्हणून साठे आपल्याला हिणवतो.." .. हे सगळं उगीच अभयला वाटतंय, साठेच्या हे गावीही नसणार कदाचित...अभय स्वत:ला फ़िल्ममेकर मानतो, त्याला साठेसारखं व्हायचंय पण त्याच्यासारखं यशस्वी होऊ न शकल्यामुळे तो त्याच्यावर जळतो..कंपूबाजीने आपल्यावर अन्याय केला नाहीतर कलाक्षेत्रात आपण कुठल्या कुठे पोचलो असतो असं त्याला वाटतं...पार्टीत साठेच्या होणाया कौतुकावर चिडतो आणि कंपूगिरीला शिव्या घालतो... आणि या प्रत्येक संवादात सलमा त्याला जाणीव करून देतेय की उगीचच साठेवर चिडचिड करायचं कारण नाही,, तुझे मित्र नाही तुझं कौतुक करत?..( तुमची तेवढी दोस्ती आणि त्याचा कंपू ?). एकदा साठेची फ़िल्म चालू असताना अभय दुसर्या एका मित्राला बू करायला लावतो , हे कळल्यावर पुन्हा वाद... सलमा त्याला सांगते, "तुझ्यात जेवढी टॆलंट आहे तेवढी लाव पणाला , असेलच स्पर्धा तर हेल्दी असूदे"... तरी अभयची चिडचिड चालूच...त्याची स्वप्नं म्हणजे वेल-इक्विप्ड स्टुडिओ, कादंबरी लेखन, फ़िल्म काढणे वगैरे...

अभय NFDC च्या फ़ंडिंगने एक फ़िल्म बनवू इच्छितो आणि त्यासाठी त्याची लाच वगैरे द्यायची सुद्धा तयारी आहे, हे दर्शवणारे सुंदर स्वगत आहे नाटकात..

नाटकात घडत फ़ारसं नाहीच... दहा प्रवेश आहेत नाटकात आणि बाहेर घडणाया घटनांवर दोघांच्या स्वभावानुसार रिपिटीटीव्ह त्याच त्याच प्रतिक्रिया...हे नाटक पुनरावृत्तीचं आहे, मध्ये मध्ये इतर सूर लागतातच पण मुख्य भावना परत परत येत राहतात.. पण संवाद अत्यंत छान, खटकेबाज...नाटक कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं असं फ़ारसं नाहीच...
हे झालं गोष्टीबद्दल...
दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांनी एकाच घटनेवर कशा प्रतिक्रिया द्याव्यात , आणि त्याचे संवाद कसे लिहावेत यासाठी ही संहिता अभ्यासण्यासारखी आहे... या संहितेचे पुन्हा पुन्हा वाचन करायला मला आवडते... नवनवीन काहीतरी सापडत राहते प्रत्येक वाचनात...

प्रत्येक सृजनशील माणसाचा एक साठे असतो....( मीही त्याच्याइतकाच टॆलंटेड आहे मग त्याच्यासारखं व्हावंसं वाटत असतं, त्याने आपलं कौतुक करावंसं वाटत असतं... पण त्याच्या सतत यशस्वी होण्यावर मात्र मनात असूया दाटत असते)..मलाही असं क्वचित कधी होतं , तेव्हा मात्र मी हे नाटक आठवून ही भावना बरीच कमी करण्यात यशस्वी होतो...
आणि या उलट कळत नकळत आपण स्वत: क्वचित कोणाचे साठे असू शकतो ... लेखकाने स्वत: लिहिलंय की सुरुवाती-सुरुवातीला त्याला स्वत:ला साठेशी जास्त आयडेन्टिफ़ाय करावंसं वाटलं होतं...

..
राजीव नाईक यांनी या पुस्तकाच्या शेवटी हे नाटक सुचताना काय मनात होतं त्याबद्दल लिहिलं आहे...त्यातल्या काही ओळी देतो इथे...
" आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?"..

सध्या तरी नाटक स्टेजवर नाही, पण याचे निदान पुस्तक आवर्जून वाचावे असे आमचे सर्व नाटकवाल्यांना आणि लेखक मंडळींना सांगणे आहे...

3 comments:

भडकमकर मास्तर said...

मला स्वतःला असली नाटकं फार आवडतात...पण सर्वांनाच आवडतील असंही नाही... ( आमच्या ओळखीचे एक ज्येष्ठ नाटकवाले आहेत त्यांना ही चर्चा करणारी नाटकं अजिबात खपत नाहीत... " अरे काहीतरी घटना तर घडवा रे.." असा त्यांचा अट्टाहास असतो...उदा... खून, मारामार्‍या, तळपत्या तलवारींचे युद्ध, कटकारस्थान वगैरे..असो ..ज्याची त्याची आवड...)

एक स्पष्टीकरण...
नाटक रिपीटीशनचं आहे असं लेखक स्वतःच म्हणतात...नाटकात एक वाक्यही आहे, अभय म्हणतो," आपल्या गप्पांना सुरुवात, मध्य, शेवट नसतोच्...सुरुवात, मध्य की परत सुरुवात..."

लेखकाच्याच शब्दात..."... प्रश्न असा होता की कितीदा अशी पुनरावृत्ती झाल्यावर बंध लक्षात येईल? आणि कितीदा झालं तर हे फार होईल? प्रेक्षकांचं परत परत तेच होण्याकडे लक्ष जाईल की दरम्यानचं इथे तिथे जाणंही पोचेल त्यांच्यापर्यंत?क्रोएशियातल्या प्रयोगानंतर तिथल्या एका लॅरी झापिआ नावाच्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया हायसं वाटायला लावणारी होती,काही खटकणं तर सोडाच, तो म्हणाला," राजीव, यू हॅव ऍन अमेझिंगली लिरिकल सेन्स ऑफ रेपिटीशन..."

अभिजित पेंढारकर said...

मास्तर,
झकास लिहिलंय!

मी हे नाटक पाहून वेडा झालो होतो. निखिलच तर तहहयात चाहता बनलो. मी त्याचं एवढं एकच नाटक पाहिलं. तो जबरदस्तच आहे.

संवाद आणि शेवटही भन्नाट. तेव्ह स्नेहसदन मध्ये नाटकं बघायला मजा यायची. आता तेही उरले नाही.

तुम्ही समन्वय चं `त्याच्या प्रखर सामाजिक जाणिवांचे निखारे` पाहिलंय? कोवळी उन्हे? कमला? सुदामा के चावल? संगीत मित्रद्वय?

भडकमकर मास्तर said...

स्नेहसदन नसलं तरी आता सुदर्शन आहेच की...
समन्वयची त्याप्रसाजानि,मसाज,छिन्नविच्छिन्न आणि मळभ लूज कंट्रोल ही नाटके / दीर्घांक पाहिले आहेत...
मला मळभमधला निखिलचा रोल फ़ार आवडला होता...